Friday, November 7, 2014

आखरी अदालत ! ( भाग तीन )


आत्महत्येच्या प्रयत्नात एक पाय जायबंदी करून बसलेली उषा ..कसेतरी घरकाम सांभाळून तिचा तयार कपडे विक्रीचा व्यवसाय देखील घरूनच करत होती ..पूर्वी पाय चांगला असताना ती काही परिचित घरी जावून कपडे विक्री करे त्यामुळे विक्री चांगली होती होती ..मात्र आता घरबसल्या हा व्यवसाय करणे जास्त लाभदायक ठरत नव्हते ..कसेतरी भागत होते ..रमेशचा भाऊ अगदी काही कमी पडले तर मदत करत असे आपल्या वहिनीला..त्याच दरम्यान रमेशचे वडील वृद्धापकाळाने निधन पावले ..उषा जास्तीच सैरभैर झाली .सासऱ्याचा थोडा तरी आधार होता तिला .. रमेशच्या वडिलांनी ते राहत असलेला फ्लॅट..उषाच्या नावावर घेवून दिलेला असल्याने डोक्यावरचे छप्पर तरी शाबित होते ..तसेच नवीन फ्लॅट सोबतच फर्निचर ..फ्रीज ..अशा वस्तू देखील वडिलांनी घेवून दिल्या होत्या ..त्यातील हलके समान रमेशने कधीच विकले होते .. रमेश दिवसभर बाहेर व्यसनासाठी मिळेल ते काम करू लागला ..हमाली ..गर्दुल्ल्या मित्रांसोबत छोट्या चोऱ्या..नाहीतर कोणातरी श्रीमंत गर्दुल्ल्या सोबत एक दोन दम मिळतील या आशेने दिवसभर लाचारीने फिरणे ..मिळेल ती नशा करणे सुरु होते ..दारू ..गांजा ..आणि जमेल तेव्हा ब्राऊन शुगर ..याच्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखे आहे या विचाराने ..कुटुंबीयांनी त्याला उपचार देणे बंद केले होते ..तू आणि तुझे नशीब ..असे सांगून हात वर केले होते भावाने .. अंधारमय भविष्याकडे वाटचाल सुरु होती रमेश ..उषा ..त्यांचा मुलगा विजय ..आणि दहा बारा वर्षांची मुलगी जया यांची ..कधी ना कधी रमेशला उपरती होऊन तो कायमचा नशा बंद करेल ही आशा देखील मवळू लागलेली ..
एकदा सकाळी सकाळी घराबाहेर पडलेला रमेश दुपारी बारा वाजता घरी आला ..मला फक्त वीस रुपये दे म्हणून उषाच्या मागे लागला ..उषा त्या वेळी लंगडत स्वैपाकघरात काम करत होती ..घरात अजिबात पैसे नाहीत म्हणून तिने रमेशला पैसे देण्यास नकार दिला ..रमेशला माहिती होते कि हिने कुठेतरी पैसे लपवलेले असणार .तो भुणभुण करत एकेक डबे शोधत राहिला ..स्वैपाक करता करता रमेशची अशी कटकट सुरु होती उषाच्या मागे..तितक्यात मुलगा विजय डोके दुखते आहे म्हणून दुकानातून लवकर घरी परत आला ..तो बाहेरच्या खोलीत पडून टी.व्ही पहात पडून राहिला ..त्याने आईला डोके दुखते आहे म्हणून बाहेरच्या खोलीतूनच ओरडून लिंबाचे सरबत करून मागितले ..रमेशच्या कटकटीने उषाचे डोके उठले होते ....मन अस्थिर झालेले ..तिने भांडी ठेवण्याच्या रॅक मध्ये ठेवलेला चाकू काढून घेतला लिंबू कापण्यासाठी ..तो चाकू उजव्या हाताच्या मुठीत पकडूनच ..फ्रीजचे दार उघडून उषा त्यातील लिंबू काढायला गेली ..उजव्या हाताच्या मुठीत चाकू ..त्याच हाताच्या दोन बोटांनी खाली वाकून तिने फ्रीज उघडला ..त्यावेळी नेमके फ्रीजचे दार हलके लागलेले होते ..तिला दार नीट लागलेले नाही याची कल्पना नसल्याने तिने जरा जोर लावून दार उघडले..हलके लागलेले दार जोर लावताच एकदम उघडून उषाच्या अंगावर आले ..खाली वाकलेल्या उषाच्या उजव्या हातातील चाकू तिच्याच छातीत शिरला ..अगदी खोल ..उषा किंचाळी मारून खाली पडली ..रमेश तेथेच तिच्या मागे उभा होता ..उषा खाली पडताच रमेश घाबरून आरडाओरडा करू लागला ..तिच्या छातीत घुसलेला चाकू त्याने काढला ..उषाची किंचाळी आणि रमेशचा आरडाओरडा ऐकून मुलगा विजय देखील स्वैपाक घरात पळत आला ..दोघा बाप लेकांनी उषाला उचलून बाहेरच्या खोलीत आणले ..मुलाने धावत जावून ऑटो आणला ..सगळीकडे फोनाफोनी झाली...ऑटोतून उशाला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले ..तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ..पाच मिनिटात हे सगळे नाट्य घडले होते ..हलके लागलेले फ्रीजचे दार .. हातात चाकू घेवून खाली वाकलेली उषा ..अगदी जमून आला होता मृत्यूचा योग ..
हा अपघात आहे यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते ..रमेशची माहिती काढली तेव्हा रमेश व्यसनी आहे हे समजलेच पोलिसांना .शिवाय तो नेमका त्याच वेळी स्वैपाकघरात होता ..उशाला पैसे मागत होता ही माहिती त्यांना मुलाकडून मिळाली ..मुलाने जरी प्रत्यक्ष आत काय घडले हे पहिले नसले तरी ..बाप आईकडे पैसे मागत होता ...त्यांचा वाद सुरु होता हे मुलाने बाहेरच्या खोलीतून ऐकले होते ..नंतर उषाची किंकाळी ..सगळे गणित जमवले पोलिसानी ..रमेशनेच पैसे मिळवण्याच्या झटापटीत उषाचा खून केला असा निष्कर्ष निघाला ..उषाच्या छातीतील चाकुवर पण रमेशच्या बोटांचे ठसे होतेच ..रमेशवर पत्नीच्या खुनाचा खटला भरला गेला ..रमेश व्यसनी आहे याला त्याच्या भावाने देखील दुजोरा दिला ..रमेश कळवळून सांगत होता हा अपघात आहे ..तो कसा घडला ते देखील त्याने कानी कपाळी ओरडून सांगितले पोलिसांना ..मात्र कोणीच रमेशवर विश्वास ठेवायला तयार नव्हते ..भावू म्हणाला जरी क्षणभर आपण मानले की तो अपघात होता आणि आम्ही तुला जमीन देवून..तसेच चांगला वकील देवून या खटल्यातून सहीसलामत सोडवला तरी पुढे काय ? ..तू काही व्यसन सोडणार नाहीस ..उलट आईविना पोरक्या मुलांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून ठेवशील ..त्यापेक्षा तू होईल ती शिक्षा भोग ..तोवर आम्ही तुझ्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी तरदूत करू ..मुलीचे लग्न करून देवू सुस्थळी ..रमेश हतबल होता परिस्थिती पुढे ..त्यापेक्षा तू जेलमध्ये जा ..तेथे खात्रीने व्यसनमुक्ती मिळेल तुला ..रमेशला जेलमध्ये जावेच लागले ..सरकार मार्फत त्याला वकील दिला गेला ..मात्र तो वकील देखील रमेश निर्दोष आहे याबाबत सांशकच होता ..रमेशच्या कुटुंबियांची तर रमेशला शिक्षा व्हावी हीच इच्छा होती ..रमेश जेल मध्ये सर्वाना तो अपघात आहे हे सांगत राहिला ..आला दिवस काढत राहिला ..खटल्याचा निकाल लागायची वाट पहात..त्याला सतत पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात शेवटचे उपचार घेताना समुपदेशकाने सांगितलेले आठवत होते .." बाबा रे सांभाळ ..जोवर माणसे तुझ्या सुधारणे साठी प्रयत्न करत आहेत तोवर सुधार ..जर निसर्ग यात दखल देईल ...तर असे मोठे नुकसान होईल की जन्मभर पश्चाताप केला तरी भरून निघणार नाही ..अगदी तसेच घडले होते..निसर्गाने म्हणा किवा परमेश्वराने म्हणा ..मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी आपला निर्णय दिला होता ..निसर्गाच्या कोर्टात न्याय झाला होता ..बिचाऱ्या उषाला हकनाक जीव गमवावा लागला त्यासाठी ..!
( समाप्त )
( टीप ..रमेश मला नाशिकच्या सेन्ट्रल जेल मध्ये डिसेंबर २००१ साली भेटला होता ..मी जेलमध्ये आलोय हे समजल्यावर मला भेटायला आला होता ..खूप रडला ..तुषार भावू तुम्ही काहीतरी आयडिया सुचवा म्हणून विनंती केली मला ..माझ्या मुक्तांगणच्या पहिल्या उपचारांच्या वेळी १९९१ साली तो माझ्या सोबतच दाखल होता तेथे .. तो नाशिकचाच असल्याने नंतरही माझ्या संपर्कात होताच ..उषावाहिनी ..रमेशचे वडील ..मुलांना देखील मी व्यक्तिश: ओळखत होतो ...रमेशचा स्वभाव मला चांगला माहित होता ..तो तसा मवाळ प्रवृत्तीचा होता ..तो पत्नीचा खून करू शकेल असे मलाही वाटत नाही ..परंतु सगळे परिस्थितीजन्य पुरावे रमेशच्या विरोधात होते ..पुढे रमेशचे काय झाले ते समजले नाही ..कदाचित एव्हाना तो शिक्षा भोगून बाहेर पडला असेल ..किवा जेल्मध्येच त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली असेल )

No comments:

Post a Comment