Friday, January 16, 2015

विरक्त ? ? ( भाग तिसरा )


नारायणचे सुमारे पंचवीस हजार रुपये कुठे गेले असावेत हे एक कोडेच होते ..त्याचे खिसे आम्ही वारंवार तपासले..त्यालाही अनेक प्रश्न विचारले तरी याचे उत्तर एकच..मालूम नही..याद नही .बहुतेक याला दारू खेरीज झटपट लॉटरीचे अथवा जुगाराचे व्यसन असावे आणि हा त्यात पैसे हरला असावा ..किवा बाहेर एखाद्या स्त्री सोबत अनैतिक संबंध असतील तिला हे पैसे दिले असावेत असे आम्हाला वाटले ..तशी शंका आम्ही त्याच्या पत्नीजवळ बोलून दाखवली ..यावर तिने त्याला जुगार अथवा लॉटरीचे अजिबात व्यसन नाही हे तिने ठामपणे सांगितले ..अनैतिक संबंधांची शंका तर तिने हसून उडवून लावली ..म्हणाली त्याच्यात असे काही करण्याचे गट्स नाहीत..तसे धाडस देखील नाही ..मी माझ्या नवऱ्याची मजल कुठपर्यंत जाईल हे चांगले ओळखून आहे ..अर्थात प्रत्येक स्त्री ला आपल्या नवऱ्याची मजल कुठवर जाऊ शकते हे चांगलेच माहिती असते ..तिचे एकच म्हणणे होते की तुम्ही त्याची झडती नीट घ्या ..त्याने नक्की हे पैसे लपवून ठेवले आहेत कुठेतरी ..तो पगारातले पैसे नेहमी असे लपवून ठेवून नंतर व्यसनासाठी वापरतो ..शेवटी आम्ही त्याची पूर्ण कपडे काढून झडती घेतली ..तेव्हा त्याच्या अंडर वेअर मध्ये लपवून ठेवलेले एकोणीस हजार रुपये सापडले ..आम्ही थक्कच झालो ..आम्ही समजतो तितका हा बावळट नव्हता तर ..दारूच्या व्यसनामुळे येणारा विशिष्ट धूर्तपणा त्याच्याही अंगी उतरला होता ..एकदाचे पैसे सापडल्यावर पत्नीने निश्वास सोडला ...या उपचारांच्या वेळी पत्नीने नारायणच्या वरिष्ठांना भेटून तीन महिन्यांची बिनपगारी राजा मंजूर करून घेतली होती ...पहिल्या महिन्यात याने उपचार घेताना जरा टंगळमंगल केली ..मात्र दुसऱ्या महिन्या पासून गंभीरपणे उपचारात सहभागी होऊ लागला ..मानसोपचार तज्ञांची देखील औषधे सुरु झाली नियमित ..मात्र त्याचे रिफ्लेक्सेस अजूनही नीट नव्हते ..साधे हो किवा नाही असे उत्तर द्यायचे असेल तरी तो इतके अंगविक्षेप करी की समोरच्या व्यक्तीला वाटे हा खूप काहीतरी बोलणार आहे ..पाहता पाहता त्याच्या उपचारांचे तीन महिने पूर्ण झाले ..त्याला डिस्चार्ज न देता येथून मैत्रीतुनच कामावर जावू द्यावे..कामावरून सुटल्यावर त्याने परत घरी न जाता मैत्रीतच यावे अजून काही दिवस अशी योजना आम्ही त्याच्या बाबतीत बनवली त्याच्या पत्नीची संमती होतीच ..त्या नुसार त्याला चांगला दम देवून कामावर जाण्यास परवानगी दिली ..कामावरून सुटल्यावर इकडे तिकडे न भटकता ..सरळ मैत्रीत यायचे असे नीट डोक्यात घातले त्याच्या ..त्याच्या पत्नीने त्याची स्कूटर आणून दिली कामावर जाण्यासाठी तसेच रेल्वेच्या कॅन्टीन मध्ये त्याचे नाश्त्याचे आणि दुपारच्या जेवणाचे पैसेही भरले ..अजून काळजी म्हणून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे बँकेत जाॅइन्ट अकाऊन्ट उघडून त्याचा पगार त्या खात्यावर जमा होईल अशी सोय केली ..त्याने या साठी थोडी कुरकुर केली ..नंतर मान्यता दिली ..आम्ही रोज त्याला हात खर्चासाठी पाच रुपये देत असू ..परंतु हा इतका कंजूष कि ते पैसे तसेच परत आणत असे ..दारू सोडल्या पासून जणू त्याच्या साऱ्या इच्छा आकांक्षाच मरून गेल्या होत्या
नियमित सकाळी साडेसात वाजता तो सेंटरहून बाहेर पडे कामावर जाण्यासाठी ..सायंकाळी पाचला ऑफिस सुटले की सहा वाजेपर्यंत सुरक्षित सेंटरला परत येवू लागला ..त्याचे ऑफिस सेंटर पासून बारा किलोमीटर दूर होते ..अशी नोकरी दोन महिने सुरळीत झाली ..याच्या वेंधळेपणात आणि विसरभोळेपणात मात्र फारसा बदल होत नव्हता ..तसेच तो स्वतच्या राहणीमाना बाबत देखील फारसा जागरूक नसे ..शर्टाचे बटन तुटले आहे हे कोणीतरी सांगितल्याशिवाय त्याच्या ध्यानी येत नसे.. किवा त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही असे त्याला वाटे ..कामावर देखील याचा वेंधळेपणा माहित असल्याने त्याला जास्त जवाबदारीचे काम न देता शिक्के मारणे ..पत्रे डिस्पॅच करणे अशा प्रकारची सोपी कामे दिली जात ..आम्ही त्याला अनेकवेळा तू एखादा सेलफोन घे असा आग्रह केला ..परंतु त्याबाबत देखील तो उदासीन होता ..भर थंडीत त्याला एखादे जॅकेट अथवा स्वेटर घातले पाहिजे याचे भान नसे ..चपलेचा अंगठा तुटलाय ..नवीन चप्पल घ्यायला हवी याची दुसऱ्याने आठवण करून द्यावी लागे ..एकदा गम्मत झाली ..रात्रीचे आठ वाजले तरी हा कामावरुन सेंटरला परत आला नाही ..आम्हाला वाटले झाले...केली याने गडबड ..बहुतेक दारू प्यायला असावा परत ..आम्ही त्याच्या घरी फोन करून तो तेथे आलाय का अशी विचारणा केली तेव्हा पत्नीने नकार दिला ..मग आम्ही त्याला शोधायला बाहेर पडलो ..त्याच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर ..सुमारे आठ किलोमीटर दूर गेल्यावर हा गडी त्याची स्कूटर ढकलत घेवून येताना वाटेत भेटला ..किरकोळ प्रकृतीचा नारायण स्कूटर ढकलून घामाघूम झाला होता ..त्याला खूप दम लागला होता ..तरी हळू हळू मुंगीच्या वेगाने सेंटरकडे कूच चालली होती ..त्याला काय झाले विचारल्यावर स्कूटर बंद पडलीय असे उत्तर दिले त्याने ..अरे मुर्खा इतक्या दूर स्कूटर ढकलत आणण्या पेक्षा वाटेत स्कूटर एखाद्या मॅकेनिक कडे देवून सरळ ऑटो करून सेंटरला यायचे होतेस की असे आम्ही म्हंटल्यावर तो गोंधळाला ..अरे ..हे आपल्या लक्षातच आले नाही असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते ..तो स्कूटर तशीच ऑफिसला ठेवून देखील ऑटो करून सेंटरला येवू शकला असता .मात्र योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमताच नष्ट झालेली ..हे महाशय सुमारे बारा किलोमीटर स्कूटर ढकलत आणणार होते ..शिवाय एखादा फोन करून सेंटरला किवा घरी आपण अडचणीत आहोत हे कळवणे देखील त्याला सुचले नव्हते ..कठीणच होते एकंदरीत ..
नारायण असा एक वर्षभर सेंटरहून कामावर गेला ..नंतर दर शनिवारी रविवारी आम्ही त्याला घरी जाण्यास परवानगी दिली ..ते देखील त्याने नीट पाळले ..पुढे आठवडा भर घरी राहून शनिवार रविवारी सेंटरला यायचे असे सांगितले ते देखील विनातक्रार केले त्याने..आता सध्या त्याच्या व्यसनमुक्तीची सहा वर्षे पूर्ण होत आहेत ..तो घरीच राहतो ..परंतु वागण्यात फारसा बदल झालेला नाही असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे ..घरी हा एखाद्या पाहुण्या सारखा राहतो ..फारसा कोणाशी बोलत नाही ..पत्नी देखील रेल्वेत दुसऱ्या विभागात नोकरी करते ..याने घरातील किरकोळ कामे केली पाहिजेत अशी तिची अपेक्षा असते ..परंतु याला ते सुचत नाही ..पत्नीला वारंवार त्याच त्याच गोष्टी सांगण्याचा कंटाळा येतो ..कामावरून घरी गेला कि याचा आवडता उद्योग म्हणजे किशोर कुमारची गाणी लावून ऐकत बसतो ..सेटरला असताना देखील तो म्युझिक थेरेपी मध्ये आवर्जून सहभाग घेत असे ..त्याचे पेटंट गाणे म्हणजे " आनेवाला पल ..जानेवाला है " थोडा बारीक आणि चिरका आवाज असूनहि तो अगदी तन्मयतेने हे गाणे म्हणत असे ..मुलाचा आभ्यास..स्वता:चे रहाणीमान..नीटनेटकेपणा.कुटुंबांसोबत सिनेमा ..हॉटेलिंग..फिरायला जाणे वगैरे गोष्टीत त्याला अजिबार रस उरलेला नाही ..हल्ली त्याचा स्कूटर चालवण्याचा आत्मविश्वास पण संपलाय ..तो ऑटोने जातो कामावर .. अशा वागण्याची आता पत्नीला देखील सवय झालीय ..तरीही ती वैतागली की एखादेवेळी आम्हाला फोन करते ..त्याला पंधरा दिवस सेंटरला पाठवते ..तेथे त्याला तुम्ही पुन्हा समजावा असे आम्हाला सांगते ..आम्ही त्याला समजावतो ..तो सगळे समजले ..आता वागण्यात बदल करीन असे अंगविक्षेप करून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ..घरी गेला की पुन्हा तसाच बावळट ..वेंधळा ..त्याचा मुलगा हुशार आहे खूप ..बारावीला ९३ टक्के मार्क मिळवून आता इंजिनियरिंग करतोय ..दारू सोडली तरी त्याच्या मेंदूवर दारूमुळे झालेले दुष्परिणाम तसेच आहेत ..कधी कधी वाटते हा विरक्त झालाय संसारातून ..केवळ कर्तव्य भावनेने नोकरी अन संसार करतोय ..' इदं न मम ' ...हे सगळे केव्हातरी सोडून जायचेय .मग याचा मोह नको हे तत्व यालाच जास्त समजलेय आपल्यापेक्षा ..म्हणजे हा अध्यात्मिकतेत आपल्याही पुढे पोचलाय बहुतेक ..मात्र त्याच्या सहवासात दोन तास राहिले की कळते...याची जगण्याची ..आनंद घेण्याची ..मूळ प्रेरणाच हरवलीय व्यसनामुळे !
( समाप्त )

विरक्त ? ? ( भाग दोन )


नारायणने पहिले चार दिवस आराम करून नंतर उपचारात सहभाग घेण्यास सुरवात केली ..एरवी नॉर्मल वाटणारा असला तरी व्यक्तिगत समुपदेशनाच्या वेळी आमच्या लक्षात आले की याचे रिफ्लेक्सेस कमी झाले आहेत ..म्हणजे आम्ही जे काही विचारतोय ..सांगतोय ..ते जसेच्या तसे आकलन करून ..त्याच प्रकारे त्याचे उत्तर देणे ..अथवा आम्ही जे सांगतोय ते त्याला समजतेय असे भाव चेहऱ्या दर्शवण्यात तो कमी पडत असे ..अनेकदा आम्ही बोलत असलो तर तो समजते आहे अशा आविर्भावाने नुसताच मान हलवीत राही मात्र नंतर परत आम्ही काय सांगितले ते सांग म्हंटल्यावर कोरा चेहरा करून आमच्याकडे पहात राही..हे दोन भावू ..नारायण लहान आणि दुसरा मोठा ..याने बी एस्सी केलेले ..पुढे देखील शिकायची इच्छा होती ..परंतु वडील गेल्यावर शिकणे कठीण झाले म्हणून ..वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली ...ती करावी लागली ...हातात पैसा येवू लागल्यावर मित्रांच्या नादाने व्यसने देखील सुरु झाली ..वडिलांच्याच रेल्वेत असलेल्या मित्राच्या मुलीशी लग्न ठरले ..पत्नी देखील रेल्वेतच नोकरी करणारी ...संसार व्यवस्थित सुरु झाला मात्र दारूचे ग्रहण हळू हळू लागत गेले ..त्याच काळात एक मुलगा झाला ..पुढे पुढे व्यसन वाढत गेले ..घरातले वागणे बिघडले ..एरवी नम्रपणे वागणारा नारायण दारू प्यायल्यावर घरात मुजोरी करू लागला ..पत्नी अशा वागण्याने कंटाळून काही बोलली की हा भांडणे करी ..शिवीगाळ करी .. घरात ..रोजच्या कटकटी वाढल्या ..याचा सगळा पगार व्यसनात खर्च होऊ लागला ..पत्नीची नोकरी असल्याने घर नीट चालले होते .. तरीही रोजच्या घरातल्या कटकटी ..नोकरी ..घरकाम वगैरे सगळे एकाच वेळी सांभाळणे पत्नीला दिवसेंदिवस कठीण होऊ लागले ..शेवटी तिने माहिती काढून आम्हाला फोन केला होता ..
मानसोपचार तज्ञ डॉ. पानगावकर यांच्याकडे नारायणला दाखवले तेव्हा त्यांनी सांगितले ..दारूमुळे याच्या मेंदूतील न्युरॉन्सची हानी झालीय ..आपल्या मेंदूत कोट्यावधी न्युरॉन्स असतात जे ..वेगवेगळ्या प्रकारची हजारो बारीक सारीक आणि महत्वाचे कामे करत करतात .. आकलन ..स्मरण ..प्रतिक्रिया देणे ..ज्ञानेंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या संवेदना जतन करून त्यांचे विश्लेषण करणे ..वगैरे प्रकारची तसेच ..स्वता:च्या शरीरात निर्माण होणा-या संवेदना अनुभवणे ..थकवा ..आराम ..दमणूक ..तहान -भूक ..वेदना ..या सारख्या संवेदना अनुभवण्याचे तसेच त्या बाबत योग्य प्रतिक्रिया देण्याचे काम हे न्युरोंस अगदी सहजपणे आपल्या नकळत करत असतात ..तसेच आत्मिक भान ..समाजिक भान ..कौटुंबिक भान... या बाबत देखील हे न्युरॉन्स संस्कारा नुसार.. व्यक्तीच्या मुळच्या प्रवृत्ती नुसार ..अथवा अनुभवानुसार वर्तन करण्याची प्रेरणा देत असतात ..दारू अथवा मादक द्रव्यांच्या सेवनामुळे या मज्जातंतूंची हानी होत असते..मुख्य म्हणजे एकदा हानी झालेले मज्जातंतू पुन्हा निर्माण होत नाहीत त्यामुळे अनेक प्रकारची बारीक सारीक ..मात्र महत्वाची कामे मेंदू सहजगत्या करू शकत नाही ...नेमकी कोणाची किती आणि कोणत्या प्रमाणात दारू प्यायले तर ही हानी होईल याचे काही नक्की गणित नसते..काही लोकांच्या बाबतीत अगदी कमी प्रमाणात दारू प्यायल्याने देखील अशी हानी होऊ शकते..नारायणचे देखील तसेच झालेय ..याला गोळ्या देवून आपण काही प्रमाणात मदत करू शकतो ..ज्या योगे त्याचे रिफ्लेक्सेस योग्य होतील ..तरीही सगळे नुकसान भरून काढता येणे सायन्सच्या आवाक्या बाहेरचे आहे ..याने जर नंतर नियमित योगाभ्यास ..प्राणायाम ..ध्यान या सारखे व्यायाम केले तर कदाचित तो पुन्हा पूर्वीसारखा सर्वसाधारण होऊ शकेल ..जरी नुकसान झालेले न्युरॉन्स पुन्हा निर्माण होत नसले तरी ..जे शिल्लक आहेत त्या न्यूरॉन्सना या वाढीव कामाची जवाबदारी देण्याची प्रेरणा प्राणायाम आणि योगाभ्यासा द्वारे शक्य होऊ शकेल ..डॉ.शैलेश पानगावकर यांचे कडे गेल्यावर आम्हाला नेहमी मानसिकते बद्दल अथवा मेंदुंच्या कार्यप्रणाली बाबत काहीतरी नवीन माहिती मिळत असते ..नारायणला डॉक्टरांनी दोन प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या ..त्याला तीन महिने ठेवावे असे आम्ही पत्नीला सुचवले होते ,,मात्र पूर्वी याने अनेक दांड्या मारल्यामुळे याला एका महिन्यापेक्षा जास्त सुट्टी मिळणे कठीण होते..आधीच कामचुकार पणा केल्याने त्याचे डीमोशन झालेले होते नोकरीत ..नोकरीत हा सिनियर असून देखील याला फारसे जवब्दारीचे काम दिले जात नसे ...
एक महिना उपचार घेवून हा बाहेर पडला तेव्हा ..मानसोपचार तज्ञांची औषधे ते सांगेपर्यंत नियमित घेणे ..फॉलोअप ठेवणे ..व्यसनी मित्रांना भेटणे टाळणे वगैरे प्रकारच्या सूचना आम्ही दिल्या त्याला ..याने मान जोरजोराने होकारही दिला ..मात्र नव्वद टक्के लोक आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत या अनुभवानुसार घडले ..नारायणने नंतर अजिबात संपर्क केला नाही आमच्याशी ..साधारण पंधरा दिवसात त्याच्या पत्नीचा पुन्हा फोन आला .." वो बहोत पिकर घरके आसपास घूम रहे है..मै आपको फोन करूंगी इस डरसे घरमे नही आ रहे..आप गाडी लेकर आ जावो ..घरके आसपास वो मिल जायेंगे आपको ..उन्हे फिरसे मैत्री में अॅडमिट कर दो " त्या नुसार आम्ही तो राहत होता त्या भागात गेलो ..आसपासच्या दुकानदारांकडे नारायण दिसला का चौकशी केली ..तो जवळच असलेल्या एका दारूच्या दुकानात बसलाय हे समजले ...आम्ही तेथे जावून त्याला दुकानातून उचलून आणले ..आम्ही त्याला घराच्या बाहेर देखील पकडू शकतो याचा त्याला अंदाज नव्हता..त्याला सेंटरला आणल्यावर त्याची झडती घेतली तेव्हा दोन हजार रुपये सापडले त्याच्या .खिशात ..आम्ही पत्नीला ते कळवले तर तिला धक्काच बसला ..म्हणाली दोन नाही जास्त पैसे असायला हवेत त्याच्याकडे ..त्याचा नुकताच पगार झालाय ..तसेच दिवाळीचा बोनस देखील मिळालाय त्याला ..त्याच्या खिश्यात किमान पंचवीस हजार रुपये असायला हवेत ...हे ऐकून आम्ही बुचकळ्यात पडलो ..इतके पैसे याने कोणाला दिले ..की नशेत कोणी काढून घेतले हे समजेना ..त्याला विचारले तर मला आठवत नाही असे उत्तर दिले त्याने ..
( बाकी पुढील भागात )

विरक्त ? ? ( भाग पहिला )


" नमस्ते भैया ..आज उनको भेज रही हु सेंटर ..अभी चार दिन छूट्टीया है उनको ..शाम को सेंटर आ जायेंगे तो फोन कर देना...और जरा उन्हे अछेसे समझा देना फिरसे " उमा भाभींचा असा फोन दर दोन तीन महिन्यांनी येतोच ..मला किवा रविला फोन करून त्या हा निरोप देतात ..नवऱ्याला काही दिवस फॉलोअप साठी मैत्रीत पाठवते आहे ..त्याला पुन्हा एकदा नीट समजावून सांगा संसार म्हणजे काय असते ते ..नुसती दारू सोडली म्हणजे त्याने मोठा पराक्रम केलेला नाहीय ..वागण्यात अजून खूप बदल केले पाहिजेत वगैरे ...आम्ही भाभींनाच समजावतो ..फिलहाल वो शराब नाही पी रहे है ये कितनी बडी बात है..आपको इसिमे खुश रहेना होगा हमको ..धीरे धीरे सारी जिम्मेदारीयाँ भी निभायांगे वो ..यावर यांचे ठरलेले बोलणे ..भैया अभी पाच साल हो गये ना शराब छोडकर ..अभी तो नॉर्मल जिंदगी जीना चाहिये " ...यावर आम्ही फक्त थातूर मातुर उत्तर देतो ..हे असे तीन दोन वर्षांपासून सुरु आहे ..संध्याकाळी बरोबर आठ वाजता नारायण सेंटरला आला ..अगदी पहिल्या दिवशी त्याला पहिला होता तसाच किरकोळ शरीरयष्टीचा ...चालताना थोडे खाली वाकून चालणारा ..चष्मा ..चेहऱ्यावर उसने आहे हे समजणारे हास्य..बोलण्यात देखील उसनी वाटणारी नम्रता .." क्यों कैसा चल रहा है ? ..सबकुछ ठीकठाक ? आमच्या या प्रश्नावर तो ..दोन्ही हात हवेत हलवून..सगळे आलबेल असल्याची खुण करेल ..खूप काही बोलायचे आहे असे त्याच्या शरीरभाषेतून वाटेल ..पण नुसताच इशारा करून पुन्हा चेहऱ्यावर उसने हसू आणून आमच्या पुढच्या प्रश्नाची वाट पाहील.." आपने अभीतक मोबाईल नाही लिया ? ..पैदल आये के स्कूटरपे ? ..मोबाईलच्या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर असते ते असे की ..वो फालतू झंझट संभालना पडता है..लेकीन लेनेवाला हु जल्दी ..आणि स्कूटर साठी उत्तर असेल ..उमा मना करती है स्कूटर चलानेके लिये .." असे उत्तर देवून तो आम्ही केव्हा वार्डमध्ये जा असे सांगतोय याची वाट पाहत उभा राहील मक्ख..! ठीक है जाओ अंदर असे म्हणताच आनंदाने हसून वार्डमध्ये जाईल !
पाच वर्षापूर्वी नारायणला जेव्हा आम्ही घरून उचलून उपचारांना आणायला गेलो होतो तेव्हाचा प्रसंग मला आठवला ..तेव्हा त्याच्या पत्नीचा फोन होता ..वो दस बारा सालसे शराब पी रहे है..रेल्वे मे नोकरी करते है..किसीकी बिलकुल मानते नही..कुछ बोलो तो गालीयाॅ देते है..वगैरे ...तुम्ही त्यांना उपचारांसाठी घेवून येवू शकणार नाही का ? असे विचारल्यावर त्याच्या पत्नीने एकदम भूत पहिल्या सारखे घाबरून उत्तर दिले ..बापरे ..ये नही हो सकेगा..वो बहोत खतरनाक है..मेरी तो जान ले लेंगे वो अगर मैने उन्हे कहा तो ..तिची हतबलता स्पष्ट होती ..शेवटी आम्हीच त्याला घरून उचलून आणायला गेलो होतो ..तीन खोल्यांचे छोटेसे घर ..बाहेरच्या खोलीत हा पलंगावर पडून टी.व्ही पहात होता ..एकदम अनोळखी माणसे घरात शिरलेली पाहून पटकन उठून बसला..प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहू लागला ..बनियन व बर्म्युडा होती अंगावर ..नारायण तुम्हीच का असे विचारल्यावर ..त्याने तुम्ही कोण असा आम्हालाच उलट प्रश्न केला ..तितक्यात आतल्या खोलीतून त्याची पत्नी बाहेर आली ..तिच्या मागे एक लहान साधारण दहाबारा वर्षाचा मुलगा घाबरल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत उभा होता .." किसीकी सुनतेही नही है..रोज शराब पिते है.." अशी पत्नीने सुरवात केली ..आम्ही त्याला म्हणालो ..चलो आप हमारे साथ कुछ दिन रहो ..हे व्यसनमुक्ती केंद्राचे लोक असणार हे बहुतेक समजला तो ..कपडे पहेनता हु..असे म्हणत पटकन आतल्या खोलीत गेला..आम्हाला वाटले मागच्या दाराने पळून जाईल की काय ..आम्ही त्याच्या पत्नीला तसे सांगितले तर ..घराला मागचे दार नाही हे सांगून तिने आम्हाला निर्धास्त केले ..त्याचा लहान मुलगा टिपिकल दक्षिण भारतीय दिसत होता..कपाळावर गंध लावलेले ..निरागस चेहरा ..चष्मा घातल्यामुळे एकदम स्कॉलर वाटणारा ..दहा मिनिटे झाली तरी हा आतल्या खोलीतून बाहेर येईना ..शेवटी त्याची पत्नी तो काय करतोय ते पाहायला आत गेली ..लगेच घाबऱ्या मुद्रेने बाहेर आली ..उनके हात मे छुरी है..मेरेको किसीने हात लागाय तो मार डालुंगा उसको..ऐसा बोल रहे है..
असे प्रकरण असले की आम्हाला अजून चेव येतो ..आव्हान वाटते ..जास्तीत जास्त काय करेल एखादा वार करेल चाकुचा अंगावर ..तोवर इतर धरतील त्याला ही खात्री असते आम्हाला ..शिवाय चाकू हाती घेणे आणि तो कोणाला तरी मारणे यात जमिन अस्मानाचा फरक असतो..चाकू कोणीही हाती घेवू शकतो परंतु तो मारण्यासाठी जिगर लागते ..त्याची शरीरयष्टी आणि चेहरा पाहून..तसेच त्याचे डोळे पहाता ती जिगर त्याच्याकडे नाही हे आम्हाला उमगले होते ..ठीक है देखते है हम अंदर जाकर..असे आम्ही म्हणताच त्याची पत्नी घाबरली ..काहीतरी भयंकर होणार या कल्पनेने तिचा थरकाप झाला ..जाने दिजीये अभी ..बादमे आकार लेके जान उनको ..वो सो जाने के बाद..असे म्हणू लागली ..मात्र आता आम्ही आव्हान स्वीकारले होते ..आम्ही आतल्या खोलीत गेलो तर तो हातात चाकू घेवून आमच्याकडे रागाने पाहू लागला ..त्याच्या चाकू धरण्याच्या पद्धतीवरून तो नवखा आहे हे समजलेच ..आमच्यातील एका कार्यकर्त्याने पुढे होऊन ' क्युं रे साले ..डराता है क्या हमको ..असे म्हणत पटकन त्याचा हात पकडला.दुसर्याने त्याच्या हातातील चाकू घेतला..त्याला काही समजण्याच्या आतच तो निशस्त्र झाला होता ..मग त्याला तसाच उचलून बाहेर आणला ..त्याची पत्नी आणि मुलगा आ वासून आमच्या कडे पाहत राहिले ..आप इनका सामान लेकर फॉर्मालिटीज पुरी करनेके लिये आ जाना सेंटरपे असे म्हणत आम्ही त्याला बनियन आणि बर्म्युडावरच गाडीत घातले !
( बाकी पुढील भागात )