Friday, November 14, 2014

प्रिन्स ? ? ( भाग तीन )


दुसऱ्यांदा उपचार घेण्याच्या वेळी त्याचा पवित्रा तोच राहिला ..तो नाईलाजाने सेंटरला राहतोय असेच त्याच्या शरीरभाषेतून दर्शवत राहिला ..सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या थेरेपीज साठी त्याच्या मागे लागावे लागे ..प्रत्येक वेळी तो माॅनीटरशी वाद घाले ..या वेळी आम्ही त्याच्या आईला त्याला अजिबात भेटू नये अशा सूचना दिल्या होत्या ..मात्र तीने आमचे ऐकले नाही ..ती आलीच भेटायला ..अनेकदा आमच्या उपचारात पालकांचा हवा तसा सहभाग मिळत नाही ..आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन पालक करत नाहीत ..अर्थात त्या मुळे उपचार घेणाऱ्या व्यसनीला आम्ही जी मानसिक शक्ती मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यात आम्हाला यश येत नाही ..उपचारात पालक ..प्रत्यक्ष व्यसनी आणि समुपदेशक यांचा तिघांचा योग्य सहभाग गरजेचा असतो ..या पैकी व्यासानीचा सहभाग योग्य नसणार हे गृहीत असते ..मात्र पालक देखील तसेच असतील तर आमची अडचण होते ..तीस टक्के पालकांचा आम्हाला असा अनुभव आहे की ते अजिबात आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत ..त्यांच्या वेड्या मायेपोटी म्हणा किवा काळजी पोटी म्हणा ते स्वताच्या मर्जीनेच वागतात ..या वेळी देखील तसेच झाले ..त्याला आता किमान तीन महिने उपचार द्यावे लागतील असे आम्ही सांगितले होते ..मात्र त्याची आई त्याला एका महिन्यातच घरी घेवून गेली ..या वेळी त्याचा मुंबईला राहणारा मोठा भावू देखील आला होता आई बरोबर ..त्या भावाने देखील तक्रार केली ..की आई त्याचे खूप लाड करते ..आम्हाला नकळत त्याला पैसे पुरवते ..कितीही सांगितले तरी ती कोणाचे ऐकत नाही ..भावू त्याला तीन महिने सेंटरला ठेवायला तयार होता ..परंतु आईच्या हट्टापुढे भावाचे काहीही चालले नाही ..सध्या हा नोकरी वगैरे करत नाहीय ..त्या मुळे दिवसभर रिकामाच असतो ..त्याला तुम्ही रोज सेंटरला फॉलोअप साठी व डेकेअर साठी पाठवा असे आम्ही आग्रहाने आईला सांगितले ..आईने हो ला हो केले ..परंतु एकदा सेंटरच्या बाहेर पडल्यावर तो अजिबात सेंटरला फिरकला नाही ..मानस शास्त्रात ' किंग बेबी सिंड्रोम ' नावाची एक अवस्था सांगितली जाते ..अशा व्यक्तीचे लहानपणापासून इतके लाड केले जाता कुटुंबियांकडून की नेहमी त्याला हवे ते मिळत जाते ..त्याला कशासाठीच संघर्ष करावा लागत नाही ..आपले मुल सतत आनंदी राहावे म्हणून आईबाप त्याची प्रत्येक मागणी योग्य आहे अथवा अयोग्य आहे याचा विचार न करता पूर्ण करतात ..नकळत त्याला आपण राजपुत्र आहोत असे वाटू लागते ..मग त्याला नेहमीच सगळे काही माझ्या अपेक्षेनुसारच घडावे असे वाटत राहते..तसे घडले नाही तर तो कुटुंबियांना मी आत्महत्या करीन ,,घर सोडून निघून जाईन ..जेवणार नाही..वगैरे प्रकारच्या धमक्या देवून इमोशनल ब्लॅकमेल करतो ..
पुढे पुढे केवळ कुटुंबियांकडूनच नव्हे तर सगळ्या जगाकडून त्याच्या अशाच अपेक्षा असतात...प्रत्येक वेळी मनासारखे घडावे म्हणून तो जिवाचा आटापिटा करतो .. स्वता:च्या शर्ती वर जिवन जगत जातो ..खरे तर जिवनात हार-जीत, यश -अपयश , सुख -दुख: , हे सगळेच प्रत्येकाच्या वाट्याला येत असते ..स्वताच्या अटी आणि शर्तींवर कोणालाच जगायला मिळत नसते ..या प्रकारच्या अनुभवातूनच जीवनाचे सार समजून घेवून...समजूतदार पणा किवा प्रगल्भता येते ..प्रत्येक वेळी मनासारखे घडत नाही तर काही वेळा मला जे घडतेय त्याच्याशी जुळवून घ्यावे लागते ही शिकवण मिळते ..त्यातूनच संपन्न व्यक्तिमत्व आकाराला येते ..परंतु याच्या बाबतीत तसे झालेच नव्हते .त्यामुळे जेव्हा याला जगाच्या वास्तवाचा सामना करावा लागला तेव्हा ..याच्याकडे जुळवून घेण्याची कला नव्हती ..हा लगेच चिडचिड करी ..निराश होई ..वैफल्यग्रस्त होऊन दारूचा आधार घेई ..पुन्हा दोन महिन्यातच आईचा फोन आला ..हा पुन्हा खूप प्यायला लागला आहे ..याला जबरदस्तीने घेवून जा उपचारांना ..आम्ही त्याच्या आईला सांगितले की तुम्ही आमच्या सूचनांचे पालन करत नाही ..त्यामुळे तो नीट उपचार घेत नाही ..मागच्या वेळी आम्ही त्याला तीन महिने ठेवा असे सांगून देखील तुम्ही त्याला एका महिन्यात घरी नेले ..या वेळी जर असे करणार असाल तर आम्ही त्याला दाखल करून घेत नाही ..यावर त्याच्या आईने या वेळी तुमचे ऐकीन ..त्याला नक्की तीन महिने ठेवीन .,माझ्यावर उपकार करा वगैरे विनंती केली ..शेवटी आम्ही त्याला उचलून उपचारांना घेवून आलो ..या वेळी देखील त्याने आईला अर्वाच्च शिव्या दिल्या ..जिने त्याचे सर्वात जास्त लाड केले होते त्या आईलाच तो अशा शिव्या घालत होता ..आता तरी आई याला योग्य उपचार घेवू देईल अशी आशा होती आम्हाला ..पण कसचे काय ..
पंधरा दिवसांनी त्याच्या आईचा फोन आला मुंबईहून ...मी मोठ्या मुलाकडे सुनेचे बाळंतपण आहे म्हणून आलेय ..त्याची खूप आठवण येतेय मला ..एकदा तरी फोनवर बोलू द्या मला त्याच्याशी..आम्ही नकार दिला मात्र ती हट्टाला पेटली ..आम्ही नाईलाजाने त्याला फोन दिला ..आई मुंबईला गेलीय हे समजल्यावर तो चिडला तिच्यावर ..तू मला न सांगता ..न विचारता कशी गेलीस म्हणून भांडू लागला ..मग लवकर इथे ये ..मला घरी घेवून जा हे नेहमीचे सुरू केले ...शेवटी आम्ही फोन काढून घेतला त्याच्या हातून ..आता तुम्ही निवांत तीन महिने रहा मोठ्या मुलाकडे मुंबईला तोवर याला इकडे उपचार घेवून द्या असे बजावले त्याच्या आईला ..ती हो म्हणाली ..मात्र तिचा होकार ठाम नव्हताच ..त्याचा उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर दोनच दिवसात ही मोठ्या मुलासह सेंटरला हजर..त्याची खूप आठवण येतेय ..भेटायचे आहे म्हणू लागली ..मोठा भावू समजूतदार होता ..त्याने तिला मनाई केली तरीही शेवटी आईच्या हट्टामुळे तो तिला मुंबईहून नागपूरला घेवून आला होता ..त्याला भेटल्यावर व्हायचे तेच झाले ..त्याने घरी घेवून चल असा आग्रह केला .. त्यावर मोठ्या भावाने त्याला सांगितले की सध्या अजून दोन महिने आई माझ्याकडे मुंबईला राहणार आहे ..तुला यायचे असेल तर आमच्यासोबत मुंबईला चल किवा अजून दोन महिने सेंटरला रहा..हा मुंबईला भावाच्या घरी जाणे शक्यच नव्हते ..कारण तेथे आपले लाड होणार नाहीत हे त्याला चांगले ठावूक होते..मी मुंबईला पण येत नाही आणि सेंटरला पण राहणार नाही ..त्या ऐवजी मी इथल्याच घरी एकटा राहीन ..आईला जावू दे मुंबईला तुझ्यासोबत असा तिसराच पर्याय याने सुचवला ..आम्ही सगळ्यांनी ठाम नकार दिला ..तू इथे एकटे रहायचे नाहीस अजिबात..असा पवित्रा घेतला ..तरीही त्याने त्याचा हट्ट सुरु ठेवला .. पुन्हा आईच्या हृदयाला पाझर फुटला ..शेवटी त्याला दोन वेळचा डबा लावून द्यायचा ..जवळ मोजके पैसे ठेवायचे ..त्याने नागपुरातच घरी एकटे राहायचे ..रोज सेंटरला भेटायला यायचे असे ठरले ..आई सुनेचे बाळंतपण होईपर्यंत मुंबईलाच रहाणार होती ..पुन्हा त्याच्या मनासारखेच झाले होते ..आई आणि भावू त्याला घेवून गेले ..तो फॉलोअपला येणार नाही अशी खात्रीच होती आमची ..तसेच झाले ..मध्ये जेमतेम पाच सहा दिवस गेले असतील ..एकदा सकाळी स्थानिक वर्तमानपत्रात बातमी आली .." तरुण अभियंत्याची आत्महत्या " याचेच नाव दिले होते त्या बातमीत ..राहत्या घरी गळ्यावर आणि सर्वांगावर ब्लेडचे वार करून घेवून त्याने आत्महत्या केली होती ..आम्ही सगळे खूप हळहळलो ..त्याचे सगळे सोपस्कर करून नंतर आई आली होती सेंटरला..भकास चेहऱ्याने ..आम्हाला काय बोलावे सुचेना ..दहा मिनिटे सगळे निशब्द होते ..शेवटीच तीच बोलली " सुटले सगळेच "..मग तोंडाला रुमाल लावत घाईने बाहेर पडली !
( समाप्त )

Thursday, November 13, 2014

प्रिन्स ? ? ( भाग दोन )


आधीच सकाळी सकाळी तो बराच पिवून आला होता ..त्यात आता पुन्हा चार तासात त्याने अजून प्यायल्यावर तो चांगलाच चार्ज झाला ..मोठ्याने बरळू लागला .." ये दारू वगैरा छोडना सब अपने मन के उपर होता है..मै जब चाहे तब छोड सकता हुं ..वो भी घर मी रहेकर..लेकीन ये मां पीछे पडी इसलिये यहा तक आया हु ..अभीतक कई बार छोड चुका हु मै शराब ..क्यू बराबर है ना ? तो प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहू लागला ..आता याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता ..तो वेगळ्या विश्वात गेला होता तर मी वास्तवात होतो ..मी नुसतीच दुजोरा म्हणून मान हलवली ..खरे तर दारू सोडण्यापेक्षा ती सोडलेली कायम बंद ठेवणे हेच अधिक कठीण असते ..काही दिवसातच पिणे पुन्हा सुरु होते ..हीच तर खरी समस्या असते ..पुन्हा सुरु होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हेच शिकावे लागते व्यसनमुक्ती केंद्रात ..तो असेच काहीतरी बरळत गेला .. शेवटी सोफ्यावर मान टाकून लूढकला ..आमचे कार्यकर्ते त्याला उचलून आत घेवून गेले ..त्याची आई जाताना पुन्हा एकदा याची नीट काळजी घ्या ..काही कमी पडू देवू नका याला ..काय लागतील ते पैसे देईन मी..असे बजावून गेली ..संध्याकाळी त्याची दारू उतरली तेव्हा तो भानावर आला..आपण कुठे आहोत हे जाणवले ..आसपास बाकी उपचारी मित्रांची थट्टा मस्करी चाललेली होती ..याने उठून सरळ ऑफिसचा रस्ता धरला .." सर ..मुझे यहा नही रहेना...मेरी माँ को बुला लीजिये ..मुझे स्पेशल रूम अगर मिलती है..तो रहूंगा ..इतनी भीड के साथ नही रहे पाउंगा..आम्हाला हे अपेक्षितच होते ..स्वतःहून जरी उपचारांना एखादा आलेला असला तरी व्यसनमुक्ती केंद्राबाबत त्याला योग्य माहिती असेलच अशी खात्री नसते ..आपल्याला छान एखाद्या खोलीत आराम करायला मिळेल महिनाभर असे त्याला वाटत असते ..शिवाय दिमतीला नर्स ..डॉक्टर ..हाताशी असलेली बेल वाजवली की सेवेला हजर होणारा वार्ड बॉय..सलाईन ..वेगवेगळ्या तपासण्या ..हवे ते जेवण ..अशा कल्पना असतात अनेकांच्या ..एखाद्या खाजगी हॉस्पिटल प्रमाणे आपली बडदास्त ठेवली जाईल अशी त्याची अपेक्षा असते ..भानावर आल्यावर त्याला समजते की इथे आपल्या स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे ..सकाळी वेळेवर उठणे ..रात्री वेळेवर झोपणे ..शिवाय एका विशिष्ट टाईम टेबलचे पालन करणे ..ज्यात समूह उपचार ..योग्याभ्यास ..प्राणायाम ..डायरी लेखन वगैरे करावे लागणार आहे ..हे सारे सुरवातीला त्याच्या पचनी पडणे कठीणच ..कारण घरी त्याला त्याच्या मर्जीने जगायची सवय असते ..इथे त्याला टाइम टेबल नुसार वर्तन करावे लागते ..रवी ने त्याला समजाविले की पहिले काही दिवस तुला येथे कदाचित आवडणार नाही ..पण नंतर नंतर सराव होईल सगळ्या गोष्टींचा ..तो वर तू तीन दिवस आराम कर ..आधी शरीरिक सृष्ट्या सक्षम हो ..औषधे घे वगैरे ..तर म्हणाला मला एकदा तरी फोन वर आईशी बोलू द्या ..आम्ही त्याला नकार दिला ..तू इतके दिवस आईसोबतच तर होतास..इथे येवून तुला जेमतेम आठ तास झालेत ..त्याच्या सगळ्या मागण्या गोड बोलून रवीने धुडकावल्यावर तो नाराजीने वार्डात गेला ..फंस गया यहाँ आकर..असे बडबडला जाताना .
तीनचार दिवस आराम करून झाल्यावर .. आता तुला इतरांप्रमाणे टाईमटेबलचे पालन करावे लागेल असे सांगितल्यावर त्याने पुन्हा कटकट केली ..मी माझ्या मर्जीने आलोय इथे ..त्यामुळे सगळे माझ्या मर्जीनेच करेन असा हट्ट होता त्याचा ..प्रेत्येक थेरेपिच्या वेळेस तो माॅनीटरशी वाद घाले ..वार्डच्या सफाईची जवाबदारी वार्डातील मित्रांवरच सोपवलेली असते ..त्या नुसार सकाळ संध्याकाळ वार्डात झाडू मारण्याचे काम आळीपाळीने दोघांवर येत असते ..त्या वेळी देखील त्याने तमाशा केला ..मी झाडू मारणार नाही ..मी असातसा माणूस नाहीय..इंजिनियर आहे ..माझ्या हाताखाली चार नोकर होते पूर्वी ...वगैरे ! बाबारे इथे सगळेच चांगल्या घरचे लोक आहेत ...सगळे आपापल्या घरचे राजा आहेत ..परंतु इथे आपल्या मानसिक सुधारणे साठी ..हे सगळे सगळ्यांना करावे लागते ..शिवाय झाडू मारणे हे काही हलके काम नाही ...घरी हे काम आपल्या घरातील स्त्रिया करतातच की..असे तला समजावले..परंतु तो अजिबातच झाडू मारणार नाही म्हणून हटूंन बसला .मग आम्ही आयडिया केली ..तू नको मांरूस झाडू तुला आवडत नसेल तर ..पण मग तुला इथे ज्या आठ बिड्या मिळतात त्या मिळणार नाहीत ..ही मात्र बरोबर लागू पडली ..बिडी मिळणार नाही म्हंटल्यावर तो नाईलाजाने झाडू मारण्यास तयार झाला ..असे कटकट करतच दहा दिवस उलटले ..रविवारी जेव्हा त्याची आई भेटायला आली तेव्हा याने आता मी सुधारलोय .घरी घेवून चाल म्हणून तगादा लावला तिच्यामागे..तिला अनेक तक्रारी केल्या ..ती आम्हाला म्हणाली ..अहो हा सांगतोय ते बरोबर आहे ..घरी खरेच याने कुठलेच काम केले नाहीय कधी ..याचे वडील सैन्यात मेजर होते ..आमच्या घरी नेहमी आॅर्डली असे सगळ्या कामांसाठी ..याला खूप लाडात मोठा केलाय आम्ही ..तेव्हा कृपया याला झाडू मारायला सांगू नका ..झाडू मारणे हे हलके काम नाही हे तिला पटवायला आम्हाला खूप कसरत करावी लागली ..तुम्ही त्याचे फार लाड केलेत म्हणूनच तर तो बिघडलाय ..याला आपण सर्वसामान्य आहोत असे वाटत नाहीय ..एखाद्या राजपूत्रा सारखे स्पेशल आहोत असे वाटतेय ..आपण काहीही केले तरी..कसेही वागले आपले काही वाकडे होणार नाही हा अहंकार आहे याचा ..तुम्ही किती दिवस पुरणार आहात याला ? केव्हातरी याला जगाचा सामना करावा लागणारच आहे ..संघर्ष करावा लागणारच आहे ..त्या साठी आम्ही त्याला तयार करतोय ..अहंकार कमी केल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती मिळणे कठीण असते ..दारू मुळे माझे काही नुकसान होऊ शकणार नाही हा अहंकारच तर आहे याचा...म्हणूनच तर तो बिनदिक्कत दारू पितो ..खूप समजावले त्याच्या आईला ..मात्र तिने आमचे ऐकले नाही ..मुलाच्या हट्टाला बळी पडली बिचारी ..त्याला उपचार पूर्ण न करताच डिस्चार्ज करून घेवून गेली ..
पालकच ऐकत नाहीत म्हंटल्यावर आमचा नाईलाज असतो..आम्ही जावू दिले त्याला ..महिनाभरातच त्याच्या आईचा फोन आला ..अहो याचे पिणे पुन्हा वाढलेय ..आता स्वतःहून यायला तयार नाहीय तो तुमच्याकडे ..मी याला रोज फक्त एक क्वार्टर पिण्याची परवानगी दिली असूनही हा जास्त पितोय ..कृपया तुम्ही त्याला जबरदस्ती घेवून जा ..धन्य होती त्या आईची ..मुलाच्या हट्टापायी त्याला रोज एक क्वार्टर पिण्यास परवानगी दिली होती तिने ..अर्थात दारुड्याला अशी मर्यादा पाळता आली असती तर तो दारुडा झालाच नसता ..आम्ही तिच्या विनंती नुसार त्याला आणायला त्याच्या घरी गेली तर संभ्रमात पडलो ..छोटेसे दोन खोल्यांचे घर ...ते पण भाड्याचे..तो म्हणला तसे मालदार वगैरे नव्हते घरचे लोक ..मग त्याच्या आईकडून समजले की वडील गेल्यावर भावू पुण्याला नोकरी लागली म्हणून तेथे गेला होता ..त्या दरम्यान याला व्यसन लागलेले ..त्यासाठी वडिलांची सगळी जमापुंजी याने दारूत उडवली होती ..आईच्या मागे तगादा लावून ..राहता बंगला विकून ते पैसे देखील याने दारूत उडवलेले ..अगदी आईचे दागिने सुद्धा याच्या उंची राहणीमाना पायी विकावे लागलेले ..मोठ्या भावाच्या लग्नात थोडेफार खर्च झाले होते ..बाकी सगळे याने चैन करून दारू पिवून उडवले ..आता सध्या आईला वडिलांची पेन्शन मिळतेय त्या वर घर चालत होते ..शिवाय मोठा भावू आईला लागले तर मदत करीत असे .. आम्ही त्याला जबरदस्तीने उचलून आणले तेव्हा त्याने आईला खूप घाण घाण शिव्या घातल्या त्याने ..ती बिचारी आमच्याकडे केविलवाणे पणे पाहत राहिली !
( व्यसनमुक्ती केंद्रात बिड्या कशा देतात हा प्रश्न वाचकांच्या मनात असेल ..एखाद्या व्यसनीला दारू अथवा दृग्स खेरीज तंबाखू अथवा स्मोकिंग याचे को-अॅडीकशन असतेच ..अशा वेळी एकदम सगळी व्यसने बंद केली तर तो अधिक बैचेन होतो ..उपचारात भाग घेण्यास मनाई करतो ..म्हणून त्याचे प्रमुख व जास्त नुकसान करणारे व्यसन बंद करण्यावर भर दिला जातो ..दारू अथवा ड्रग्स मुळे व्यसनीचे शारीरिक ..मानसिक .आर्थिक ..कौटुंबिक ..समाजिक ..अध्यात्मिक अश्या वेगवेगळ्या पातळ्यांवर नुकसान होते ..तर तंबाखू मुळे केवळ त्याचे व्यक्तिगत असे शारीरिक नुकसान होते .. म्हणून त्यातला त्यात सौम्य म्हणून आम्ही पालकांच्या परवानगीने उपचार घेणाऱ्या मित्रांना कमी प्रमाणात तंबाखू अथवा बिडी देतो ..दारू सोडून काही वर्षे झाली की तंबाखू देखील सोडायची हे अभिप्रेत असतेच )
( बाकी पुढील भागात )

प्रिन्स ...? ? ( भाग एक )


आमच्याकडे स्वतःहून उपचारांना दाखल होतोय म्हंटल्यावर मला त्या तरुण मुलाचे कौतुकच वाटले .. गोरा वर्ण ..चेहऱ्यावर दारूच्या नियमित सेवनामुळे आलेली ..पटकन लक्षात येईल अशी लालसर सूज ..सहा फुटांच्या आसपास उंची ..अंगावरचे उंची कपडे ..तसेच उंची घड्याळ ..गळ्यात सोन्याची चेन ..एकंदरीत प्रकरण मालदार असल्याची सारी चिन्हे ..सोबत त्याची आई होती ..कपाळावर कुंकू नसलेली ..सधारण पन्नाशीची ..याच्या कडे दिसणारी समृद्धीची लक्षणे मात्र तिच्या अंगावर दिसत नव्हती ..साधी साडी ..गळ्यात मण्यांची माळ ...मात्र बोलण्यातून समृद्धी अनुभवल्याचे जाणवत होते ..मी अॅडमिशन फॉर्म भरायला घेतला ..त्या तरुणाला नाव ..गाव ..पत्ता वगैरे विचारू लागलो..तो खूप प्यायलेलाच होता .. त्याची सहायक असल्यासारखी त्याची आईच उत्तरे देत गेली . ..सोबत एक मोठी बॅग भरून सामान होते ...तो सिव्हील इंजिनियर असल्याचे समजले ..वय साधारण पंचविशीचे ..आवश्यक माहिती घेवून झाल्यावर मी त्याची आणि त्याची आईची फॉर्मवर सही घेतली .,,त्याच्या आईला जायला सांगितले ..त्याचा निरोप घेताना तिचे डोळे भरून आले ..आम्हाला हा अनुभव नेहमीचा असतो ..व्यसनीला उपचार केंद्रात दाखल करायला सोबत स्त्रिया आल्या असतील तर त्या हमखास रडतात .." आप चिंता मत किजीये ..हम पुरा खयाल रखेंगे उनका ..असा तिला धीर देण्याचा प्रयत्न केल्यावर ..म्हणाली " इसके पहेले कभी हमसे दूर नही रहा है वो ..इसलिये चिंता होती है..मै इसे थोडी पिने के लिये मना नही करती ..लेकीन ये जादा पिता है..बिलकुल मानता नही किसीकी ..इसका बडा भाई मुंबई में रहेता है..उसने भी बहोत समझाया ..इसके पिताजी गुजर जाने के बाद से जादा ही पिने लगा है....आईचे परक्या व्यक्तीसमोर असे गहिवरून रडणे त्याला पसंत पडले नसावे ..त्याने नापसंतीदर्शक मान हलवली ..तिने धरून ठेवलेला त्याचा हात सोडवून घेतला ..त्याला मी आमच्या कार्यकर्त्या सोबत वार्डात जायला सांगितले ..
...त्याची लांबच्या प्रवासाला नेतात तशी चाके असलेली भरगच्च भरलेली बॅग तो आतमध्ये नेवू लागताच मी त्याला थांबवले .." आपका सारा सामान..बाद में मिल जायेगा आपको..चेकिंग होने के बाद " हे त्याला आवडले नाही ..बॅग आत्ताच आत घेवून जातो असा हट्ट करू लागला .आमचे सामानाबाबत बोलणे एकूण जायला निघालेली त्याची आई मागे वळली ..म्हणाली .." सामान उसे अभी दे दिजिये ....बाद में क्यो ? " आम्ही दाखल झालेल्या व्यक्तीचे घरून आलेले समान पूर्ण तपासूनच आत पाठवतो ..कारण त्यात अनेक किमती तसेच धोकादायक वस्तू असू शकतात ..उंची परफ्युम्स ..डीओडरंटस ..आफ्टरशेव स्प्रे ..दाढी करण्यासाठीच्या कीट मध्ये असलेले ब्लेडचे पाकीट सर्वात जास्त खतरनाक असते ..त्या ब्लेडचा वापर करून काही लोक स्वतःला तसेच इतना इजा करू शकतात....लवकर घरी सोडले जावे म्हणून त्यांचे हे ' इमोशनल ब्लॅकमेल " असते तसेच काही आफ्टरशेव स्प्रे मध्ये सौम्य प्रमाणात अल्कोहोल असते ..एखादा व्यसनी त्या वासाने ती स्प्रे ची अख्खी बाटली पिवून टाकण्याचा धोका असतो ..काही उंची सामान वार्डात गहाळ होण्याची भीती असते ..अनुभवातून आलेल्या या शहाणपणा मुळे आम्ही सामान पूर्ण तपासूनच वार्डात पाठवतो .बॅग आत्ताच आतमध्ये नेतो हा हट्ट तो सोडेना ..त्याची आई देखील त्याला दुजोरा देवू लागली ..मला थोडा संशय आला हा हट्ट पाहून ..ठीक है..अभी चेक करके देता हु आपको असे म्हणत मी त्याची बॅग तपासायला घेतली ..माझ्या अंदाजाप्रमाणे उंची वस्तू होत्याच आतमध्ये ..एकदम तळाला हात घातल्यावर मी चमकलो ..एक मोठी बाटली लागली हाताला ..मी ती बाहेर काढली व्हिस्कीचा भरलेला सीलपॅक खंबा ..मी बाटली बाहेर काढताच त्याने बाटली वर झडप घातली ..माझ्या हातातून बाटली काढून घेतली ..ये मुझे लगेगी ..असे म्हणू लागला .." बाबा रे तू व्यसन मुक्ती केंद्रात व्यसन सोडण्यासाठी आलेला आहेस ..तुला आम्ही दारूची भरलेली बाटली आत कशी नेवू देणार ...तू हे सगळे बाहेरच संपवून येथे यायला हवे होतेस..असे मी त्याला समजावू लागलो ..त्याच्या आईला सांगितले तसे की त्याला तुम्ही आत्ता घरी घेवून जा ..पूर्ण बाटली संपवल्यावर या परत घेवून ..यावर ती अगतिक पणे म्हणाली की ' बाटली लेकर दी उसे तभी वो अॅडमिट होने के लिये तैयार हुवा है ..वैसे तो वो आनेके लिये तैयार नही था .. म्हणजे याच्या स्वतःहून येथे दाखल होण्याचे रहस्य हे होते तर ..' देखिये कोई भी चीज एकदम नही बंद कर सकते है ना....इसे ये थोडी थोडी दे देना तीनचार दिन ..फिर खतम हो जायेगी ' त्याची आई मला समजावू लागली ..यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले ..उनको शराब ना मिलने के कारण कोई भी शारीरिक मानसिक परेशानिया होगी उसके लिये हम दवायें देते है .. शराब जरुरी नही होती है ..
तिला तत्वतः माझे बोलणे पटत होते ..मात्र मुलाबद्दलचे प्रेम आडवे येत होते ..तो दारू पिण्याच्या निमित्ताने एकदा बाहेर गेला की परत इथे यायला तयार होणार नाही असे तिचे म्हणणे पडले ..त्याला कसातरी बाबापुता करून तिने व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत आणले होते ..त्यामुळे ती त्याला परत न्यायला देखील तयार होईना ..शिवाय त्याला इथेच आफिस मध्ये बसून पिवू द्या असा हट्ट करू लागली .. अतिशय अगतिक पणे ती माझ्याकडे पाहत राहिली ..मी पेचात पडलो ..शेवटी त्याची नाही पण मला तिची दया आली ..मी त्याला आॅफीस मध्ये बाजूला कोपऱ्यात बसून ती बाटली संपवण्यास परवानगी दिली ..तो आनंदून मला ग्लास मागू लागला ..मी त्याला एक पाणी पिण्याचा स्टीलचा ग्लास आणि पाण्याची बाटली दिली ..कांच का ग्लास नही है क्या असे विचारत माझ्या उत्तराची वाट न पाहता तो अधीरतेने बाटली उघडू लागला ..पाउण ग्लास दारू आणि अगदी थोडे पाणी टाकून त्याने अधाश्या सारखा ग्लास तोंडला लावला ..दोन दमांत ग्लास संपवला देशी दारू पितात तसा ..मग जीन्सच्या मागच्या खिश्यात हात घालून ..छोटे खारे दाण्याचे पाकीट काढून त्यातील दाणे मजेने खावू लागला ..त्याची आई न मी दोघेही त्याच्याकडे हतबल होऊन पहात होतो..वाटले बाटली हिसकावून घ्यावी चार कार्यकर्ते बोलावून याला सक्तीने वार्डात पाठवावे ..पुन्हा त्याच्या आईचे भरलेले डोळे पाहून मी स्वतःला आवरले ..त्याला जबरदस्ती वार्डात नेले असते तर ती धाय मोकलून रडली असती नक्कीच !
( बाकी पुढील भागात )

Friday, November 7, 2014

आखरी अदालत ! ( भाग तीन )


आत्महत्येच्या प्रयत्नात एक पाय जायबंदी करून बसलेली उषा ..कसेतरी घरकाम सांभाळून तिचा तयार कपडे विक्रीचा व्यवसाय देखील घरूनच करत होती ..पूर्वी पाय चांगला असताना ती काही परिचित घरी जावून कपडे विक्री करे त्यामुळे विक्री चांगली होती होती ..मात्र आता घरबसल्या हा व्यवसाय करणे जास्त लाभदायक ठरत नव्हते ..कसेतरी भागत होते ..रमेशचा भाऊ अगदी काही कमी पडले तर मदत करत असे आपल्या वहिनीला..त्याच दरम्यान रमेशचे वडील वृद्धापकाळाने निधन पावले ..उषा जास्तीच सैरभैर झाली .सासऱ्याचा थोडा तरी आधार होता तिला .. रमेशच्या वडिलांनी ते राहत असलेला फ्लॅट..उषाच्या नावावर घेवून दिलेला असल्याने डोक्यावरचे छप्पर तरी शाबित होते ..तसेच नवीन फ्लॅट सोबतच फर्निचर ..फ्रीज ..अशा वस्तू देखील वडिलांनी घेवून दिल्या होत्या ..त्यातील हलके समान रमेशने कधीच विकले होते .. रमेश दिवसभर बाहेर व्यसनासाठी मिळेल ते काम करू लागला ..हमाली ..गर्दुल्ल्या मित्रांसोबत छोट्या चोऱ्या..नाहीतर कोणातरी श्रीमंत गर्दुल्ल्या सोबत एक दोन दम मिळतील या आशेने दिवसभर लाचारीने फिरणे ..मिळेल ती नशा करणे सुरु होते ..दारू ..गांजा ..आणि जमेल तेव्हा ब्राऊन शुगर ..याच्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखे आहे या विचाराने ..कुटुंबीयांनी त्याला उपचार देणे बंद केले होते ..तू आणि तुझे नशीब ..असे सांगून हात वर केले होते भावाने .. अंधारमय भविष्याकडे वाटचाल सुरु होती रमेश ..उषा ..त्यांचा मुलगा विजय ..आणि दहा बारा वर्षांची मुलगी जया यांची ..कधी ना कधी रमेशला उपरती होऊन तो कायमचा नशा बंद करेल ही आशा देखील मवळू लागलेली ..
एकदा सकाळी सकाळी घराबाहेर पडलेला रमेश दुपारी बारा वाजता घरी आला ..मला फक्त वीस रुपये दे म्हणून उषाच्या मागे लागला ..उषा त्या वेळी लंगडत स्वैपाकघरात काम करत होती ..घरात अजिबात पैसे नाहीत म्हणून तिने रमेशला पैसे देण्यास नकार दिला ..रमेशला माहिती होते कि हिने कुठेतरी पैसे लपवलेले असणार .तो भुणभुण करत एकेक डबे शोधत राहिला ..स्वैपाक करता करता रमेशची अशी कटकट सुरु होती उषाच्या मागे..तितक्यात मुलगा विजय डोके दुखते आहे म्हणून दुकानातून लवकर घरी परत आला ..तो बाहेरच्या खोलीत पडून टी.व्ही पहात पडून राहिला ..त्याने आईला डोके दुखते आहे म्हणून बाहेरच्या खोलीतूनच ओरडून लिंबाचे सरबत करून मागितले ..रमेशच्या कटकटीने उषाचे डोके उठले होते ....मन अस्थिर झालेले ..तिने भांडी ठेवण्याच्या रॅक मध्ये ठेवलेला चाकू काढून घेतला लिंबू कापण्यासाठी ..तो चाकू उजव्या हाताच्या मुठीत पकडूनच ..फ्रीजचे दार उघडून उषा त्यातील लिंबू काढायला गेली ..उजव्या हाताच्या मुठीत चाकू ..त्याच हाताच्या दोन बोटांनी खाली वाकून तिने फ्रीज उघडला ..त्यावेळी नेमके फ्रीजचे दार हलके लागलेले होते ..तिला दार नीट लागलेले नाही याची कल्पना नसल्याने तिने जरा जोर लावून दार उघडले..हलके लागलेले दार जोर लावताच एकदम उघडून उषाच्या अंगावर आले ..खाली वाकलेल्या उषाच्या उजव्या हातातील चाकू तिच्याच छातीत शिरला ..अगदी खोल ..उषा किंचाळी मारून खाली पडली ..रमेश तेथेच तिच्या मागे उभा होता ..उषा खाली पडताच रमेश घाबरून आरडाओरडा करू लागला ..तिच्या छातीत घुसलेला चाकू त्याने काढला ..उषाची किंचाळी आणि रमेशचा आरडाओरडा ऐकून मुलगा विजय देखील स्वैपाक घरात पळत आला ..दोघा बाप लेकांनी उषाला उचलून बाहेरच्या खोलीत आणले ..मुलाने धावत जावून ऑटो आणला ..सगळीकडे फोनाफोनी झाली...ऑटोतून उशाला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले ..तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ..पाच मिनिटात हे सगळे नाट्य घडले होते ..हलके लागलेले फ्रीजचे दार .. हातात चाकू घेवून खाली वाकलेली उषा ..अगदी जमून आला होता मृत्यूचा योग ..
हा अपघात आहे यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते ..रमेशची माहिती काढली तेव्हा रमेश व्यसनी आहे हे समजलेच पोलिसांना .शिवाय तो नेमका त्याच वेळी स्वैपाकघरात होता ..उशाला पैसे मागत होता ही माहिती त्यांना मुलाकडून मिळाली ..मुलाने जरी प्रत्यक्ष आत काय घडले हे पहिले नसले तरी ..बाप आईकडे पैसे मागत होता ...त्यांचा वाद सुरु होता हे मुलाने बाहेरच्या खोलीतून ऐकले होते ..नंतर उषाची किंकाळी ..सगळे गणित जमवले पोलिसानी ..रमेशनेच पैसे मिळवण्याच्या झटापटीत उषाचा खून केला असा निष्कर्ष निघाला ..उषाच्या छातीतील चाकुवर पण रमेशच्या बोटांचे ठसे होतेच ..रमेशवर पत्नीच्या खुनाचा खटला भरला गेला ..रमेश व्यसनी आहे याला त्याच्या भावाने देखील दुजोरा दिला ..रमेश कळवळून सांगत होता हा अपघात आहे ..तो कसा घडला ते देखील त्याने कानी कपाळी ओरडून सांगितले पोलिसांना ..मात्र कोणीच रमेशवर विश्वास ठेवायला तयार नव्हते ..भावू म्हणाला जरी क्षणभर आपण मानले की तो अपघात होता आणि आम्ही तुला जमीन देवून..तसेच चांगला वकील देवून या खटल्यातून सहीसलामत सोडवला तरी पुढे काय ? ..तू काही व्यसन सोडणार नाहीस ..उलट आईविना पोरक्या मुलांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून ठेवशील ..त्यापेक्षा तू होईल ती शिक्षा भोग ..तोवर आम्ही तुझ्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी तरदूत करू ..मुलीचे लग्न करून देवू सुस्थळी ..रमेश हतबल होता परिस्थिती पुढे ..त्यापेक्षा तू जेलमध्ये जा ..तेथे खात्रीने व्यसनमुक्ती मिळेल तुला ..रमेशला जेलमध्ये जावेच लागले ..सरकार मार्फत त्याला वकील दिला गेला ..मात्र तो वकील देखील रमेश निर्दोष आहे याबाबत सांशकच होता ..रमेशच्या कुटुंबियांची तर रमेशला शिक्षा व्हावी हीच इच्छा होती ..रमेश जेल मध्ये सर्वाना तो अपघात आहे हे सांगत राहिला ..आला दिवस काढत राहिला ..खटल्याचा निकाल लागायची वाट पहात..त्याला सतत पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात शेवटचे उपचार घेताना समुपदेशकाने सांगितलेले आठवत होते .." बाबा रे सांभाळ ..जोवर माणसे तुझ्या सुधारणे साठी प्रयत्न करत आहेत तोवर सुधार ..जर निसर्ग यात दखल देईल ...तर असे मोठे नुकसान होईल की जन्मभर पश्चाताप केला तरी भरून निघणार नाही ..अगदी तसेच घडले होते..निसर्गाने म्हणा किवा परमेश्वराने म्हणा ..मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी आपला निर्णय दिला होता ..निसर्गाच्या कोर्टात न्याय झाला होता ..बिचाऱ्या उषाला हकनाक जीव गमवावा लागला त्यासाठी ..!
( समाप्त )
( टीप ..रमेश मला नाशिकच्या सेन्ट्रल जेल मध्ये डिसेंबर २००१ साली भेटला होता ..मी जेलमध्ये आलोय हे समजल्यावर मला भेटायला आला होता ..खूप रडला ..तुषार भावू तुम्ही काहीतरी आयडिया सुचवा म्हणून विनंती केली मला ..माझ्या मुक्तांगणच्या पहिल्या उपचारांच्या वेळी १९९१ साली तो माझ्या सोबतच दाखल होता तेथे .. तो नाशिकचाच असल्याने नंतरही माझ्या संपर्कात होताच ..उषावाहिनी ..रमेशचे वडील ..मुलांना देखील मी व्यक्तिश: ओळखत होतो ...रमेशचा स्वभाव मला चांगला माहित होता ..तो तसा मवाळ प्रवृत्तीचा होता ..तो पत्नीचा खून करू शकेल असे मलाही वाटत नाही ..परंतु सगळे परिस्थितीजन्य पुरावे रमेशच्या विरोधात होते ..पुढे रमेशचे काय झाले ते समजले नाही ..कदाचित एव्हाना तो शिक्षा भोगून बाहेर पडला असेल ..किवा जेल्मध्येच त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली असेल )

Thursday, November 6, 2014

आखरी अदालत ! ( भाग दोन )


पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रात एक महिना उपचार घेवून रमेश बाहेर पडला तेव्हा त्याची तब्येत छान झाली होती ..त्याचे व्यसन पुन्हा सुरु होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तेथील समुपदेशकांनी रमेश ला काही पथ्ये सांगितली ..तसेच वडिलांना आणि पत्नीला देखील त्याच्यावर कसे नीट लक्ष ठेवायचे या बद्दल मार्गदर्शन केले ..काही दिवस बरे गेले ..मात्र जुन्या व्यसनी मित्रांना अजिबात भेटायचे नाही हे पथ्य काही रमेशच्या पचनी पडेना ..त्याच्या अनेक रिकामटेकड्या व्यसनी मित्रांचा अड्डा म्हणजे रमेशचे गॅरेज होते ..गॅरेज सुरु झाल्यावर काही दिवसातच व्यसनी मित्र पुन्हा तेथे जमू लागले ..रमेश ला त्यांना येथे येवू नका हे सांगणे काही जमले नाही ..आता ब्राऊन शुगर सोडलीय मात्र थोडी दारू प्यायला हरकत नाही असा मित्रांचा आग्रह रमेशला मोडता आला नाही ..पुंन्हा दारू तोंडाला लागली ..मग काही दिवसात पुन्हा ब्राऊन शुगर ..सहा महिन्यातच रमेश पूर्वपदावर आला ..काम करणे जीवावर येवू लागले ..पैसे कमी पडू लागले ..घरात रोज कटकटी सुरु झाल्या ..वडिलांनी पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले ..रमेशची पत्नी उषा गोंधळून गेली होती ...आपण नेमके काय केले म्हणजे नवरा व्यसनमुक्त राहील हे तिला समजेना ..हळू हळू मुले मोठी होत होती ..त्यांच्या भविष्याचा विचार करणे भाग होते तिला ..एकत्र कुटुंब असल्याने घरखर्च परस्पर भागात होता ..परंतु मुलांचा गरजांसाठी वारंवार सासऱ्याकडे पैसे मागणे अथवा दिरांकडे पैसे मागणे तिला प्रशस्त वाटेना ..स्वताचा काहीतरी व्यवसाय सुरु करावा म्हणून तिने महिलांच्या तयार कपड्यांची विक्री घरातच सुरु केली ..त्यात साड्या..पंजाबी ड्रेस .वगैरे गोष्टी होत्या ..सासऱ्याने तीला भांडवल दिले होते ..रमेश व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर काही काळ चांगला राही ..परंतु काही दिवसातच मूळपदावर येई ..असे सुमारे सहा वेळा झाले ..
नंतर घरातील कटकटी वाढल्या म्हणून वडिलांनी रमेशला वेगळे घर करून दिले ..ते घर पत्नीच्या नावावर घेवून दिले त्यांनी ..मोठा मुलगा पाहता पाहता दहावीला गेला ..उषा कसातरी व्यवसाय करून घरखर्च चालवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती ..मात्र रमेशचे व्यसन सुरु झाले की ती गोडीगुलाबीने ..दमदाटी करून ..भांडून तिच्याकडील सर्व पैसे काढून घेई .. व्यसनात उडवे..उषाच्या माहेरहून तिचा भावू तिला थोडीफार मदत करी ..मात्र स्वताचा नवरा असा नालायक आहे आणि आपल्याला मुलांच्या पालन पोषणासाठी माहेरची मदत घ्यावी लागते हे काही उषाच्या मनाला पटेना ..परंतु तिचा नाईलाज होता ..रमेशला वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्याचे वडील देखील वैतागलेले ..एके दिवशी त्यांनी स्पष्ट सांगितले ..आता मी तुला काहीही मदत करणार नाही ..तुझा संसार तूच सांभाळ ..मुले मोठी होत आहेत..आत्ता जर सावरला नाहीस तर मग आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल ..रमेशचे बेफाम वागणे सुरूच होते ..उषाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात एक बाब बरी होती की रमेश कितीही भांडण झाले तरी तिला मारझोड वगैरे करत नसे कधी ..तो फक्त तिच्याकडे पैसे दे म्हणून लकडा लावत असे ..तिने पैसे दिले नाहीत तर तिच्या नकळत घरातील एखादी वस्तू चोरून नेई ..ती विकून आपले व्यसन भागवत असे ..बाहेर चोऱ्या करण्याइतके धैर्य त्याच्याकडे नव्हते ..रमेशची तव्ब्येत खालावू लागताच किवा त्याचा त्रास वाढला की आता त्याच्या वडिलांऐवजी ती पुढाकार घेवून रमेशला ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करू लागली ..त्यासाठी माहेरहून पैसे आणावे लागत असत तिला ..असे दोन वेळा झाले ..एव्हाना रमेशने त्याचे गॅरेज विकून टाकले होते ..व मित्राच्या गॅरेज मध्ये काम करू लागला होता ..ते देखील अनियमित असे ..हळू हळू उषा निराश होत होती ..रमेशच्या वागण्याने ती वैफल्यग्रस्त झाली होती ...हल्ली तिचीदेखील चिडचिड वाढली ..कधी कधी ती आपला राग मुलांवर काढू लागली ..हसतमुख उषा दुर्मुखली ..पुढे कसे होणार ही चिंता सतत मन पोखरत होती ..या निराशेच्या भरात एकदा तिने पाहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला ..सुमारे वीस पंचवीस फुटांवरून खाली पडल्याने जबर दुखापत झाली ..जीव वाचला परंतु पाय मोडला ..उजवा पाय जायबंदी झाला ..काही काळ कुबड्यांच्या आधारावर जगणे नशिबी आले ..नंतर एका हाती काठी घेवून तिला चालता येवू लागले .
या प्रकारानंतर सासऱ्यांनी शेवटची संधी म्हणून रमेशला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दखल केले ..या वेळी समुपदेशकाने रमेशला बजावले .." बाबारे तुझी व्यसन करण्याची जिद्द सोड .तू थोड्या प्रमाणात कधीही व्यसन करू शकत नाहीस हे मान्य कर ..प्रयोग बंद कर .. कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे हेच आता तुझ्या हाती शिल्लक आहे ..तुझ्या व्यसनामुळे आता पत्नीच्या जीवावर बेतले होते ..बिचारीच्या नशिबी आता कायमचे अपंगत्व आलेय ..जोवर तुझ्या सुधारणेसाठी माणसे प्रयत्न करत आहेत तोवर भानावर ये ..जेव्हा निसर्ग यात दाखल देईल तेव्हा फार मोठे नुकसान होईल ..तुझा नाहीतर दुसऱ्या कोणाचा तरी जीव जाईल शेवटी ..मग सक्तीने व्यसन बंद करावे लागेल तुला ..शिवाय तेव्हा व्यसन सोडल्यावर देखील जे गमावशील ते पुन्हा कधीही भरून निघणार नाही हे ध्यानात ठेव " रमेशने यंत्रवत मान डोलावली होती तेव्हा ..बाहेर पडल्यावर पहिले पाढे पंचावन्न ..आता मुलांचा शाळेचा खर्च परवडत नाही म्हणून उषाने दहावीनंतर मुलाला शाळा सोडून काकाच्या किराणा दुकानात बसायला सांगितले ..काका हळू हळू याला दुकानदारीत तरबेज करेल मग त्याला एखादा छोटा व्यवसाय काढून देता येईल या आशेने ..अतिशय हुशार मुलगा वडिलांच्या व्यसनामुळे शाळा सोडून दुकानात बसू लागला ..त्याचा पगार तुटपुंजा असला तरी तेव्हढाच उषाला हातखर्चाला आधार होता ..
( बाकी पुढील भागात )

Wednesday, November 5, 2014

आखरी अदालत ! ( भाग एक )


बंदी उघडली तसा नेहमीप्रमाणे रमेश सर्कलच्या गेटजवळ जावून बसला ...आपल्याला कोणी भेटायला येतेय का ? घरून काही निरोप येतोय का याची वाट पाहत ..खरेतर मुलाखत घेण्याची वेळ सकाळी १० नंतर सुरु होई ....इतक्या सकाळी कोणी भेटायला येणे शक्यच नव्हते तरी रमेश सकाळी ६ वाजता बॅरॅकचे दरवाजे उघडले की असा गेटसमोर जावून बसे ..ही ब्याद सकाळी सकाळी आली म्हणून पहाऱ्यावरील वार्डनने रमेशला पाहून शिव्या हासडल्या आणि त्याला हाकलले ..मग हताश पणे रमेश चहाच्या लाईनीत लागलेल्या कैद्यांमध्ये गेला ...भिशीतून चहा घेऊन येणारे आले .. तशी लाईनीत एकच गोंधळ उडाला...धक्काबुक्कीत रमेश बाजूला फेकला गेला ..त्याने पुन्हा लाईनीत जाण्याचा प्रयत्न केला नाही ..तसाच विमनस्क उभा राहिला ..चहा वाटप होऊन गेले ..सगळे कैदी अंघोळ व इतर विधी करण्यासाठी आवारात पांगले तरीही रमेश तसाच विमनस्क उभा होता ..एका वार्डन ने त्याला हटकले आणि त्याच्या हाती खराटा देवून त्याला सगळे आवार झाडण्याचे काम दिले ..निमुटपणे रमेश खराटा घेवून यंत्रवत आवारात पडलेली वाळकी पाने ..आणि इतर कचरा झाडू लागला..बिडीचे थोटूक दिसताच ते काळजीपूर्वक उचलून खिश्यात ठेवू लागला..बराच वेळ रमेशला निरखत असलेला एक म्हातारा कैदी त्याच्या बाजूच्या कैद्याला म्हणाला " बेचारा फालतू में मर्डर केस मे फस गया है..अब घरवाले ना तो जामीन दे रहे है..ना मिलने आ रहे है ..बरबाद हो गया पुरा "
रमेश एका चांगल्या खात्यापित्या कुटुंबातील मुलगा ..वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय ..त्यांनी प्रगती करून एका वडिलोपार्जित दुकानाची दोन दुकाने केलेली .. नेटका संसार ..आर्थिक संपन्नतेमुळे वडिलांनी मुलांना शहरातील महागड्या कॉन्वेंट मध्ये दाखल केले होते शिक्षणासाठी ..मोठा सुरेश ...बहिण मीना आणे धाकटा रमेश ..तिघेही कडक इस्त्रीचे पांढरे कपडे घालून शाळेत जायला निघाले की वडिलांचा उर अभिमानाने भरून येई ..फाळणीनंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून आलेले हे कुटुंब ..कसातरी जीव वाचवून कंगाल अवस्थेत भारतात आलेले ..नंतर कष्ट करून नव्याने उभारी घेवून दहा बारा वर्षातच महाराष्ट्रात स्थिरावलेले ..मोठा सुरेश आणि मीना दोघेही शाळेत रमले ..मात्र धाकटा रमेश इयत्ता आठवीपासून बिघडला ..शाळेला दांड्या मारू लागलेला ..वर्गातील नेमके बिघडलेले मित्र निवडून त्यांच्या सोबत मस्ती फिरू लागला ..दहावीपर्यंत कसेतरी शिकला.. दहावीला अडकला ..अभ्यासात डोके चालेनासे झालेले ..दोन तीन वेळा दहावी पास होण्याचा लटका प्रयत्न करून...शेवटी शिक्षण सोडून देवून एका मित्राच्या गॅरेज मध्ये जावून बसू लागलेला..वडिलांच्या दुकानाच्या व्यापामुळे त्यांना सगळीकडे लक्ष देणे एकंदरीत कठीणच होते ..रमेश मित्राच्या स्कूटर मोटारसायकल दुरुस्त करण्याच्या गॅरेजमध्ये हळू हळू दुरुस्तीचे काम शिकत गेला ..त्याबरोबरच धुम्रपान आणि अधूनमधून दारू प्यायला देखील शिकला ..मुळचा हुशार असल्याने लवकरच तो दुरुस्तीच्या कामात तरबेज झाला ..वडिलांनी भांडवल घालून त्याला स्वताचे गॅरेज सुरु करण्यास मदत केली ..अल्पावधीत मृदू भाषा ...कल्पक डोके यामुळे नामवंत मॅकेनिक म्हणून नाव कमावले त्याने ..क्वचित दारू पिणारा रमेश आता आठवड्यातून एकदा तरी दारू पिवू लागला ..कधी कधी जास्त वेळा ..
योग्य वयात आल्यावर वडिलांनी मोठ्या भावाप्रमाणे रमेशचे देखील लग्न लावून दिले ..बारावीपर्यंत शिकलेली उषा घरात धाकटी सून म्हणून आली ..रमेश नंतर मुलगी मीनाला सुस्थळी पाठवून वडील निर्धास्त झाले ..सुरेश वडिलांच्याच दुकानात मदत करू लागला ..या सर्व सुखाला गालबोट म्हणजे रमेशचे दारू पिणे ..वडिलांनी एकदोन वेळा खूप रागावल्यावर रमेश ने दारू सोडून ..तोंडाला वास न येणारी.. कोणाला लवकर समजू शकणारी नशा निवडली..तो आता गांजाच्या अड्ड्यावर जावू लागला ..आणि तेथेच एकेदिवशी त्याने ब्राऊन शुगरची देखील चव घेतली ..रमेशचे गॅरेज त्यावेळी ऐन भरात होते ..रोज किमान पाचशे रुपये तरी कमावत असे तो .. रमेश रोज ब्राऊन शुगर ओढू लागला ..तोवर रमेश आणि उषाच्या संसारात दोन गोंडस मुले आलेली ..महेश आणि संगीता ...उषा खुश होती आपल्या संसारात.. कारण तोवर तिला रमेशच्या व्यसनाची झळ पोचलेली नव्हती ..रमेश भरपूर पैसे कमावत होता ..व्यसने वगैरे धंदे बाहेरच परस्पर भागवत होता ..उलट घरात देखील पैसे देत होता ..मात्र व्यसन वाढत गेले तसे.. पैश्यांची कमतरत भासू लागली ..रमेशला पैसे पुरेनासे झाले ..घरात पैसे देणे बंद केले त्याने ..वडिलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी रमेशला फैलावर घेतले ..बाहेरून आडून पाडून माहिती घेवून हा काय काय धंदे करतो त्याची माहिती घेतली तेव्हा त्यांना समजले की हा व्यसनी झालाय इतकेच नव्हे तर ब्राऊन शुगर सारखे भयानक व्यसन करतोय ..निर्व्यसनी असलेल्या वडिलांनी ताबडतोब रमेशला पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले..
( बाकी पुढील भागात 

Saturday, November 1, 2014

काफिर ! ( भाग तीन )


उस्मानचे नेमके काय करावे हा मोठाच प्रश्न होता सगळ्या कुटुंबांपुढे ..अल्लाच्या कृपेने घरात समृद्धी होती मात्र शांती नव्हती ..रोज नमाज पढतांना असलमशेठच्या मनात हटकून उस्मानचा विचार येत असे ..त्यांची एकाग्रता भंग होई ..अल्लाची इबादत करताना मन एकाग्र करणे कठीण होऊ लागले ..आज पहाटेच झोपमोड झाल्याने नंतर ते झोपू शकले नव्हते ..सकाळ उलटून गेली तरी असलमशेठ अंथरुणात आहेत हे जाणवून फातीमाबेगम त्यांना उठवायला आल्या तेव्हा त्यांना असलमशेठ जागेच आढळले ..जागरणाने त्यांचे डोळे लाल होऊन सुजल्यासारखे झालेले .." या अल्ला ..आपकी तबियत तो ठीक है ? " काळजीने त्यांनी पतीच्या डोक्याला हात लावून पहिला ..ताप नव्हता अजिबात ..मग त्यांच्या लक्षात आले ..हा उस्मान बद्दलचा मनस्ताप आहे .. " अभी तो वो नादान है ..उसकी शादी कर देंगे तो आ जायेगा ठीकानेपर " फातीमाबेगमचे हे बोलणे ऐकून असलम शेठ भडकले " बेगम आप ही के लाड प्यार ने उसे बिगाडा है..जब देखो तब उसे नादान कहेती हो ..उसकी शादी कर देंगे तो पराये घर की लडकी की जिंदगी बरबाद कर देगा ये ..आप एक बार हा कहेदो तो उसे अभी उठवाकर नशामुक्ती केंद्र में भरती करवा देंगे " असलमशेठ ने व्यसनमुक्ती केंद्राचा विषय काढला ..ते ऐकून फातिमाबेगमचा चेहरा उतरला ..त्यांना आठवले मागच्या वेळी उस्मानला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असताना ..भेटायला गेलो होतो तेव्हा उस्मान ने त्यांना धमकी दिली होती .." आप मुझे यहाँ से तुरंत ले चलो ..वरना मेरा मरा मुँह देखना पडेगा ..मै खुद्खुशी कर लुंगा .." मुलाचे हे बोलणे ऐकून त्या मातेचे हृदय पाघळले होते ..त्याच्या हट्टापुढे मान तुकवावी लागली होती ..उस्मान लहानपणापासून जिद्दी ..हट्टी स्वभावाचा होता ..तो बोलतोय तसे खरेच करेल या वर त्या माउलीचा विश्वास बसला ..तेथील समुपदेशकाने त्यांना खूप समजावले की " सिर्फ आपको डराने के लिये खुद्खुशी की बात कर रहा है ..हमारे लोग अच्छेसे खयाल रखेंगे के उस्मान ऐसा ना करे " तरीही फातीमाबेगम ने त्याला घरी नेण्याचा हेका सोडला नव्हता ..त्या वेळी असलाम शेठ म्हणाले होते " वैसे भी तो ये नशा करके खुद्खुशी ही कर रहा है..रोज तिलतिल मर रहा है ..साथ में पुरे परिवार को भी घसीट रहा है..उससे अच्छा के एक बार में मर जाये " हा सगळा संवाद आठवून त्या पाणावलेल्या डोळ्यांनी तेथून निघून गेल्या ...असलमशेठ एक सुस्कारा टाकत उठले अंथरुणातून ...
दिवसभर असाच अवस्थतेत गेला ..उस्मानला कशाशीही देणे घेणे राहिले नव्हते ..तो नेहमी प्रमाणे त्याची वेळ झाल्यावर घराबाहेर पडला... संध्याकाळी नेमका असलम शेठ नमाज पढताना घरात आला ..फातीमाबेगम कडे पैसे मागू लागला ..त्यांनी नकार दिल्यावर याने आरडा ओरडा सुरु केला ..ते ऐकून मोठा भाऊ हुसेन खालच्या मजल्यावर आला ..तो उस्मानला रागावू लागला ..आवाज वाढले ..हुसेनची बेगम देखील खाली आली ..प्रयत्न पूर्वक या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असलम शेठ नमाज पढत राहिले ...दोन्ही भावात शिवीगाळ सुरु झाली होती ..शेवटी न राहवून असलमशेठ ने डोळे उघडले ..समोर भिंतीवर बंदूक लटकत होती ..तरुणपणी शिकारीचा शौक होता असलमशेठना ..तसेच शेतात आलेली रान डुकरे हाकलण्यासाठी ते पूर्वी बंदुकीचा वापर करत असत ..हवेत बार काढून रान डुकराना पळवणे सोपे जाई ..हा पोरगा आता तसाच सुव्वर झालाय ..याला हाकलण्यासाठी बंदूकच हवी ..हा विचार मनात येताच असलमशेठ क्षणभर बावरले ..हे भलतेच काय ..स्वताच्या मुलावर बंदूक..मन द्विधा झाले होते ..इकडे उस्मानचा गोंधळ सुरूच ..नमाज पढताना विघ्न आणणारा हा काफिर संपायलाच हवा ही भावना तीव्र होत गेली ..
आता दोघे भावू एकमेकांना भिडले होते ..हाथापाई सुरु झालेली दोघांची ..हुसेनची बेगम ..फातिमा बेगम यांचे किंचाळणे ..लहान पोरांची रडारड ..तुंबळ माजले होते घरात ..आपल्या सारख्याच्या घरी हे रणकंदन सहन होईना असलमशेठना ..तिरमिरीत ते उठले ..भिंतीवरची बंदूक खेचून बाहेरच्या हॉल मध्ये आले ..त्यांच्या या एन्ट्रीने सगळेच एकदम घाबरले .." अब्बू ..आप जाने दिजीये .." हुसेन बापाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता ..मात्र आता काफिर संपलाच पाहिजे हा निर्धार पक्का होता असलमशेठचा ..बंदूक वर झाली आणि धडाडली..थेट उस्मानच्या छातीवर ....अविश्वासाने अब्बुंकडे पाहत उस्मान खाली कोसळला ..बंदूक खाली टाकून असलमशेठ धाय मोकलून रडू लागले ..काय झालेय हे लक्षात येताच फातिमा बेगम उस्मानच्या कलेवराकडे धावल्या . हुसेन बापाकडे धावला ..शेवटी उस्मानचा करुण अंत झाला ..आपल्या कृत्याबद्दल असलमशेठना अजिबात पश्चाताप नव्हता ..आपण एक सैतान संपवला याचे समाधान वाटत होते त्यांना ..नाहीतरी तो नशा करून ..सर्वनाश करून घेवून ..तडफडून टाचा घासत.. कुत्र्याच्या मौतीने मरणारच होता ..त्या ऐवजी मी त्याला एका झटक्यात संपवले अशी त्यांची खात्री ...असलमशेठ जेल मध्ये जायला ..फासावर चढायला तयार होते ..
ही घटना आहे १९९३ -९४ च्या सुमाराची ..नंतर दोन्ही भावांनी वडिलांना शिक्षा होऊ नये म्हणून जिवाचे रान केले ..हा अपघात आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न केला ..उस्मानच्या डोक्यावर परिणाम झालेला होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ..या केसचे पुढे काय झाले ते माहिती नाही मला .!

काफिर ! ( भाग दोन )


आपल्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करणार नाहीत याची खात्री झाल्यावर तर उस्मान अधिकच निर्धास्त झालेला ..त्याला धार्मिक ..सामाजिक आणि इतर पद्धतीने देखील असलम शेठ ने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता ..पण परिणाम शून्य ..तात्पुरता तो सारे ऐकून घेई ..मान डोलावून सगळे समजत आहे असे भासवी ..आणि बोलणे संपले की सगळे विसरून देखील जाई ..असलमशेठची खात्री पटत चालली होती की याच्या मनात सैतानाने प्रवेश केलेला आहे ..याच्या बुद्धीवर सैतानाचे आधिपत्य आहे ..तो सैतान काढून टाकल्याशिवाय हा भानावर येणार नाही ..इमान ..फर्ज ..इबादत ..वगैरे याच्यापुढे व्यर्थ आहे ..अल्लाने दिलेल्या अनमोल शरीराची देखील याला किंमत उरलेली नाहीय..शेवटी असलमशेठ ने पुढाकार घेवून फातिमा बेगमना खूप भलेबुरे सुनावले ..त्याला पैसे देशील तर खबरदार ..एकदा फातिमा बेगमने त्यांच्याखातर मनावर दगड ठेवून उस्मानला पैसे देण्यास नकार दिला ..तेव्हा त्याने खूप गोंधळ घातला ..माझा हिस्सा ..माझा संपत्तीतील वाटा ..वगैरे बोलून सगळ्यांनाच दुखावले ..तरीही सगळे ठाम राहिले ..मग कटकट करत हा बाहेर निघून गेला आणि दोन तासात उस्मानला घेवून घरी पोलीस हजर ..त्यांनी म्हणे उस्मानला दमदाटी करून एका माणसाकडून पैसे लुबाडतांना पकडले होते ..म्हणजे आता हा घरी पैसे मिळाले नाहीत ..तर बाहेर चोऱ्या करणार ..लोकांना लुबाडणार ..एखादे दिवशी जेल मध्ये जाणार ..उस्मानच्या जेल मध्ये जाण्याच्या कल्पनेनेच असलमशेठना घाम फुटला होता ..समाजात आपली केवढी बदनामी होणार ..कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही आपल्याला ..त्यांनी उभी हयात इमानइतबारे घालवली होती ..कधी कोणाशी भांडण नाही ..कोणाला दुखावणे नाही ..इतकेच काय त्यांनी कधी शिवी देखील दिली नव्हती कोणाला ..' अल्लाचा नेक बंदा ' म्हणूनच सगळे त्यांना ओळखत असत ..त्या दिवशी असलमशेठने विनंती करून उस्मानला पोलिसी कारवाई पासून वाचवले होते ..पोलिसांना देखील असलमशेठच्या घरी असे अपत्य निपजावे याचे वैषम्य वाटले होते..
उस्मानच्या बाबतीत मात्र आपण फर्ज निभावण्यात कमी पडलो असे हल्ली त्यांना वाटत होते ..हा पोरगा काही आपल्याला मेल्यावर आपल्याला ' जन्नत' लाभू देणार नाही याची खात्री पटत चालली होती ..मेल्यावर ' जन्नत ' तर सोडाच ..जिवंतपणी याने आपले जीवन ' दोजख ' ( नर्क ) करून टाकले आहे या विचाराने ते अवस्थ होत असत ..हल्ली कसेही करून सगळ्या घरादाराला कलंक असणाऱ्या या सैतानाचा निकाल लावलाच पाहिजे असे विचार त्यांच्या मनात घर करू लागले होते ..हा विचार मनात येताच त्यांचा थरकाप होई ..आपली औलाद सैतान आहे सत्य जाणवले की ते अधिक अधिक बैचैन होत असत ..त्यानाही ब्लडप्रेशर चा त्रास होऊ लागला ..दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणाऱ्या उस्मानचे काय करावे हे मोठेच कोडे होते .. वारंवार फातिमा बेगमना ताकीद देवूनही त्या काही मन कठोर करू शकत नव्हत्या ..उस्मानला पुन्हा जबरदस्ती का होईना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे हे काही फातिमा बेगमच्या पचनी पडत नव्हते ..फातिमा बेगमनी कोठून तरी एका पीर बाबाची माहिती आणली होती ..त्या बाबाने दिलेले मंतरलेले पाणी सुद्धा उस्मान च्या नकळत त्याला पाजून झाले ..अजमेर शरीफला जावून ' मन्नत ' मागून झाली ..कोण काय सांगेल ते करायला असलमशेठ तयार झाले होते पोरासाठी ..प्रचीती येते असा बोलबाला असलेल्या सगळ्या दर्ग्यांवर हजेरी लावून झालेली ..
अलीकडे तर असलमशेठ च्या घरात सतत कटकटी होत होत्या ..मोठे भावू वारंवार असलमशेठशी भांडू लागले होते..याला घरातून हाकलून द्या म्हणून त्यांनी लकडा लावला होता ..याच्यामुळे आमची देखील बदनामी होतेय ..याचे भावू म्हणवून घ्यायला आम्हाला लाज वाटते ..तुम्ही हो म्हणाल तर एकदा याच्या दोन्ही तंगड्या तोडतो ..म्हणजे लंगडा बनून घरात बसून राहील..मग नशा करायला बाहेर जाता येणार नाही याला असा सरळ सरळ हिशोब केला होता भावांनी..त्यासाठी दोनचार महिने जेल मध्ये देखील जायची तयारी होती दोन्ही भावांची ..त्यांची मुले मोठी होत होती ..त्यांना भीती वाटे की याची सावली आपल्या मुलांवर पडली तर ते देखील बिघडतील ..ते मुलांना उस्मान घरात असताना खालच्या मजल्यावर अजिबात येवू देवू नसत ..उस्मानला वाटे की सगळे उगाच माझ्याशी वैर करतात ..मला वेगळे वागवतात ..या विचाराने तो अधिकच बेभान होई ..डोके फिरले की घरात नको नको त्या शिव्या देई ..फेकाफेक करी ..धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था झालेली सगळ्यांची !
( बाकी पुढील भागात )

Friday, October 31, 2014

काफिर ! ( भाग एक )


असलम शेठचा नुकताच डोळा लागला होता ..बाहेर एकदम कुत्र्यांचा कालवा झाला ...तारस्वरात काहीतरी अघटीत घडत असल्याची बोंब ठोकत होती कुत्री ..त्यांच्या कर्कश्य भुंकण्याने असलम शेठची झोप चाळवली ..बंगल्याचे दार उघडून ते अंगणात आले ..अंगणात लावलेल्या बल्बच्या प्रकाशात त्यांना एक जण बंगल्याच्या गेट वर चढलेला दिसला ..." आ गया नालायक " असे स्वतःशी पुटपुटत ते पुढे झाले ..त्यांना पाहून उस्मान क्षणभर थबकला ..मग गेटवरून उडी मारून आत आला ..मान खाली घालून उभा राहिला .." तो अब अपनेही घर मी चोरो जैसे घुसनेकी बारी आ गई जनाब ? " असलमशेठ च्या या प्रश्नार्थक उपहासावर उस्मान कडे काहीच उत्तर नव्हते ..तो नुसताच शुंभासारखा उभा राहिला ..दारातून शेठ बाजूला होण्याची वाट पाहत ..." आप घर में रातभर नही आते तो भी कोई फर्क नही पडता .." शेठच्या या बोलण्याने दुखावल्या सारखा असलम त्यांच्याकडे रोखून पाहू लागला ...तितक्यात मागून लगबगीने फातिमा बेगम बाहेर आल्या ..बाप लेकांची पुन्हा खडाजंगी होणार हे ओळखून सारवा सारव करू लागल्या .." बेटा समय पे घर आया करो ..हम सब इंतजार करते रहेते है आपका ..चलो अंदर चलकर खान खावो " असे म्हणून त्यांनी उस्मानला हात धरून घरात आणले ..हताशपणे असलम शेठ मागे फिरले ..पुन्हा बेडवर येवून झोपेची आराधना करू लागले ..बाहेर सगळ्या पंचक्रोशीत दबदबा असलेले असलम शेठ उस्मान प्रकरणात हतबल झाले होते ..उस्मान त्यांचे तिसरे अपत्य ..पहिल्या दोन मुलांनंतर सुमारे दहा वर्षांनी झालेले शेंडाफळ ..लहानपणापासून खूप लाडात वाढलेला ..पढाईत खूप हुशार ..बोलण्यात चतुर ..दिसायला देखणा उस्मान गेल्या चार वर्षांपासून मात्र बिघडला होता ..घरातील अनियमितता वाढली होती ..वारंवार पैसे मागणे ..रात्री बेरात्री घरी येणे ..रागावल्यास डोळ्याला डोळा भिडवून उलट उत्तरे देणे ..हे बदल असलम शेठची चिंता वाढवणारे होते ..त्यांनी फातिमा बेगमला या बद्दल पूर्वीच सावध केले होते ..त्याचे फालतू लाड करू नकोस असे बजावले होते ..मात्र उस्मानची अम्मी पुत्रप्रेमाने आंधळी झाली होती ..सगळेच आपल्या उस्मानला रागावतात ..हिडीसफिडीस करतात ..म्हणून तो असा वागतो असे त्यांना वाटे ..
असलम शेठ म्हणजे गावातले बडे प्रस्थ होते ..पिढ्या नु पिढ्या चालत आलेली जमीनदारी ..घरात पैश्यांची काही कमतरता नाही ...नोकरचाकर ..मान मरातब ..घरातील धार्मिक वातावरण ..उस्मान सोडून सगळे जण पाच वेळा नमाज पढून " अल्ला " ची करुणा भाकणारे...असलम शेठचे वय झाले तसे मोठ्या दोघांनी शेतीवाडीत लक्ष घातले होते ..अब्बुंची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती .. गेल्या दोन चार वर्षात हट्टी आणि जिद्दी असणारा उस्मान बिघडलाय हे सर्वप्रथम मोठ्या भावाच्या हुसेनच्या कानावर आले होते ..हुसेनच्या मित्राने त्याला उस्मान गावातील बियरबार मध्ये दिसला असे सांगितले..त्याच दिवशी हुसेनने उस्मानला फैलावर घेतले होते ..कुराण शरीफ मध्ये ' शराब ' हराम आहे असे म्हंटले आहे हे त्याला सांगितले ..उम्मानने तेवढ्यापुरते मोठ्या भावाचे ऐकून घेतले ..मात्र त्याच्या वर्तनात काही बदल झाला नाही ..तेव्हाच हुसेनने घरात बजावले होते ..याला अजिबात पैसे द्यायचे नाहीत ..हा बाहेर पैसे उडवतो ..हराम गोष्टींवर पैसा खर्च करतो वगैरे ..परंतु फातिमा बेगम चोरून लपून उस्मानला पैसे पुरवत असत .घरात इतकी समृद्धी असताना ..पोराला दोनचार रुपयांसाठी कोणाकडे हात पसरव लागू नये असे त्यांना मनापासून वाटे ..शराब हराम आहे हे वारंवार सांगितल्यावर एकदा हुसेन ने उस्मानला ' अल्ला ' चा वास्ता दिला ..तेव्हा काही दिवस बरे गेले ..नंतर उस्मान शराब ऐवजी गांजाच्या अड्ड्याकडे दिसला असे हुसेनला समजले ..पुन्हा हुसेन लहान भावाला रागावला ..तेव्हा " कुराणशरीफ में सिर्फ शराब हराम लिखा है ..गांजा नही " असे विचित्र उत्तर दिले होते उस्मानने .." सभी प्रकार की नशा हराम मानी जाती है " असे समजावून देखील उस्मान काही सुधारत नव्हता ..एकदा तर दोन्ही मोठ्या भावांनी मिळून उस्मानला गुरासारखा बडवला होता ..घरात दोन दिवस बांधून ठेवला होता ..त्यावेळी फातिमा बेगम आजारी पडल्या ..त्यांनीही दोन दिवस अन्न ग्रहण केले नव्हते ..शेवटी अम्मी पुढे हतबल झाल्याने दोन्ही भावांनी उस्मानला रागावणे सोडले होते ..ते दोघेही आपापला संसार घेवून वरच्या मजल्यावर राहायला गेले ..खालच्या मजल्यावर असलमशेठ ..फातिमा आणि उस्मान असे तिघेच राहू लागलेले ..असलम शेठनी दोन तीन वेळा उस्मानला समज देण्याचा प्रयत्न केला ..उस्मान उलट उत्तरे देतो .आपला मान ठेवत नाही हे लक्षात आल्यावर ते व्यथित झाले होते ..अलीकडे उस्मान ब्राऊन शुगरच्या नादी लागलाय असे ही त्यांच्या कानावर आले होते ...
एकदा प्रेमाने बोलून त्यांनी उस्मानला गळ घातली..व्यसनमुक्ती केंद्रात भरती होण्याचा आग्रह केला ..त्याला गोडी गुलाबीने मुंबईला नेले ..तेथील नामवंत व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले..आता उस्मान सुधारेल अशी त्यांना आशा होती ..तेथे तीन महिन्यांचा कोर्स होता ..परंतु पंधरा दिवसांनी सगळे कुटुंब उस्मानला भेटायला गेले तेव्हा..उस्मानने रडारड केली..घरी घेवून चला असा हट्ट केला ..शपथा घेतल्या ..फातिमा बेगमचे दिल पाघळले ..उस्मानला घरी घेवून जावू असा त्यांनी देखील आग्रह केला ..तेथील समुपदेशकांनी फातिमा बेगमला खूप समजावले..याला पूर्ण उपचार घेवू द्या म्हणून ..परंतु शेवटी फातिमा बेगमच्या हट्टापुढे कोणाचेही काहीच चालले नाही ..एकतर फातिमा बेगमना हल्ली ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला होता ..त्यांच्या मनाविरुद्ध झाले तर ब्लड प्रेशर वाढून त्यांच्या जीवाला धोका होईल या भीतीने ..उस्मानला घरी आणावे लागले होते..घरी आल्यावर चार पाच दिवसातच उस्मान पुन्हा बाहेर जावू लागला होता ...त्याच मित्रांमध्ये जावून ब्राऊन शुगर ओढू लागला होता ..आता काही केल्या तो व्यसनमुक्ती केंद्रात जायला तयार होत नव्ह्ता ..त्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याच्या आड फातिमा बेगमचे पुत्रपेम येत होते .
( बाकी पुढील भागात )

Wednesday, October 29, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग तीन )


रखमी एकूण पाच घरी काम करी ..सगळीकडे धुणे आणि भांडी ..आठवड्यातून एकदा फरश्या पुसणे हा बिनपगारी ओव्हरटाईम..आज उद्विग्न अवस्थेत होती ती ..कामाच्या ठिकाणी पोरांना घेवून जायला तिला आवडत नसे ..कारण तेथे पोरे उगाच मालकिणीच्या घरातील वस्तून हात लावत असत ..त्यावेळी त्यांच्या नजरेतील अप्रूप तिला आवडत नसे..तसेच घरातील माणसे देखील सारखी पोरांना इथे नको हात लावू ..अरे ते तुटेल ..फुटेल ..असे रागवत असत ..एक दोन ठिकाणी तर मालकिणीने तिला सरळच सांगितले होते की पोरांना इथे आणू नकोस..आम्हाला उगाच लक्ष ठेवावे लागते त्यांच्या कडे ..एकदा राजाने एका घरातला चेंडू उचलून आणला होता खेळता खेळता ..त्य दिवशी तिने राजाला मार मार मारले .दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नाही..असे न सांगता न विचारता वस्तू उचलली तर ती चोरी असते हे त्याला चांगलेच उमगले..तेव्हापासून राजाने स्वतःहूनच तिच्या सोबत जाणें नाकारले होते..आज मात्र नाईलाजाने तिला दोन्ही पोरे घेवून निघावे लागले होते कामावर ..प्रत्येक घरी दिवाळीची धूम होती चांगलीच ..मुलांना नवीन कपडे ..नवीन वस्तू ..घरात गोडधोड ..पाहुणे रावळे..रखमीचे काम देखील वाढलेले ..भांडी घासता घासता रखमीला राहवले नाही.. तिने हळूच घरच्या मालकिणी कडे आगावू पैसे मागितले ..दिवाळी आहे पोरांना फाटके आणायचे आहेत हे सांगितले ..आधीच रखमीच्या अंगावर पैसे होते त्यांचे ..पोरांना फटाके आणायचे आहेत म्हंटल्यावर मालकिणीने तोंड कसेनुसे केले ..म्हणाली " अग किती प्रदूषण होते त्या फटाक्यांनी....नुसता पैश्यांचा धूर सगळीकडे ..तुम्हा लोकांना कधी समजणार निसर्गाचे महत्व ? " रखमीने नुसतीच लाचारीने मान डोलावली ..कालच त्या मालकिणीच्या पोरांनी रखमीला आम्ही या वेळी पाच हजार रुपयांचे फटके आणलेत हे सांगितलेले आठवले रखमीला ..पण ती काहीच बोलली नाही ..शेवटी मालकिणीने तिला दोनशे रुपये दिले ..वर सल्ला दिला उगाच फटाके आणू नका याचे त्यापेक्षा काहीतरी गोड धोड खा ..संध्याकाळी फटाके फोडताना राजाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाचे स्वप्न पाहत रखमीने मान हलवून होकार दिला ..
दुपारी घरी आल्यावर संध्याकाळी फटाके घेवू म्हणून तिने ते पैसे साखरेच्या पुडीत लपवले ..हल्ली सदा पैश्यांसाठी सगळे घर धुंडाळत असे ..शेवटी तिच्या कपड्यात हात घालून लपवलेले पैसे देखील काढून नेत असे..हे आठवून तिने या वेळी पैसे नीट नवीन जागेत लपवले होते ..सदाची दिवाळी सकाळपासूनच सुरु झालेली ..पिवून मस्त होऊन तो बाजूच्या दारुड्या मित्राशी काहीतरी बडबड करत बसला होता ..रखमी तावातावाने पोरांना घेवून कामावर गेली तेव्हाच त्याने ताडले होते की आता ही नक्की पोराच्या फटाक्यासाठी आगावू पैसे घेवून येणार ..त्याने तिच्या नकळत तिला पैसे लपवताना हेरले ..आणि तिचे लक्ष नसताना ते पैसे काढून पुन्हा बाहेर सटकला ..संध्याकाळी जेव्हा रखमीला पैसे गायब झाल्याचे समजले तेव्हा तिचा तिळपापड झाला ..रागाने वेडीपिशी झाली ती ..इकडे राजा आणि चिंगीची फटाके हवेत म्हणून कटकट सुरूच होती .सदाला शिव्या घालत ती या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधात होती ..गेली चाळीस वर्षे या दारूने तीला जगणे नकोसे केलेले ..आधी बाप नंतर नवरा ..सदा आला की त्याला जाब विचारायचा..आज सगळा हिशोब करायचा हे ठरवत होती ..बाहेर अंधारून आलेले ..फटाक्यांचे आवाज ..हर्षोल्हास..कोलाहल ..राजा आणि चिंगी आसुसलेल्या डोळ्यांनी ते पाहत होते ..मधून मधून रखमीकडे फटाक्यांचा लकडा लावत होते ..अगतिक रखमी शेवटी त्यांना समजावून थकली ...दोन धपाटे घातले दोघांना ..मग रडत्या पोरांना तिनेही रडतच उराशी कवटाळले .. झोपडीत तेवणाऱ्या चिमणीच्या प्रकाशात तिघेही स्तब्ध बसून राहिले .. हलणाऱ्या चिमणीच्या ज्योतीबरोबर त्याच्या सावल्या भयाण होऊन हलत होत्या ..
कोणाला तरी शिव्या घालत ..बडबडत अडखळत सदा घरात शिरला तेव्हा रखमी त्याच्या अंगावर ओरडली ..वाट्टोळ केलस मुडद्या तू माह्यावालं..पोराच्या फटाक्यांचे पैसे पण नेलेस त्या दारूच्या मढयावर घालायला ..किडे पडतील तुला ..सदा पण तिला शिव्या देवू लागला ..तिच्या अंगावर चालून गेला ..पोरांची रडारड सुरु झाली ..बाहेरच्या फटक्यांच्या आवाजात यांचा कोलाहल ..आज रखमीच्या अंगात दहा हत्तीचे बळ चढलेले ..त्यांच्या झटापटीत धक्का लागून चिमणी विझली ..अंधारात ओरडण्याचे..धडपडीचे..आवाज ..मग सदाची अस्फुट किंचाळी .. एकदम सगळा कोलाहल शांत झाला ..रखमीने चाचपडत चिमणी लावली ..रक्ताच्या थारोळ्यात सदा निपचित पडला होता ..बाजूलाच झटापटीत रखमीच्या हाती आलेला वरवंटा..रखमी भानावर येवून पोरांना ओढत बाहेर पडली..वाट फुटेल तशी चालत राहिली ..स्टेशनवर समोर असलेल्या गाडीत बसली ..भेदरून पोरे तिला चिटकून बसली होती ..दुसऱ्या दिवशी पंचनाम्याला आलेल्या पोलिसांना सदाच्या दारुड्या मित्राने माहिती पुरवली .. वर्तमान पत्रात बातमी आली .. अनैतिक संबंधातून नवऱ्याच्या खून...नवऱ्याने अनैतिक संबंधांचा राग येवून जाब विचारल्याने रागावून पत्नीने त्याच्या डोक्यात वरवंटा मारून त्याचा खून केला ..आरोपी दोन मुलांसह फरार ..पुढील तपास सुरु आहे .
( समाप्त )

Monday, October 27, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग दोन )


बाप गेल्यावर रखमी सर्वार्थाने एकटी पडली ..तिला इतक्या वर्षात इतर कोणी नातलग माहितीच नव्हते ..लहानपणीच बाप म्हणे दारीद्र्याला वैतागून गाव सोडून मुंबईला निघून आलेला ..मुंबईत राबत ..घाम गाळत..लाचारीने मोठा झालेला..एका गवंड्याच्या हाताखाली गवंडीकाम शिकून तयार झाला .. त्याच गुरुकडून याला दारूचा वसा मिळालेला ..त्याच्याच पोरीशी पाट लावून संसारी झालेला ..इतकीच स्टोरी रखमीला माय कडून समजली होती ..बाप गेल्यावर ती खूप सैरभैर झाली ..दहा दिवस घराबाहेर पडलीच नाही..झोपडपट्टीतल्या शेजारयानीच बापाचे सर्व विधी उरकले ..त्या खर्चासाठी तिने चार घरी धुणेभांड्याचे आगावू पैसे घेवून ..अंगावर कर्ज देखील करून ठेवलेले..बाप जाता जाता आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली टाकून गेला हे लक्षात आल्यावर तिने कंबर कसली कष्ट वाढवले ...बाप गेल्यावर तिला एक जाणवले ..बाप जिवंत असे पर्यंत मर्यादेने वागणारे .आता उघड उघड सलगी करू पाहू लागले ..येता जाता तिची ख्याली खुशाली विचारू लागलेले ..वर काही कमी जास्त झाल्यास मदत करण्याची एका पायावर तयारी असल्याचे सांगू लागले ...ती रहात असलेल्या झोपडपट्टी पासून ते ज्या घरी काम करी तेथील पुरुषांपर्यंत सगळ्यांची तीच तऱ्हा..फक्त तिला भुलवण्याचे मार्ग वेगवेगळे ..तिने मन खंबीर केलेले होते ..कोणत्याही अमिषाला बळी पडायचे नाही ..बाजूला राहत असलेल्या ...अनेक उन्हाळे काढलेल्या..मात्र आता सर्वच दृष्टीने निरुपयोगी ठरलेल्या म्हातारीने तिला सल्ला दिला .." पोरी लवकर एखादा चांगला मुलगा पाहून पाट लावून घे त्याच्याशी..नाहीतर वाऱ्यावर उडालेल्या कागदा सारखे नाचावे लागेल तुला वारं येईल तसे..कसा का असेना शरीराला मालक हवा ..एखाद्या अवघड क्षणी निसर्ग डाव साधेल मग कायमच हरत जाशील ..म्हातारीच्या सल्ला तिच्या मनात रुजला होता ..जाता येता चौकात दिसणाऱ्या सदा वर तिची नजर रेंगाळली ..पार ती नजरेआड होईपर्यंत तो तिला निशब्द पहात असे ..हा बाजूच्या झोपडपट्टीत राहणारा ड्रायव्हर म्हणून काम करतो हे तिला तिच्या मैत्रिणीकडून समजले होते ..एके दिवशी धाडस करून सदाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ..तिने देखील तोंड न वेंगाडता त्याला प्रतिसाद दिला ..
आयुष्यातले धुंद दिवस सुरु झाले ..स्वप्नवत असलेले..जीव ओवाळून टाकावेसे वाटणारे ..याच क्षणांच्या बदल्यात सारे आयुष्य उन्हाळा सहन करण्याची ताकद मिळावी असे मंतरलेले दिवस ...त्याच धुंदीत तिने सदाशी पाट लावून घेतला ..तिच्या झोपडीतील किडूक मिडूक सामान त्याच्या खोपटात सामावले गेले ..कधी नव्हे ते रखमा सिनेमाला जावू लागली ..पहिल्यांदा अंगावर दुकानात जावून विकत घेतलेले नवे कोरे कपडे आले ..असे दोन वर्ष गेल्यावर राजाचा जन्म झाला ..मग वर्ष भरात चिंगी ..मात्र या चिमुकल्यांच्या प्रवेशासोबत झोपडीत अधेमध्ये दारूचा आंबूस वास यायला सुरवात झाली ..रखमीने सदाला सावध केले ..ही दारू संसाराचे वाटोळे करते हा मोलाचा सल्ला दिला ..पण सदाने पुरुषी बेफिकीरीने तो सल्ला धुडकावला ..मग तिने शपथ घातली ..स्वताची ..मग पोरांची ..शपथे नंतर काही दिवस चांगले जात मात्र लवकरच सदाला आपल्याच काय पोरांच्या देखील शपथेची किंमत राहिली नाही हे ती उमगली ..मग तिने राग दर्शविला ..बडबड केली तसे ..सदा देखील प्रत्युत्तर देवू लागला ..एकमेकांची उणी दुणी काढणे सुरु झाले ..सदाच्या रूपाने जणू काही आपला मेलेला बापच परत आलाय की काय असे वाटू लागले ..पुढे पुढे सदा अंगावर हात टाकू लागला ..अगदी लाथा बुक्क्यांनी तुडवी लागला तिला ..सात जन्माची वैरीण असल्यासारखी तिला वागवू लागला ..ती मार खाई तरी देखील त्याला बोलणे सोडत नव्हती ..आपल्या लेकरांचे भविष्य अंधारात आहे हे जाणवून ती भेदरली होती ..कसेही करून दारूला याने सोडचिट्ठी द्यावी म्हणून तिने कोण काय सांगेल ते उपास तापास केले .. नवस बोलली..परंतु सदा दिवसेंदिवस जास्तच बिथरत चालला होता ..हल्ली तर त्याने तिच्या चारीत्र्या वर चिखलफेक करणे सुरु केलेले ..त्याच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाने तिला मळमळल्या सारखे होई म्हणून ती त्याच्यापासून अंतर वाढवू लागली ..तसे तू बाहेर उंडारतेस ..पासली पडतेस..घरचे सोडून बाहेर पोट भर खातेस वगैरे बोलू लागला ..ती कामावर निघाली की उपहासाने हसू लागला ..तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देवू लागला ..तिला वाटले आपल्याला माहेर असते तर किती बरे झाले असते ..किमान रागाने माहेरी जाता आले असते ..पण या दारुनेच तिचे माहेर हिरावले होते ..रडत खडत दिवस चालले होते ..अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत ..पण आपल्या मागे पोरांचे काय हाल होतील या धास्तीने ती ते विचार परतवून लावी ..एकदा तिने भांडी घासता घासता घरच्या मालकिणीला आपली व्यथा सांगितली ..त्या मालकिणीने सरळ पोलिसात जा ..तक्रार कर नवऱ्याची असा सल्ला दिला ..तिला ते प्रशस्त वाटले नाही तरीही एकदा प्रयोग म्हणून ती जवळच्या चौकीत गेली ..तेथे नवरा मारतो ..शिव्या देतो वगैरे सांगितले ..तर हा तुमचा घरगुती मामला आहे ..असे सांगून तिची बोळवण केली गेली ..कोणाच्या तरी सांगण्यावरून ती कौटुंबिक सल्ला केंद्रात गेली ..तेथे आपले रडगाणे गायले ..तेथील बाईने रीतसर तक्रार घेतली ..नवऱ्याला समज देऊ असे सांगून एक पोलीस पाठवला तिच्या सोबत सदाला दम द्यायला ...त्या नंतर दोन दिवस बरे गेले ..नंतर सदा पुन्हा पिवून आला ..या वेळी तर तू धंदा करतेस ..पोलिसांना तंगड्या देतेस ..वगैरे बोलला ..ती तशीच अंधारात पोलीस स्टेशनला गेली ..पोलिसांनी त्याला पकडून नेले ..एक दिवस कोठडीत डांबून ..दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले ..तेथे नवऱ्याने कान पकडले ..सर्वांची माफी मागितली ..त्याला सोडले गेले ..पुन्हा तेच ..
शेवटी आता आपले भोग आहेत हे ..भोगूनच संपवले पाहिजेत या विचाराने ती चूप बसली .. तिला मार खायची सवय पडली ..मात्र निष्पाप पोरांवर सदा हात उचलू लागला तेव्हा ती वाघिणी सारखी चवताळली ..पोरांचे रक्षण करू लागली ..आज सकाळी सकाळी राजाने फटाक्यांची मागणी सुरु केली होती ..सदाच्या पिण्यापायी घरात पैसा थांबत नव्हता ..त्याची नोकरी सुटलेली ..तिच्या धुणी भांड्याचे पैसे तो तिच्याकडून हिसकावून नेई .जेमतेम दोन वेळा पोटभर अन्न मिळत होते .. पोराला फटाके आणू कुठून हे तिला समजत नव्हते ..पोराच्या हट्टाने ती फटाकड्याच्या द्काना पर्यंत जावून आलेली ..चार सुरसु-यांची ची पेटी पन्नास रुपये ..ही किंमत ऐकून परत मागे फिरली ..आता एखाद्या घरी पुन्हा आगावू पैसे मागून किमान पोराला सुरसूरया तरी घेवून देवू असा विचार केला होता तिने ..पण राजाला आताच्या आत्ता फटके हवे होते ..पोर आपल्यामागे मार खाईल या विचाराने ती दोन्ही पोरांना सोबत घेवून कामावर जायला निघाली ..सदा मागे शिव्या देत राहिला..त्याच्याकडे दुर्लक्ष करून..
( बाकी पुढील भागात )

दिवाळीची दैना ! ( भाग एक )


" आमाला बी फटाकडे हवेत " म्हणून पोरांनी दोन दिवसांपासून उच्छाद मांडलेला ..रखमीचा जीव मेटाकुटीस आला होता ..आज तर सकाळधरणं सहा वर्षाच्या राजाने रडारड सुरु केलेली ..मातीत बसकण मारून ' ' फटाकडे पायजे' चा जप ...येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांकडे तो केविलवाण्या नजरेने पाहत ..नाक न डोळे एकाच झटक्यात पुसत ...तो हातपाय मातीत आपटून ..वेगवेगळ्या सुरात बोंबलत होता ..त्याचे रडण्याला दुजोरा म्हणून त्याच्यापेक्षा एक वर्षांनी लहान असलेली चिंगी देखील त्याच्या रडण्याला पाठींबा देत त्याच्याच बाजूला बसून झोपडपट्टीच्या समोर रस्त्यावर लावलेल्या फटाकड्याच्या दुकानाकडे आशाळभूतपणे पाहत बसली होती..." काय बे मादरचोद ..तुला फटाकडे हवेत व्हय रे .." अशी सुरवात करून झोपमोड झालेल्या सदाने लाखोली सुरु केली तसा रखमीचा जीव धस्तावला .." उतरली भाड्याची दारू .." असे मनातल्या मनात म्हणत तिने पदर कमरेला खोवला .. पोराच्या रक्षणास सज्ज झाली ..
सदा काल मध्यरात्री ढोसून आलेला ..आल्या आल्या दमून भागून पोरांना पोटाशी घेवून गाढ झोपलेल्या रखमी वर त्याने हक्काने हात टाकला होता ..उगा जवळ ओढून इकडे तिकडे झोंबू लागला तशी तिने त्याला ' पोर जागी व्हतील ." .असे म्हणत तिरस्काराने दूर ढकलले .." तूला रोज वेगवेगळे लागत असतीन ...छिनाल ..अशी कचकचीत शिवी हासडत त्याने तिच्या पोटात गुद्दा लगावला ..तोंड दाबून ती घुसमटून विव्हळली.. मग मेल्यागत गपगार पडून राहिली ..एव्हाना सदाचाही आवेश संपून तो घोरू लागलेला ..त्याची अन सवताची कापडं नीट करून..टक्क डोळ्यांनी पडून राहिली होती ..राहून राहून तिला मोठ्याने हंबरडा फोडून रडावेसे वाटत होते ..तिचा बाप दारूनेच गेलेला ..बाप गवंडीकाम करत असे ..दोन्ही पोरी झाल्या म्हणून तो मायला नेहमी शिव्या घाली ...पोरगा होत नाही या दुखा;त त्याने दारू पिण्यास सुरवात केलेली ..तिची माय पण आपण नव-याला मुलगा देवू शकलो नाही या अपराधी भावनेने त्याचे सगळे अत्याचार सहन करी ..ती वयात आली तसे बाप येताजाता उरावर बसून फुकट खातेस असे टोमणे मारू लागलेला ..शेवटी सातवीत शाळा सुटली ..दिवसेंदिवस बापाचे पिणे वाढले ..आधी पैसा .मग आईच्या गळ्यातील डोरले ..पितळी भांडी गेली दारूच्या पायी ..मग भाड्याची खोली सोडून ते लहानग्या खोपटात रहायला आलेले ..आई आसपासच्या सोसायटयात धुणे भांडी करायच्या कामाला जावू लागली ..रखमीला ती मदतनीस म्हणून सोबत नेई ..तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रखमीला किमान दोनचार घरातून जुने कपडे मिळत गेले ..वयात आल्यावर तिला लोकाच्या घरी धुणी भांडी करण्यास जाण्याची लाज वाटू लागली ..जेथे जेथे ती जाई तेथील पुरुष आपल्या बायकांचा डोळा चुकवून रखमीला निरखत असत... हे लक्षात आल्यावर तर ती अजूनच बावरली ..हे लोक चांगल्या नटलेल्या सजलेल्या बायका असून देखील आपल्यासारख्या कडे पाहतात या भावनेने मोहरली देखील ..एकदा एकाने तिच्या आईची पाठ आहे पाहून उगाच तिच्या समोर पाकीट उघडून आतल्या नोटा मोजल्या ..इतक्या नोटा एकरकमी पाहून तिची नजर चळली ..अर्थात ते आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते ..घरी येताच आईने पाठीत एक धपाटा घातला ..म्हणाली ' शेन खायची इच्छा व्हतीय ना ..मग पहिले माझ्याशी रिश्ता तोड ..आपल्या गरिबाकडे हेच एकमात्र धन असते ..तू ते गमावू नकोस ..मी गेली दोन वर्षे हे काम करतेय ..मातर कोणाला भिक घातली नाय ..आन तू चळलीस कार्टे नोटा पाहून " मग आई धाय मोकलून रडली ..तिला पोटाशी धरून बराच वेळ बसून राहिली ..तेव्हापासून रखमीने आईचा मान राखला होता ..तरुण्याचा भार सांभाळत इज्जत जपली होती ..आपण भले कि आपले काम भले याच हिशोबाने ती राबत राहिली ..
पुढे आई कष्टाने खंगत गेली ..टी बी चे निमित्त होऊन एके दिवशी गेली दोन पोरी न दारुडा नवरा उघड्यावर टाकून ..आई गेल्यावर तर बापाने कामावर जाणे देखील सोडून दिलेले .धुणीभांडी करण्याचे काम तिने वारसाहक्काने स्वतःकडे घेतले ..पूर्वी आईच्या जीवावर दारू पिणारा बाप आता लेकीच्या जीवावर दारू पिवू लागला ..लहान बहिण वयात आली तशी तिचीही शाळा सुटली ..उगा लाडे लाडे बोलत नट्टा पट्टा करू लागली ..रखमीने तिला समाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा पिंड वेगळा निघाला .शेवटी एकाचा हात धरून पळून गेली ...तिला शिव्या घालत बापही दारू पिवून एकेदिवशी थंडगार पडला ...
टीप ..कथेतील शिव्या या प्रसंगाला आणि पात्रांना अनुसरून आल्या आहेत ..!
( बाकी पुढील भागात ..अनेक दिवस अनुभवलेल्या सत्यकथा लिहिल्या आहेत ..हे कथाबीज असेच एका सत्यकथेवर आधारित आहे )