Saturday, November 1, 2014

काफिर ! ( भाग दोन )


आपल्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करणार नाहीत याची खात्री झाल्यावर तर उस्मान अधिकच निर्धास्त झालेला ..त्याला धार्मिक ..सामाजिक आणि इतर पद्धतीने देखील असलम शेठ ने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता ..पण परिणाम शून्य ..तात्पुरता तो सारे ऐकून घेई ..मान डोलावून सगळे समजत आहे असे भासवी ..आणि बोलणे संपले की सगळे विसरून देखील जाई ..असलमशेठची खात्री पटत चालली होती की याच्या मनात सैतानाने प्रवेश केलेला आहे ..याच्या बुद्धीवर सैतानाचे आधिपत्य आहे ..तो सैतान काढून टाकल्याशिवाय हा भानावर येणार नाही ..इमान ..फर्ज ..इबादत ..वगैरे याच्यापुढे व्यर्थ आहे ..अल्लाने दिलेल्या अनमोल शरीराची देखील याला किंमत उरलेली नाहीय..शेवटी असलमशेठ ने पुढाकार घेवून फातिमा बेगमना खूप भलेबुरे सुनावले ..त्याला पैसे देशील तर खबरदार ..एकदा फातिमा बेगमने त्यांच्याखातर मनावर दगड ठेवून उस्मानला पैसे देण्यास नकार दिला ..तेव्हा त्याने खूप गोंधळ घातला ..माझा हिस्सा ..माझा संपत्तीतील वाटा ..वगैरे बोलून सगळ्यांनाच दुखावले ..तरीही सगळे ठाम राहिले ..मग कटकट करत हा बाहेर निघून गेला आणि दोन तासात उस्मानला घेवून घरी पोलीस हजर ..त्यांनी म्हणे उस्मानला दमदाटी करून एका माणसाकडून पैसे लुबाडतांना पकडले होते ..म्हणजे आता हा घरी पैसे मिळाले नाहीत ..तर बाहेर चोऱ्या करणार ..लोकांना लुबाडणार ..एखादे दिवशी जेल मध्ये जाणार ..उस्मानच्या जेल मध्ये जाण्याच्या कल्पनेनेच असलमशेठना घाम फुटला होता ..समाजात आपली केवढी बदनामी होणार ..कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही आपल्याला ..त्यांनी उभी हयात इमानइतबारे घालवली होती ..कधी कोणाशी भांडण नाही ..कोणाला दुखावणे नाही ..इतकेच काय त्यांनी कधी शिवी देखील दिली नव्हती कोणाला ..' अल्लाचा नेक बंदा ' म्हणूनच सगळे त्यांना ओळखत असत ..त्या दिवशी असलमशेठने विनंती करून उस्मानला पोलिसी कारवाई पासून वाचवले होते ..पोलिसांना देखील असलमशेठच्या घरी असे अपत्य निपजावे याचे वैषम्य वाटले होते..
उस्मानच्या बाबतीत मात्र आपण फर्ज निभावण्यात कमी पडलो असे हल्ली त्यांना वाटत होते ..हा पोरगा काही आपल्याला मेल्यावर आपल्याला ' जन्नत' लाभू देणार नाही याची खात्री पटत चालली होती ..मेल्यावर ' जन्नत ' तर सोडाच ..जिवंतपणी याने आपले जीवन ' दोजख ' ( नर्क ) करून टाकले आहे या विचाराने ते अवस्थ होत असत ..हल्ली कसेही करून सगळ्या घरादाराला कलंक असणाऱ्या या सैतानाचा निकाल लावलाच पाहिजे असे विचार त्यांच्या मनात घर करू लागले होते ..हा विचार मनात येताच त्यांचा थरकाप होई ..आपली औलाद सैतान आहे सत्य जाणवले की ते अधिक अधिक बैचैन होत असत ..त्यानाही ब्लडप्रेशर चा त्रास होऊ लागला ..दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणाऱ्या उस्मानचे काय करावे हे मोठेच कोडे होते .. वारंवार फातिमा बेगमना ताकीद देवूनही त्या काही मन कठोर करू शकत नव्हत्या ..उस्मानला पुन्हा जबरदस्ती का होईना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे हे काही फातिमा बेगमच्या पचनी पडत नव्हते ..फातिमा बेगमनी कोठून तरी एका पीर बाबाची माहिती आणली होती ..त्या बाबाने दिलेले मंतरलेले पाणी सुद्धा उस्मान च्या नकळत त्याला पाजून झाले ..अजमेर शरीफला जावून ' मन्नत ' मागून झाली ..कोण काय सांगेल ते करायला असलमशेठ तयार झाले होते पोरासाठी ..प्रचीती येते असा बोलबाला असलेल्या सगळ्या दर्ग्यांवर हजेरी लावून झालेली ..
अलीकडे तर असलमशेठ च्या घरात सतत कटकटी होत होत्या ..मोठे भावू वारंवार असलमशेठशी भांडू लागले होते..याला घरातून हाकलून द्या म्हणून त्यांनी लकडा लावला होता ..याच्यामुळे आमची देखील बदनामी होतेय ..याचे भावू म्हणवून घ्यायला आम्हाला लाज वाटते ..तुम्ही हो म्हणाल तर एकदा याच्या दोन्ही तंगड्या तोडतो ..म्हणजे लंगडा बनून घरात बसून राहील..मग नशा करायला बाहेर जाता येणार नाही याला असा सरळ सरळ हिशोब केला होता भावांनी..त्यासाठी दोनचार महिने जेल मध्ये देखील जायची तयारी होती दोन्ही भावांची ..त्यांची मुले मोठी होत होती ..त्यांना भीती वाटे की याची सावली आपल्या मुलांवर पडली तर ते देखील बिघडतील ..ते मुलांना उस्मान घरात असताना खालच्या मजल्यावर अजिबात येवू देवू नसत ..उस्मानला वाटे की सगळे उगाच माझ्याशी वैर करतात ..मला वेगळे वागवतात ..या विचाराने तो अधिकच बेभान होई ..डोके फिरले की घरात नको नको त्या शिव्या देई ..फेकाफेक करी ..धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था झालेली सगळ्यांची !
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment