Wednesday, November 5, 2014

आखरी अदालत ! ( भाग एक )


बंदी उघडली तसा नेहमीप्रमाणे रमेश सर्कलच्या गेटजवळ जावून बसला ...आपल्याला कोणी भेटायला येतेय का ? घरून काही निरोप येतोय का याची वाट पाहत ..खरेतर मुलाखत घेण्याची वेळ सकाळी १० नंतर सुरु होई ....इतक्या सकाळी कोणी भेटायला येणे शक्यच नव्हते तरी रमेश सकाळी ६ वाजता बॅरॅकचे दरवाजे उघडले की असा गेटसमोर जावून बसे ..ही ब्याद सकाळी सकाळी आली म्हणून पहाऱ्यावरील वार्डनने रमेशला पाहून शिव्या हासडल्या आणि त्याला हाकलले ..मग हताश पणे रमेश चहाच्या लाईनीत लागलेल्या कैद्यांमध्ये गेला ...भिशीतून चहा घेऊन येणारे आले .. तशी लाईनीत एकच गोंधळ उडाला...धक्काबुक्कीत रमेश बाजूला फेकला गेला ..त्याने पुन्हा लाईनीत जाण्याचा प्रयत्न केला नाही ..तसाच विमनस्क उभा राहिला ..चहा वाटप होऊन गेले ..सगळे कैदी अंघोळ व इतर विधी करण्यासाठी आवारात पांगले तरीही रमेश तसाच विमनस्क उभा होता ..एका वार्डन ने त्याला हटकले आणि त्याच्या हाती खराटा देवून त्याला सगळे आवार झाडण्याचे काम दिले ..निमुटपणे रमेश खराटा घेवून यंत्रवत आवारात पडलेली वाळकी पाने ..आणि इतर कचरा झाडू लागला..बिडीचे थोटूक दिसताच ते काळजीपूर्वक उचलून खिश्यात ठेवू लागला..बराच वेळ रमेशला निरखत असलेला एक म्हातारा कैदी त्याच्या बाजूच्या कैद्याला म्हणाला " बेचारा फालतू में मर्डर केस मे फस गया है..अब घरवाले ना तो जामीन दे रहे है..ना मिलने आ रहे है ..बरबाद हो गया पुरा "
रमेश एका चांगल्या खात्यापित्या कुटुंबातील मुलगा ..वडिलांचा किराणा दुकानाचा व्यवसाय ..त्यांनी प्रगती करून एका वडिलोपार्जित दुकानाची दोन दुकाने केलेली .. नेटका संसार ..आर्थिक संपन्नतेमुळे वडिलांनी मुलांना शहरातील महागड्या कॉन्वेंट मध्ये दाखल केले होते शिक्षणासाठी ..मोठा सुरेश ...बहिण मीना आणे धाकटा रमेश ..तिघेही कडक इस्त्रीचे पांढरे कपडे घालून शाळेत जायला निघाले की वडिलांचा उर अभिमानाने भरून येई ..फाळणीनंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून आलेले हे कुटुंब ..कसातरी जीव वाचवून कंगाल अवस्थेत भारतात आलेले ..नंतर कष्ट करून नव्याने उभारी घेवून दहा बारा वर्षातच महाराष्ट्रात स्थिरावलेले ..मोठा सुरेश आणि मीना दोघेही शाळेत रमले ..मात्र धाकटा रमेश इयत्ता आठवीपासून बिघडला ..शाळेला दांड्या मारू लागलेला ..वर्गातील नेमके बिघडलेले मित्र निवडून त्यांच्या सोबत मस्ती फिरू लागला ..दहावीपर्यंत कसेतरी शिकला.. दहावीला अडकला ..अभ्यासात डोके चालेनासे झालेले ..दोन तीन वेळा दहावी पास होण्याचा लटका प्रयत्न करून...शेवटी शिक्षण सोडून देवून एका मित्राच्या गॅरेज मध्ये जावून बसू लागलेला..वडिलांच्या दुकानाच्या व्यापामुळे त्यांना सगळीकडे लक्ष देणे एकंदरीत कठीणच होते ..रमेश मित्राच्या स्कूटर मोटारसायकल दुरुस्त करण्याच्या गॅरेजमध्ये हळू हळू दुरुस्तीचे काम शिकत गेला ..त्याबरोबरच धुम्रपान आणि अधूनमधून दारू प्यायला देखील शिकला ..मुळचा हुशार असल्याने लवकरच तो दुरुस्तीच्या कामात तरबेज झाला ..वडिलांनी भांडवल घालून त्याला स्वताचे गॅरेज सुरु करण्यास मदत केली ..अल्पावधीत मृदू भाषा ...कल्पक डोके यामुळे नामवंत मॅकेनिक म्हणून नाव कमावले त्याने ..क्वचित दारू पिणारा रमेश आता आठवड्यातून एकदा तरी दारू पिवू लागला ..कधी कधी जास्त वेळा ..
योग्य वयात आल्यावर वडिलांनी मोठ्या भावाप्रमाणे रमेशचे देखील लग्न लावून दिले ..बारावीपर्यंत शिकलेली उषा घरात धाकटी सून म्हणून आली ..रमेश नंतर मुलगी मीनाला सुस्थळी पाठवून वडील निर्धास्त झाले ..सुरेश वडिलांच्याच दुकानात मदत करू लागला ..या सर्व सुखाला गालबोट म्हणजे रमेशचे दारू पिणे ..वडिलांनी एकदोन वेळा खूप रागावल्यावर रमेश ने दारू सोडून ..तोंडाला वास न येणारी.. कोणाला लवकर समजू शकणारी नशा निवडली..तो आता गांजाच्या अड्ड्यावर जावू लागला ..आणि तेथेच एकेदिवशी त्याने ब्राऊन शुगरची देखील चव घेतली ..रमेशचे गॅरेज त्यावेळी ऐन भरात होते ..रोज किमान पाचशे रुपये तरी कमावत असे तो .. रमेश रोज ब्राऊन शुगर ओढू लागला ..तोवर रमेश आणि उषाच्या संसारात दोन गोंडस मुले आलेली ..महेश आणि संगीता ...उषा खुश होती आपल्या संसारात.. कारण तोवर तिला रमेशच्या व्यसनाची झळ पोचलेली नव्हती ..रमेश भरपूर पैसे कमावत होता ..व्यसने वगैरे धंदे बाहेरच परस्पर भागवत होता ..उलट घरात देखील पैसे देत होता ..मात्र व्यसन वाढत गेले तसे.. पैश्यांची कमतरत भासू लागली ..रमेशला पैसे पुरेनासे झाले ..घरात पैसे देणे बंद केले त्याने ..वडिलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी रमेशला फैलावर घेतले ..बाहेरून आडून पाडून माहिती घेवून हा काय काय धंदे करतो त्याची माहिती घेतली तेव्हा त्यांना समजले की हा व्यसनी झालाय इतकेच नव्हे तर ब्राऊन शुगर सारखे भयानक व्यसन करतोय ..निर्व्यसनी असलेल्या वडिलांनी ताबडतोब रमेशला पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले..
( बाकी पुढील भागात 

No comments:

Post a Comment