Saturday, November 1, 2014

काफिर ! ( भाग तीन )


उस्मानचे नेमके काय करावे हा मोठाच प्रश्न होता सगळ्या कुटुंबांपुढे ..अल्लाच्या कृपेने घरात समृद्धी होती मात्र शांती नव्हती ..रोज नमाज पढतांना असलमशेठच्या मनात हटकून उस्मानचा विचार येत असे ..त्यांची एकाग्रता भंग होई ..अल्लाची इबादत करताना मन एकाग्र करणे कठीण होऊ लागले ..आज पहाटेच झोपमोड झाल्याने नंतर ते झोपू शकले नव्हते ..सकाळ उलटून गेली तरी असलमशेठ अंथरुणात आहेत हे जाणवून फातीमाबेगम त्यांना उठवायला आल्या तेव्हा त्यांना असलमशेठ जागेच आढळले ..जागरणाने त्यांचे डोळे लाल होऊन सुजल्यासारखे झालेले .." या अल्ला ..आपकी तबियत तो ठीक है ? " काळजीने त्यांनी पतीच्या डोक्याला हात लावून पहिला ..ताप नव्हता अजिबात ..मग त्यांच्या लक्षात आले ..हा उस्मान बद्दलचा मनस्ताप आहे .. " अभी तो वो नादान है ..उसकी शादी कर देंगे तो आ जायेगा ठीकानेपर " फातीमाबेगमचे हे बोलणे ऐकून असलम शेठ भडकले " बेगम आप ही के लाड प्यार ने उसे बिगाडा है..जब देखो तब उसे नादान कहेती हो ..उसकी शादी कर देंगे तो पराये घर की लडकी की जिंदगी बरबाद कर देगा ये ..आप एक बार हा कहेदो तो उसे अभी उठवाकर नशामुक्ती केंद्र में भरती करवा देंगे " असलमशेठ ने व्यसनमुक्ती केंद्राचा विषय काढला ..ते ऐकून फातिमाबेगमचा चेहरा उतरला ..त्यांना आठवले मागच्या वेळी उस्मानला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असताना ..भेटायला गेलो होतो तेव्हा उस्मान ने त्यांना धमकी दिली होती .." आप मुझे यहाँ से तुरंत ले चलो ..वरना मेरा मरा मुँह देखना पडेगा ..मै खुद्खुशी कर लुंगा .." मुलाचे हे बोलणे ऐकून त्या मातेचे हृदय पाघळले होते ..त्याच्या हट्टापुढे मान तुकवावी लागली होती ..उस्मान लहानपणापासून जिद्दी ..हट्टी स्वभावाचा होता ..तो बोलतोय तसे खरेच करेल या वर त्या माउलीचा विश्वास बसला ..तेथील समुपदेशकाने त्यांना खूप समजावले की " सिर्फ आपको डराने के लिये खुद्खुशी की बात कर रहा है ..हमारे लोग अच्छेसे खयाल रखेंगे के उस्मान ऐसा ना करे " तरीही फातीमाबेगम ने त्याला घरी नेण्याचा हेका सोडला नव्हता ..त्या वेळी असलाम शेठ म्हणाले होते " वैसे भी तो ये नशा करके खुद्खुशी ही कर रहा है..रोज तिलतिल मर रहा है ..साथ में पुरे परिवार को भी घसीट रहा है..उससे अच्छा के एक बार में मर जाये " हा सगळा संवाद आठवून त्या पाणावलेल्या डोळ्यांनी तेथून निघून गेल्या ...असलमशेठ एक सुस्कारा टाकत उठले अंथरुणातून ...
दिवसभर असाच अवस्थतेत गेला ..उस्मानला कशाशीही देणे घेणे राहिले नव्हते ..तो नेहमी प्रमाणे त्याची वेळ झाल्यावर घराबाहेर पडला... संध्याकाळी नेमका असलम शेठ नमाज पढताना घरात आला ..फातीमाबेगम कडे पैसे मागू लागला ..त्यांनी नकार दिल्यावर याने आरडा ओरडा सुरु केला ..ते ऐकून मोठा भाऊ हुसेन खालच्या मजल्यावर आला ..तो उस्मानला रागावू लागला ..आवाज वाढले ..हुसेनची बेगम देखील खाली आली ..प्रयत्न पूर्वक या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असलम शेठ नमाज पढत राहिले ...दोन्ही भावात शिवीगाळ सुरु झाली होती ..शेवटी न राहवून असलमशेठ ने डोळे उघडले ..समोर भिंतीवर बंदूक लटकत होती ..तरुणपणी शिकारीचा शौक होता असलमशेठना ..तसेच शेतात आलेली रान डुकरे हाकलण्यासाठी ते पूर्वी बंदुकीचा वापर करत असत ..हवेत बार काढून रान डुकराना पळवणे सोपे जाई ..हा पोरगा आता तसाच सुव्वर झालाय ..याला हाकलण्यासाठी बंदूकच हवी ..हा विचार मनात येताच असलमशेठ क्षणभर बावरले ..हे भलतेच काय ..स्वताच्या मुलावर बंदूक..मन द्विधा झाले होते ..इकडे उस्मानचा गोंधळ सुरूच ..नमाज पढताना विघ्न आणणारा हा काफिर संपायलाच हवा ही भावना तीव्र होत गेली ..
आता दोघे भावू एकमेकांना भिडले होते ..हाथापाई सुरु झालेली दोघांची ..हुसेनची बेगम ..फातिमा बेगम यांचे किंचाळणे ..लहान पोरांची रडारड ..तुंबळ माजले होते घरात ..आपल्या सारख्याच्या घरी हे रणकंदन सहन होईना असलमशेठना ..तिरमिरीत ते उठले ..भिंतीवरची बंदूक खेचून बाहेरच्या हॉल मध्ये आले ..त्यांच्या या एन्ट्रीने सगळेच एकदम घाबरले .." अब्बू ..आप जाने दिजीये .." हुसेन बापाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता ..मात्र आता काफिर संपलाच पाहिजे हा निर्धार पक्का होता असलमशेठचा ..बंदूक वर झाली आणि धडाडली..थेट उस्मानच्या छातीवर ....अविश्वासाने अब्बुंकडे पाहत उस्मान खाली कोसळला ..बंदूक खाली टाकून असलमशेठ धाय मोकलून रडू लागले ..काय झालेय हे लक्षात येताच फातिमा बेगम उस्मानच्या कलेवराकडे धावल्या . हुसेन बापाकडे धावला ..शेवटी उस्मानचा करुण अंत झाला ..आपल्या कृत्याबद्दल असलमशेठना अजिबात पश्चाताप नव्हता ..आपण एक सैतान संपवला याचे समाधान वाटत होते त्यांना ..नाहीतरी तो नशा करून ..सर्वनाश करून घेवून ..तडफडून टाचा घासत.. कुत्र्याच्या मौतीने मरणारच होता ..त्या ऐवजी मी त्याला एका झटक्यात संपवले अशी त्यांची खात्री ...असलमशेठ जेल मध्ये जायला ..फासावर चढायला तयार होते ..
ही घटना आहे १९९३ -९४ च्या सुमाराची ..नंतर दोन्ही भावांनी वडिलांना शिक्षा होऊ नये म्हणून जिवाचे रान केले ..हा अपघात आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न केला ..उस्मानच्या डोक्यावर परिणाम झालेला होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ..या केसचे पुढे काय झाले ते माहिती नाही मला .!

No comments:

Post a Comment