आमच्याकडे स्वतःहून उपचारांना दाखल होतोय म्हंटल्यावर मला त्या तरुण मुलाचे कौतुकच वाटले .. गोरा वर्ण ..चेहऱ्यावर दारूच्या नियमित सेवनामुळे आलेली ..पटकन लक्षात येईल अशी लालसर सूज ..सहा फुटांच्या आसपास उंची ..अंगावरचे उंची कपडे ..तसेच उंची घड्याळ ..गळ्यात सोन्याची चेन ..एकंदरीत प्रकरण मालदार असल्याची सारी चिन्हे ..सोबत त्याची आई होती ..कपाळावर कुंकू नसलेली ..सधारण पन्नाशीची ..याच्या कडे दिसणारी समृद्धीची लक्षणे मात्र तिच्या अंगावर दिसत नव्हती ..साधी साडी ..गळ्यात मण्यांची माळ ...मात्र बोलण्यातून समृद्धी अनुभवल्याचे जाणवत होते ..मी अॅडमिशन फॉर्म भरायला घेतला ..त्या तरुणाला नाव ..गाव ..पत्ता वगैरे विचारू लागलो..तो खूप प्यायलेलाच होता .. त्याची सहायक असल्यासारखी त्याची आईच उत्तरे देत गेली . ..सोबत एक मोठी बॅग भरून सामान होते ...तो सिव्हील इंजिनियर असल्याचे समजले ..वय साधारण पंचविशीचे ..आवश्यक माहिती घेवून झाल्यावर मी त्याची आणि त्याची आईची फॉर्मवर सही घेतली .,,त्याच्या आईला जायला सांगितले ..त्याचा निरोप घेताना तिचे डोळे भरून आले ..आम्हाला हा अनुभव नेहमीचा असतो ..व्यसनीला उपचार केंद्रात दाखल करायला सोबत स्त्रिया आल्या असतील तर त्या हमखास रडतात .." आप चिंता मत किजीये ..हम पुरा खयाल रखेंगे उनका ..असा तिला धीर देण्याचा प्रयत्न केल्यावर ..म्हणाली " इसके पहेले कभी हमसे दूर नही रहा है वो ..इसलिये चिंता होती है..मै इसे थोडी पिने के लिये मना नही करती ..लेकीन ये जादा पिता है..बिलकुल मानता नही किसीकी ..इसका बडा भाई मुंबई में रहेता है..उसने भी बहोत समझाया ..इसके पिताजी गुजर जाने के बाद से जादा ही पिने लगा है....आईचे परक्या व्यक्तीसमोर असे गहिवरून रडणे त्याला पसंत पडले नसावे ..त्याने नापसंतीदर्शक मान हलवली ..तिने धरून ठेवलेला त्याचा हात सोडवून घेतला ..त्याला मी आमच्या कार्यकर्त्या सोबत वार्डात जायला सांगितले ..
...त्याची लांबच्या प्रवासाला नेतात तशी चाके असलेली भरगच्च भरलेली बॅग तो आतमध्ये नेवू लागताच मी त्याला थांबवले .." आपका सारा सामान..बाद में मिल जायेगा आपको..चेकिंग होने के बाद " हे त्याला आवडले नाही ..बॅग आत्ताच आत घेवून जातो असा हट्ट करू लागला .आमचे सामानाबाबत बोलणे एकूण जायला निघालेली त्याची आई मागे वळली ..म्हणाली .." सामान उसे अभी दे दिजिये ....बाद में क्यो ? " आम्ही दाखल झालेल्या व्यक्तीचे घरून आलेले समान पूर्ण तपासूनच आत पाठवतो ..कारण त्यात अनेक किमती तसेच धोकादायक वस्तू असू शकतात ..उंची परफ्युम्स ..डीओडरंटस ..आफ्टरशेव स्प्रे ..दाढी करण्यासाठीच्या कीट मध्ये असलेले ब्लेडचे पाकीट सर्वात जास्त खतरनाक असते ..त्या ब्लेडचा वापर करून काही लोक स्वतःला तसेच इतना इजा करू शकतात....लवकर घरी सोडले जावे म्हणून त्यांचे हे ' इमोशनल ब्लॅकमेल " असते तसेच काही आफ्टरशेव स्प्रे मध्ये सौम्य प्रमाणात अल्कोहोल असते ..एखादा व्यसनी त्या वासाने ती स्प्रे ची अख्खी बाटली पिवून टाकण्याचा धोका असतो ..काही उंची सामान वार्डात गहाळ होण्याची भीती असते ..अनुभवातून आलेल्या या शहाणपणा मुळे आम्ही सामान पूर्ण तपासूनच वार्डात पाठवतो .बॅग आत्ताच आतमध्ये नेतो हा हट्ट तो सोडेना ..त्याची आई देखील त्याला दुजोरा देवू लागली ..मला थोडा संशय आला हा हट्ट पाहून ..ठीक है..अभी चेक करके देता हु आपको असे म्हणत मी त्याची बॅग तपासायला घेतली ..माझ्या अंदाजाप्रमाणे उंची वस्तू होत्याच आतमध्ये ..एकदम तळाला हात घातल्यावर मी चमकलो ..एक मोठी बाटली लागली हाताला ..मी ती बाहेर काढली व्हिस्कीचा भरलेला सीलपॅक खंबा ..मी बाटली बाहेर काढताच त्याने बाटली वर झडप घातली ..माझ्या हातातून बाटली काढून घेतली ..ये मुझे लगेगी ..असे म्हणू लागला .." बाबा रे तू व्यसन मुक्ती केंद्रात व्यसन सोडण्यासाठी आलेला आहेस ..तुला आम्ही दारूची भरलेली बाटली आत कशी नेवू देणार ...तू हे सगळे बाहेरच संपवून येथे यायला हवे होतेस..असे मी त्याला समजावू लागलो ..त्याच्या आईला सांगितले तसे की त्याला तुम्ही आत्ता घरी घेवून जा ..पूर्ण बाटली संपवल्यावर या परत घेवून ..यावर ती अगतिक पणे म्हणाली की ' बाटली लेकर दी उसे तभी वो अॅडमिट होने के लिये तैयार हुवा है ..वैसे तो वो आनेके लिये तैयार नही था .. म्हणजे याच्या स्वतःहून येथे दाखल होण्याचे रहस्य हे होते तर ..' देखिये कोई भी चीज एकदम नही बंद कर सकते है ना....इसे ये थोडी थोडी दे देना तीनचार दिन ..फिर खतम हो जायेगी ' त्याची आई मला समजावू लागली ..यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले ..उनको शराब ना मिलने के कारण कोई भी शारीरिक मानसिक परेशानिया होगी उसके लिये हम दवायें देते है .. शराब जरुरी नही होती है ..
तिला तत्वतः माझे बोलणे पटत होते ..मात्र मुलाबद्दलचे प्रेम आडवे येत होते ..तो दारू पिण्याच्या निमित्ताने एकदा बाहेर गेला की परत इथे यायला तयार होणार नाही असे तिचे म्हणणे पडले ..त्याला कसातरी बाबापुता करून तिने व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत आणले होते ..त्यामुळे ती त्याला परत न्यायला देखील तयार होईना ..शिवाय त्याला इथेच आफिस मध्ये बसून पिवू द्या असा हट्ट करू लागली .. अतिशय अगतिक पणे ती माझ्याकडे पाहत राहिली ..मी पेचात पडलो ..शेवटी त्याची नाही पण मला तिची दया आली ..मी त्याला आॅफीस मध्ये बाजूला कोपऱ्यात बसून ती बाटली संपवण्यास परवानगी दिली ..तो आनंदून मला ग्लास मागू लागला ..मी त्याला एक पाणी पिण्याचा स्टीलचा ग्लास आणि पाण्याची बाटली दिली ..कांच का ग्लास नही है क्या असे विचारत माझ्या उत्तराची वाट न पाहता तो अधीरतेने बाटली उघडू लागला ..पाउण ग्लास दारू आणि अगदी थोडे पाणी टाकून त्याने अधाश्या सारखा ग्लास तोंडला लावला ..दोन दमांत ग्लास संपवला देशी दारू पितात तसा ..मग जीन्सच्या मागच्या खिश्यात हात घालून ..छोटे खारे दाण्याचे पाकीट काढून त्यातील दाणे मजेने खावू लागला ..त्याची आई न मी दोघेही त्याच्याकडे हतबल होऊन पहात होतो..वाटले बाटली हिसकावून घ्यावी चार कार्यकर्ते बोलावून याला सक्तीने वार्डात पाठवावे ..पुन्हा त्याच्या आईचे भरलेले डोळे पाहून मी स्वतःला आवरले ..त्याला जबरदस्ती वार्डात नेले असते तर ती धाय मोकलून रडली असती नक्कीच !
( बाकी पुढील भागात )
No comments:
Post a Comment