Thursday, November 6, 2014

आखरी अदालत ! ( भाग दोन )


पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रात एक महिना उपचार घेवून रमेश बाहेर पडला तेव्हा त्याची तब्येत छान झाली होती ..त्याचे व्यसन पुन्हा सुरु होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तेथील समुपदेशकांनी रमेश ला काही पथ्ये सांगितली ..तसेच वडिलांना आणि पत्नीला देखील त्याच्यावर कसे नीट लक्ष ठेवायचे या बद्दल मार्गदर्शन केले ..काही दिवस बरे गेले ..मात्र जुन्या व्यसनी मित्रांना अजिबात भेटायचे नाही हे पथ्य काही रमेशच्या पचनी पडेना ..त्याच्या अनेक रिकामटेकड्या व्यसनी मित्रांचा अड्डा म्हणजे रमेशचे गॅरेज होते ..गॅरेज सुरु झाल्यावर काही दिवसातच व्यसनी मित्र पुन्हा तेथे जमू लागले ..रमेश ला त्यांना येथे येवू नका हे सांगणे काही जमले नाही ..आता ब्राऊन शुगर सोडलीय मात्र थोडी दारू प्यायला हरकत नाही असा मित्रांचा आग्रह रमेशला मोडता आला नाही ..पुंन्हा दारू तोंडाला लागली ..मग काही दिवसात पुन्हा ब्राऊन शुगर ..सहा महिन्यातच रमेश पूर्वपदावर आला ..काम करणे जीवावर येवू लागले ..पैसे कमी पडू लागले ..घरात रोज कटकटी सुरु झाल्या ..वडिलांनी पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले ..रमेशची पत्नी उषा गोंधळून गेली होती ...आपण नेमके काय केले म्हणजे नवरा व्यसनमुक्त राहील हे तिला समजेना ..हळू हळू मुले मोठी होत होती ..त्यांच्या भविष्याचा विचार करणे भाग होते तिला ..एकत्र कुटुंब असल्याने घरखर्च परस्पर भागात होता ..परंतु मुलांचा गरजांसाठी वारंवार सासऱ्याकडे पैसे मागणे अथवा दिरांकडे पैसे मागणे तिला प्रशस्त वाटेना ..स्वताचा काहीतरी व्यवसाय सुरु करावा म्हणून तिने महिलांच्या तयार कपड्यांची विक्री घरातच सुरु केली ..त्यात साड्या..पंजाबी ड्रेस .वगैरे गोष्टी होत्या ..सासऱ्याने तीला भांडवल दिले होते ..रमेश व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर काही काळ चांगला राही ..परंतु काही दिवसातच मूळपदावर येई ..असे सुमारे सहा वेळा झाले ..
नंतर घरातील कटकटी वाढल्या म्हणून वडिलांनी रमेशला वेगळे घर करून दिले ..ते घर पत्नीच्या नावावर घेवून दिले त्यांनी ..मोठा मुलगा पाहता पाहता दहावीला गेला ..उषा कसातरी व्यवसाय करून घरखर्च चालवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती ..मात्र रमेशचे व्यसन सुरु झाले की ती गोडीगुलाबीने ..दमदाटी करून ..भांडून तिच्याकडील सर्व पैसे काढून घेई .. व्यसनात उडवे..उषाच्या माहेरहून तिचा भावू तिला थोडीफार मदत करी ..मात्र स्वताचा नवरा असा नालायक आहे आणि आपल्याला मुलांच्या पालन पोषणासाठी माहेरची मदत घ्यावी लागते हे काही उषाच्या मनाला पटेना ..परंतु तिचा नाईलाज होता ..रमेशला वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्याचे वडील देखील वैतागलेले ..एके दिवशी त्यांनी स्पष्ट सांगितले ..आता मी तुला काहीही मदत करणार नाही ..तुझा संसार तूच सांभाळ ..मुले मोठी होत आहेत..आत्ता जर सावरला नाहीस तर मग आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल ..रमेशचे बेफाम वागणे सुरूच होते ..उषाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात एक बाब बरी होती की रमेश कितीही भांडण झाले तरी तिला मारझोड वगैरे करत नसे कधी ..तो फक्त तिच्याकडे पैसे दे म्हणून लकडा लावत असे ..तिने पैसे दिले नाहीत तर तिच्या नकळत घरातील एखादी वस्तू चोरून नेई ..ती विकून आपले व्यसन भागवत असे ..बाहेर चोऱ्या करण्याइतके धैर्य त्याच्याकडे नव्हते ..रमेशची तव्ब्येत खालावू लागताच किवा त्याचा त्रास वाढला की आता त्याच्या वडिलांऐवजी ती पुढाकार घेवून रमेशला ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करू लागली ..त्यासाठी माहेरहून पैसे आणावे लागत असत तिला ..असे दोन वेळा झाले ..एव्हाना रमेशने त्याचे गॅरेज विकून टाकले होते ..व मित्राच्या गॅरेज मध्ये काम करू लागला होता ..ते देखील अनियमित असे ..हळू हळू उषा निराश होत होती ..रमेशच्या वागण्याने ती वैफल्यग्रस्त झाली होती ...हल्ली तिचीदेखील चिडचिड वाढली ..कधी कधी ती आपला राग मुलांवर काढू लागली ..हसतमुख उषा दुर्मुखली ..पुढे कसे होणार ही चिंता सतत मन पोखरत होती ..या निराशेच्या भरात एकदा तिने पाहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला ..सुमारे वीस पंचवीस फुटांवरून खाली पडल्याने जबर दुखापत झाली ..जीव वाचला परंतु पाय मोडला ..उजवा पाय जायबंदी झाला ..काही काळ कुबड्यांच्या आधारावर जगणे नशिबी आले ..नंतर एका हाती काठी घेवून तिला चालता येवू लागले .
या प्रकारानंतर सासऱ्यांनी शेवटची संधी म्हणून रमेशला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दखल केले ..या वेळी समुपदेशकाने रमेशला बजावले .." बाबारे तुझी व्यसन करण्याची जिद्द सोड .तू थोड्या प्रमाणात कधीही व्यसन करू शकत नाहीस हे मान्य कर ..प्रयोग बंद कर .. कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे हेच आता तुझ्या हाती शिल्लक आहे ..तुझ्या व्यसनामुळे आता पत्नीच्या जीवावर बेतले होते ..बिचारीच्या नशिबी आता कायमचे अपंगत्व आलेय ..जोवर तुझ्या सुधारणेसाठी माणसे प्रयत्न करत आहेत तोवर भानावर ये ..जेव्हा निसर्ग यात दाखल देईल तेव्हा फार मोठे नुकसान होईल ..तुझा नाहीतर दुसऱ्या कोणाचा तरी जीव जाईल शेवटी ..मग सक्तीने व्यसन बंद करावे लागेल तुला ..शिवाय तेव्हा व्यसन सोडल्यावर देखील जे गमावशील ते पुन्हा कधीही भरून निघणार नाही हे ध्यानात ठेव " रमेशने यंत्रवत मान डोलावली होती तेव्हा ..बाहेर पडल्यावर पहिले पाढे पंचावन्न ..आता मुलांचा शाळेचा खर्च परवडत नाही म्हणून उषाने दहावीनंतर मुलाला शाळा सोडून काकाच्या किराणा दुकानात बसायला सांगितले ..काका हळू हळू याला दुकानदारीत तरबेज करेल मग त्याला एखादा छोटा व्यवसाय काढून देता येईल या आशेने ..अतिशय हुशार मुलगा वडिलांच्या व्यसनामुळे शाळा सोडून दुकानात बसू लागला ..त्याचा पगार तुटपुंजा असला तरी तेव्हढाच उषाला हातखर्चाला आधार होता ..
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment