Friday, October 31, 2014

काफिर ! ( भाग एक )


असलम शेठचा नुकताच डोळा लागला होता ..बाहेर एकदम कुत्र्यांचा कालवा झाला ...तारस्वरात काहीतरी अघटीत घडत असल्याची बोंब ठोकत होती कुत्री ..त्यांच्या कर्कश्य भुंकण्याने असलम शेठची झोप चाळवली ..बंगल्याचे दार उघडून ते अंगणात आले ..अंगणात लावलेल्या बल्बच्या प्रकाशात त्यांना एक जण बंगल्याच्या गेट वर चढलेला दिसला ..." आ गया नालायक " असे स्वतःशी पुटपुटत ते पुढे झाले ..त्यांना पाहून उस्मान क्षणभर थबकला ..मग गेटवरून उडी मारून आत आला ..मान खाली घालून उभा राहिला .." तो अब अपनेही घर मी चोरो जैसे घुसनेकी बारी आ गई जनाब ? " असलमशेठ च्या या प्रश्नार्थक उपहासावर उस्मान कडे काहीच उत्तर नव्हते ..तो नुसताच शुंभासारखा उभा राहिला ..दारातून शेठ बाजूला होण्याची वाट पाहत ..." आप घर में रातभर नही आते तो भी कोई फर्क नही पडता .." शेठच्या या बोलण्याने दुखावल्या सारखा असलम त्यांच्याकडे रोखून पाहू लागला ...तितक्यात मागून लगबगीने फातिमा बेगम बाहेर आल्या ..बाप लेकांची पुन्हा खडाजंगी होणार हे ओळखून सारवा सारव करू लागल्या .." बेटा समय पे घर आया करो ..हम सब इंतजार करते रहेते है आपका ..चलो अंदर चलकर खान खावो " असे म्हणून त्यांनी उस्मानला हात धरून घरात आणले ..हताशपणे असलम शेठ मागे फिरले ..पुन्हा बेडवर येवून झोपेची आराधना करू लागले ..बाहेर सगळ्या पंचक्रोशीत दबदबा असलेले असलम शेठ उस्मान प्रकरणात हतबल झाले होते ..उस्मान त्यांचे तिसरे अपत्य ..पहिल्या दोन मुलांनंतर सुमारे दहा वर्षांनी झालेले शेंडाफळ ..लहानपणापासून खूप लाडात वाढलेला ..पढाईत खूप हुशार ..बोलण्यात चतुर ..दिसायला देखणा उस्मान गेल्या चार वर्षांपासून मात्र बिघडला होता ..घरातील अनियमितता वाढली होती ..वारंवार पैसे मागणे ..रात्री बेरात्री घरी येणे ..रागावल्यास डोळ्याला डोळा भिडवून उलट उत्तरे देणे ..हे बदल असलम शेठची चिंता वाढवणारे होते ..त्यांनी फातिमा बेगमला या बद्दल पूर्वीच सावध केले होते ..त्याचे फालतू लाड करू नकोस असे बजावले होते ..मात्र उस्मानची अम्मी पुत्रप्रेमाने आंधळी झाली होती ..सगळेच आपल्या उस्मानला रागावतात ..हिडीसफिडीस करतात ..म्हणून तो असा वागतो असे त्यांना वाटे ..
असलम शेठ म्हणजे गावातले बडे प्रस्थ होते ..पिढ्या नु पिढ्या चालत आलेली जमीनदारी ..घरात पैश्यांची काही कमतरता नाही ...नोकरचाकर ..मान मरातब ..घरातील धार्मिक वातावरण ..उस्मान सोडून सगळे जण पाच वेळा नमाज पढून " अल्ला " ची करुणा भाकणारे...असलम शेठचे वय झाले तसे मोठ्या दोघांनी शेतीवाडीत लक्ष घातले होते ..अब्बुंची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती .. गेल्या दोन चार वर्षात हट्टी आणि जिद्दी असणारा उस्मान बिघडलाय हे सर्वप्रथम मोठ्या भावाच्या हुसेनच्या कानावर आले होते ..हुसेनच्या मित्राने त्याला उस्मान गावातील बियरबार मध्ये दिसला असे सांगितले..त्याच दिवशी हुसेनने उस्मानला फैलावर घेतले होते ..कुराण शरीफ मध्ये ' शराब ' हराम आहे असे म्हंटले आहे हे त्याला सांगितले ..उम्मानने तेवढ्यापुरते मोठ्या भावाचे ऐकून घेतले ..मात्र त्याच्या वर्तनात काही बदल झाला नाही ..तेव्हाच हुसेनने घरात बजावले होते ..याला अजिबात पैसे द्यायचे नाहीत ..हा बाहेर पैसे उडवतो ..हराम गोष्टींवर पैसा खर्च करतो वगैरे ..परंतु फातिमा बेगम चोरून लपून उस्मानला पैसे पुरवत असत .घरात इतकी समृद्धी असताना ..पोराला दोनचार रुपयांसाठी कोणाकडे हात पसरव लागू नये असे त्यांना मनापासून वाटे ..शराब हराम आहे हे वारंवार सांगितल्यावर एकदा हुसेन ने उस्मानला ' अल्ला ' चा वास्ता दिला ..तेव्हा काही दिवस बरे गेले ..नंतर उस्मान शराब ऐवजी गांजाच्या अड्ड्याकडे दिसला असे हुसेनला समजले ..पुन्हा हुसेन लहान भावाला रागावला ..तेव्हा " कुराणशरीफ में सिर्फ शराब हराम लिखा है ..गांजा नही " असे विचित्र उत्तर दिले होते उस्मानने .." सभी प्रकार की नशा हराम मानी जाती है " असे समजावून देखील उस्मान काही सुधारत नव्हता ..एकदा तर दोन्ही मोठ्या भावांनी मिळून उस्मानला गुरासारखा बडवला होता ..घरात दोन दिवस बांधून ठेवला होता ..त्यावेळी फातिमा बेगम आजारी पडल्या ..त्यांनीही दोन दिवस अन्न ग्रहण केले नव्हते ..शेवटी अम्मी पुढे हतबल झाल्याने दोन्ही भावांनी उस्मानला रागावणे सोडले होते ..ते दोघेही आपापला संसार घेवून वरच्या मजल्यावर राहायला गेले ..खालच्या मजल्यावर असलमशेठ ..फातिमा आणि उस्मान असे तिघेच राहू लागलेले ..असलम शेठनी दोन तीन वेळा उस्मानला समज देण्याचा प्रयत्न केला ..उस्मान उलट उत्तरे देतो .आपला मान ठेवत नाही हे लक्षात आल्यावर ते व्यथित झाले होते ..अलीकडे उस्मान ब्राऊन शुगरच्या नादी लागलाय असे ही त्यांच्या कानावर आले होते ...
एकदा प्रेमाने बोलून त्यांनी उस्मानला गळ घातली..व्यसनमुक्ती केंद्रात भरती होण्याचा आग्रह केला ..त्याला गोडी गुलाबीने मुंबईला नेले ..तेथील नामवंत व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले..आता उस्मान सुधारेल अशी त्यांना आशा होती ..तेथे तीन महिन्यांचा कोर्स होता ..परंतु पंधरा दिवसांनी सगळे कुटुंब उस्मानला भेटायला गेले तेव्हा..उस्मानने रडारड केली..घरी घेवून चला असा हट्ट केला ..शपथा घेतल्या ..फातिमा बेगमचे दिल पाघळले ..उस्मानला घरी घेवून जावू असा त्यांनी देखील आग्रह केला ..तेथील समुपदेशकांनी फातिमा बेगमला खूप समजावले..याला पूर्ण उपचार घेवू द्या म्हणून ..परंतु शेवटी फातिमा बेगमच्या हट्टापुढे कोणाचेही काहीच चालले नाही ..एकतर फातिमा बेगमना हल्ली ब्लडप्रेशरचा त्रास सुरु झाला होता ..त्यांच्या मनाविरुद्ध झाले तर ब्लड प्रेशर वाढून त्यांच्या जीवाला धोका होईल या भीतीने ..उस्मानला घरी आणावे लागले होते..घरी आल्यावर चार पाच दिवसातच उस्मान पुन्हा बाहेर जावू लागला होता ...त्याच मित्रांमध्ये जावून ब्राऊन शुगर ओढू लागला होता ..आता काही केल्या तो व्यसनमुक्ती केंद्रात जायला तयार होत नव्ह्ता ..त्याला जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याच्या आड फातिमा बेगमचे पुत्रपेम येत होते .
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment