Monday, October 27, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग एक )


" आमाला बी फटाकडे हवेत " म्हणून पोरांनी दोन दिवसांपासून उच्छाद मांडलेला ..रखमीचा जीव मेटाकुटीस आला होता ..आज तर सकाळधरणं सहा वर्षाच्या राजाने रडारड सुरु केलेली ..मातीत बसकण मारून ' ' फटाकडे पायजे' चा जप ...येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांकडे तो केविलवाण्या नजरेने पाहत ..नाक न डोळे एकाच झटक्यात पुसत ...तो हातपाय मातीत आपटून ..वेगवेगळ्या सुरात बोंबलत होता ..त्याचे रडण्याला दुजोरा म्हणून त्याच्यापेक्षा एक वर्षांनी लहान असलेली चिंगी देखील त्याच्या रडण्याला पाठींबा देत त्याच्याच बाजूला बसून झोपडपट्टीच्या समोर रस्त्यावर लावलेल्या फटाकड्याच्या दुकानाकडे आशाळभूतपणे पाहत बसली होती..." काय बे मादरचोद ..तुला फटाकडे हवेत व्हय रे .." अशी सुरवात करून झोपमोड झालेल्या सदाने लाखोली सुरु केली तसा रखमीचा जीव धस्तावला .." उतरली भाड्याची दारू .." असे मनातल्या मनात म्हणत तिने पदर कमरेला खोवला .. पोराच्या रक्षणास सज्ज झाली ..
सदा काल मध्यरात्री ढोसून आलेला ..आल्या आल्या दमून भागून पोरांना पोटाशी घेवून गाढ झोपलेल्या रखमी वर त्याने हक्काने हात टाकला होता ..उगा जवळ ओढून इकडे तिकडे झोंबू लागला तशी तिने त्याला ' पोर जागी व्हतील ." .असे म्हणत तिरस्काराने दूर ढकलले .." तूला रोज वेगवेगळे लागत असतीन ...छिनाल ..अशी कचकचीत शिवी हासडत त्याने तिच्या पोटात गुद्दा लगावला ..तोंड दाबून ती घुसमटून विव्हळली.. मग मेल्यागत गपगार पडून राहिली ..एव्हाना सदाचाही आवेश संपून तो घोरू लागलेला ..त्याची अन सवताची कापडं नीट करून..टक्क डोळ्यांनी पडून राहिली होती ..राहून राहून तिला मोठ्याने हंबरडा फोडून रडावेसे वाटत होते ..तिचा बाप दारूनेच गेलेला ..बाप गवंडीकाम करत असे ..दोन्ही पोरी झाल्या म्हणून तो मायला नेहमी शिव्या घाली ...पोरगा होत नाही या दुखा;त त्याने दारू पिण्यास सुरवात केलेली ..तिची माय पण आपण नव-याला मुलगा देवू शकलो नाही या अपराधी भावनेने त्याचे सगळे अत्याचार सहन करी ..ती वयात आली तसे बाप येताजाता उरावर बसून फुकट खातेस असे टोमणे मारू लागलेला ..शेवटी सातवीत शाळा सुटली ..दिवसेंदिवस बापाचे पिणे वाढले ..आधी पैसा .मग आईच्या गळ्यातील डोरले ..पितळी भांडी गेली दारूच्या पायी ..मग भाड्याची खोली सोडून ते लहानग्या खोपटात रहायला आलेले ..आई आसपासच्या सोसायटयात धुणे भांडी करायच्या कामाला जावू लागली ..रखमीला ती मदतनीस म्हणून सोबत नेई ..तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रखमीला किमान दोनचार घरातून जुने कपडे मिळत गेले ..वयात आल्यावर तिला लोकाच्या घरी धुणी भांडी करण्यास जाण्याची लाज वाटू लागली ..जेथे जेथे ती जाई तेथील पुरुष आपल्या बायकांचा डोळा चुकवून रखमीला निरखत असत... हे लक्षात आल्यावर तर ती अजूनच बावरली ..हे लोक चांगल्या नटलेल्या सजलेल्या बायका असून देखील आपल्यासारख्या कडे पाहतात या भावनेने मोहरली देखील ..एकदा एकाने तिच्या आईची पाठ आहे पाहून उगाच तिच्या समोर पाकीट उघडून आतल्या नोटा मोजल्या ..इतक्या नोटा एकरकमी पाहून तिची नजर चळली ..अर्थात ते आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते ..घरी येताच आईने पाठीत एक धपाटा घातला ..म्हणाली ' शेन खायची इच्छा व्हतीय ना ..मग पहिले माझ्याशी रिश्ता तोड ..आपल्या गरिबाकडे हेच एकमात्र धन असते ..तू ते गमावू नकोस ..मी गेली दोन वर्षे हे काम करतेय ..मातर कोणाला भिक घातली नाय ..आन तू चळलीस कार्टे नोटा पाहून " मग आई धाय मोकलून रडली ..तिला पोटाशी धरून बराच वेळ बसून राहिली ..तेव्हापासून रखमीने आईचा मान राखला होता ..तरुण्याचा भार सांभाळत इज्जत जपली होती ..आपण भले कि आपले काम भले याच हिशोबाने ती राबत राहिली ..
पुढे आई कष्टाने खंगत गेली ..टी बी चे निमित्त होऊन एके दिवशी गेली दोन पोरी न दारुडा नवरा उघड्यावर टाकून ..आई गेल्यावर तर बापाने कामावर जाणे देखील सोडून दिलेले .धुणीभांडी करण्याचे काम तिने वारसाहक्काने स्वतःकडे घेतले ..पूर्वी आईच्या जीवावर दारू पिणारा बाप आता लेकीच्या जीवावर दारू पिवू लागला ..लहान बहिण वयात आली तशी तिचीही शाळा सुटली ..उगा लाडे लाडे बोलत नट्टा पट्टा करू लागली ..रखमीने तिला समाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा पिंड वेगळा निघाला .शेवटी एकाचा हात धरून पळून गेली ...तिला शिव्या घालत बापही दारू पिवून एकेदिवशी थंडगार पडला ...
टीप ..कथेतील शिव्या या प्रसंगाला आणि पात्रांना अनुसरून आल्या आहेत ..!
( बाकी पुढील भागात ..अनेक दिवस अनुभवलेल्या सत्यकथा लिहिल्या आहेत ..हे कथाबीज असेच एका सत्यकथेवर आधारित आहे )

No comments:

Post a Comment