Monday, October 27, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग दोन )


बाप गेल्यावर रखमी सर्वार्थाने एकटी पडली ..तिला इतक्या वर्षात इतर कोणी नातलग माहितीच नव्हते ..लहानपणीच बाप म्हणे दारीद्र्याला वैतागून गाव सोडून मुंबईला निघून आलेला ..मुंबईत राबत ..घाम गाळत..लाचारीने मोठा झालेला..एका गवंड्याच्या हाताखाली गवंडीकाम शिकून तयार झाला .. त्याच गुरुकडून याला दारूचा वसा मिळालेला ..त्याच्याच पोरीशी पाट लावून संसारी झालेला ..इतकीच स्टोरी रखमीला माय कडून समजली होती ..बाप गेल्यावर ती खूप सैरभैर झाली ..दहा दिवस घराबाहेर पडलीच नाही..झोपडपट्टीतल्या शेजारयानीच बापाचे सर्व विधी उरकले ..त्या खर्चासाठी तिने चार घरी धुणेभांड्याचे आगावू पैसे घेवून ..अंगावर कर्ज देखील करून ठेवलेले..बाप जाता जाता आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली टाकून गेला हे लक्षात आल्यावर तिने कंबर कसली कष्ट वाढवले ...बाप गेल्यावर तिला एक जाणवले ..बाप जिवंत असे पर्यंत मर्यादेने वागणारे .आता उघड उघड सलगी करू पाहू लागले ..येता जाता तिची ख्याली खुशाली विचारू लागलेले ..वर काही कमी जास्त झाल्यास मदत करण्याची एका पायावर तयारी असल्याचे सांगू लागले ...ती रहात असलेल्या झोपडपट्टी पासून ते ज्या घरी काम करी तेथील पुरुषांपर्यंत सगळ्यांची तीच तऱ्हा..फक्त तिला भुलवण्याचे मार्ग वेगवेगळे ..तिने मन खंबीर केलेले होते ..कोणत्याही अमिषाला बळी पडायचे नाही ..बाजूला राहत असलेल्या ...अनेक उन्हाळे काढलेल्या..मात्र आता सर्वच दृष्टीने निरुपयोगी ठरलेल्या म्हातारीने तिला सल्ला दिला .." पोरी लवकर एखादा चांगला मुलगा पाहून पाट लावून घे त्याच्याशी..नाहीतर वाऱ्यावर उडालेल्या कागदा सारखे नाचावे लागेल तुला वारं येईल तसे..कसा का असेना शरीराला मालक हवा ..एखाद्या अवघड क्षणी निसर्ग डाव साधेल मग कायमच हरत जाशील ..म्हातारीच्या सल्ला तिच्या मनात रुजला होता ..जाता येता चौकात दिसणाऱ्या सदा वर तिची नजर रेंगाळली ..पार ती नजरेआड होईपर्यंत तो तिला निशब्द पहात असे ..हा बाजूच्या झोपडपट्टीत राहणारा ड्रायव्हर म्हणून काम करतो हे तिला तिच्या मैत्रिणीकडून समजले होते ..एके दिवशी धाडस करून सदाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ..तिने देखील तोंड न वेंगाडता त्याला प्रतिसाद दिला ..
आयुष्यातले धुंद दिवस सुरु झाले ..स्वप्नवत असलेले..जीव ओवाळून टाकावेसे वाटणारे ..याच क्षणांच्या बदल्यात सारे आयुष्य उन्हाळा सहन करण्याची ताकद मिळावी असे मंतरलेले दिवस ...त्याच धुंदीत तिने सदाशी पाट लावून घेतला ..तिच्या झोपडीतील किडूक मिडूक सामान त्याच्या खोपटात सामावले गेले ..कधी नव्हे ते रखमा सिनेमाला जावू लागली ..पहिल्यांदा अंगावर दुकानात जावून विकत घेतलेले नवे कोरे कपडे आले ..असे दोन वर्ष गेल्यावर राजाचा जन्म झाला ..मग वर्ष भरात चिंगी ..मात्र या चिमुकल्यांच्या प्रवेशासोबत झोपडीत अधेमध्ये दारूचा आंबूस वास यायला सुरवात झाली ..रखमीने सदाला सावध केले ..ही दारू संसाराचे वाटोळे करते हा मोलाचा सल्ला दिला ..पण सदाने पुरुषी बेफिकीरीने तो सल्ला धुडकावला ..मग तिने शपथ घातली ..स्वताची ..मग पोरांची ..शपथे नंतर काही दिवस चांगले जात मात्र लवकरच सदाला आपल्याच काय पोरांच्या देखील शपथेची किंमत राहिली नाही हे ती उमगली ..मग तिने राग दर्शविला ..बडबड केली तसे ..सदा देखील प्रत्युत्तर देवू लागला ..एकमेकांची उणी दुणी काढणे सुरु झाले ..सदाच्या रूपाने जणू काही आपला मेलेला बापच परत आलाय की काय असे वाटू लागले ..पुढे पुढे सदा अंगावर हात टाकू लागला ..अगदी लाथा बुक्क्यांनी तुडवी लागला तिला ..सात जन्माची वैरीण असल्यासारखी तिला वागवू लागला ..ती मार खाई तरी देखील त्याला बोलणे सोडत नव्हती ..आपल्या लेकरांचे भविष्य अंधारात आहे हे जाणवून ती भेदरली होती ..कसेही करून दारूला याने सोडचिट्ठी द्यावी म्हणून तिने कोण काय सांगेल ते उपास तापास केले .. नवस बोलली..परंतु सदा दिवसेंदिवस जास्तच बिथरत चालला होता ..हल्ली तर त्याने तिच्या चारीत्र्या वर चिखलफेक करणे सुरु केलेले ..त्याच्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाने तिला मळमळल्या सारखे होई म्हणून ती त्याच्यापासून अंतर वाढवू लागली ..तसे तू बाहेर उंडारतेस ..पासली पडतेस..घरचे सोडून बाहेर पोट भर खातेस वगैरे बोलू लागला ..ती कामावर निघाली की उपहासाने हसू लागला ..तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देवू लागला ..तिला वाटले आपल्याला माहेर असते तर किती बरे झाले असते ..किमान रागाने माहेरी जाता आले असते ..पण या दारुनेच तिचे माहेर हिरावले होते ..रडत खडत दिवस चालले होते ..अनेकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत ..पण आपल्या मागे पोरांचे काय हाल होतील या धास्तीने ती ते विचार परतवून लावी ..एकदा तिने भांडी घासता घासता घरच्या मालकिणीला आपली व्यथा सांगितली ..त्या मालकिणीने सरळ पोलिसात जा ..तक्रार कर नवऱ्याची असा सल्ला दिला ..तिला ते प्रशस्त वाटले नाही तरीही एकदा प्रयोग म्हणून ती जवळच्या चौकीत गेली ..तेथे नवरा मारतो ..शिव्या देतो वगैरे सांगितले ..तर हा तुमचा घरगुती मामला आहे ..असे सांगून तिची बोळवण केली गेली ..कोणाच्या तरी सांगण्यावरून ती कौटुंबिक सल्ला केंद्रात गेली ..तेथे आपले रडगाणे गायले ..तेथील बाईने रीतसर तक्रार घेतली ..नवऱ्याला समज देऊ असे सांगून एक पोलीस पाठवला तिच्या सोबत सदाला दम द्यायला ...त्या नंतर दोन दिवस बरे गेले ..नंतर सदा पुन्हा पिवून आला ..या वेळी तर तू धंदा करतेस ..पोलिसांना तंगड्या देतेस ..वगैरे बोलला ..ती तशीच अंधारात पोलीस स्टेशनला गेली ..पोलिसांनी त्याला पकडून नेले ..एक दिवस कोठडीत डांबून ..दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले ..तेथे नवऱ्याने कान पकडले ..सर्वांची माफी मागितली ..त्याला सोडले गेले ..पुन्हा तेच ..
शेवटी आता आपले भोग आहेत हे ..भोगूनच संपवले पाहिजेत या विचाराने ती चूप बसली .. तिला मार खायची सवय पडली ..मात्र निष्पाप पोरांवर सदा हात उचलू लागला तेव्हा ती वाघिणी सारखी चवताळली ..पोरांचे रक्षण करू लागली ..आज सकाळी सकाळी राजाने फटाक्यांची मागणी सुरु केली होती ..सदाच्या पिण्यापायी घरात पैसा थांबत नव्हता ..त्याची नोकरी सुटलेली ..तिच्या धुणी भांड्याचे पैसे तो तिच्याकडून हिसकावून नेई .जेमतेम दोन वेळा पोटभर अन्न मिळत होते .. पोराला फटाके आणू कुठून हे तिला समजत नव्हते ..पोराच्या हट्टाने ती फटाकड्याच्या द्काना पर्यंत जावून आलेली ..चार सुरसु-यांची ची पेटी पन्नास रुपये ..ही किंमत ऐकून परत मागे फिरली ..आता एखाद्या घरी पुन्हा आगावू पैसे मागून किमान पोराला सुरसूरया तरी घेवून देवू असा विचार केला होता तिने ..पण राजाला आताच्या आत्ता फटके हवे होते ..पोर आपल्यामागे मार खाईल या विचाराने ती दोन्ही पोरांना सोबत घेवून कामावर जायला निघाली ..सदा मागे शिव्या देत राहिला..त्याच्याकडे दुर्लक्ष करून..
( बाकी पुढील भागात )

No comments:

Post a Comment