Wednesday, October 29, 2014

दिवाळीची दैना ! ( भाग तीन )


रखमी एकूण पाच घरी काम करी ..सगळीकडे धुणे आणि भांडी ..आठवड्यातून एकदा फरश्या पुसणे हा बिनपगारी ओव्हरटाईम..आज उद्विग्न अवस्थेत होती ती ..कामाच्या ठिकाणी पोरांना घेवून जायला तिला आवडत नसे ..कारण तेथे पोरे उगाच मालकिणीच्या घरातील वस्तून हात लावत असत ..त्यावेळी त्यांच्या नजरेतील अप्रूप तिला आवडत नसे..तसेच घरातील माणसे देखील सारखी पोरांना इथे नको हात लावू ..अरे ते तुटेल ..फुटेल ..असे रागवत असत ..एक दोन ठिकाणी तर मालकिणीने तिला सरळच सांगितले होते की पोरांना इथे आणू नकोस..आम्हाला उगाच लक्ष ठेवावे लागते त्यांच्या कडे ..एकदा राजाने एका घरातला चेंडू उचलून आणला होता खेळता खेळता ..त्य दिवशी तिने राजाला मार मार मारले .दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नाही..असे न सांगता न विचारता वस्तू उचलली तर ती चोरी असते हे त्याला चांगलेच उमगले..तेव्हापासून राजाने स्वतःहूनच तिच्या सोबत जाणें नाकारले होते..आज मात्र नाईलाजाने तिला दोन्ही पोरे घेवून निघावे लागले होते कामावर ..प्रत्येक घरी दिवाळीची धूम होती चांगलीच ..मुलांना नवीन कपडे ..नवीन वस्तू ..घरात गोडधोड ..पाहुणे रावळे..रखमीचे काम देखील वाढलेले ..भांडी घासता घासता रखमीला राहवले नाही.. तिने हळूच घरच्या मालकिणी कडे आगावू पैसे मागितले ..दिवाळी आहे पोरांना फाटके आणायचे आहेत हे सांगितले ..आधीच रखमीच्या अंगावर पैसे होते त्यांचे ..पोरांना फटाके आणायचे आहेत म्हंटल्यावर मालकिणीने तोंड कसेनुसे केले ..म्हणाली " अग किती प्रदूषण होते त्या फटाक्यांनी....नुसता पैश्यांचा धूर सगळीकडे ..तुम्हा लोकांना कधी समजणार निसर्गाचे महत्व ? " रखमीने नुसतीच लाचारीने मान डोलावली ..कालच त्या मालकिणीच्या पोरांनी रखमीला आम्ही या वेळी पाच हजार रुपयांचे फटके आणलेत हे सांगितलेले आठवले रखमीला ..पण ती काहीच बोलली नाही ..शेवटी मालकिणीने तिला दोनशे रुपये दिले ..वर सल्ला दिला उगाच फटाके आणू नका याचे त्यापेक्षा काहीतरी गोड धोड खा ..संध्याकाळी फटाके फोडताना राजाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाचे स्वप्न पाहत रखमीने मान हलवून होकार दिला ..
दुपारी घरी आल्यावर संध्याकाळी फटाके घेवू म्हणून तिने ते पैसे साखरेच्या पुडीत लपवले ..हल्ली सदा पैश्यांसाठी सगळे घर धुंडाळत असे ..शेवटी तिच्या कपड्यात हात घालून लपवलेले पैसे देखील काढून नेत असे..हे आठवून तिने या वेळी पैसे नीट नवीन जागेत लपवले होते ..सदाची दिवाळी सकाळपासूनच सुरु झालेली ..पिवून मस्त होऊन तो बाजूच्या दारुड्या मित्राशी काहीतरी बडबड करत बसला होता ..रखमी तावातावाने पोरांना घेवून कामावर गेली तेव्हाच त्याने ताडले होते की आता ही नक्की पोराच्या फटाक्यासाठी आगावू पैसे घेवून येणार ..त्याने तिच्या नकळत तिला पैसे लपवताना हेरले ..आणि तिचे लक्ष नसताना ते पैसे काढून पुन्हा बाहेर सटकला ..संध्याकाळी जेव्हा रखमीला पैसे गायब झाल्याचे समजले तेव्हा तिचा तिळपापड झाला ..रागाने वेडीपिशी झाली ती ..इकडे राजा आणि चिंगीची फटाके हवेत म्हणून कटकट सुरूच होती .सदाला शिव्या घालत ती या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधात होती ..गेली चाळीस वर्षे या दारूने तीला जगणे नकोसे केलेले ..आधी बाप नंतर नवरा ..सदा आला की त्याला जाब विचारायचा..आज सगळा हिशोब करायचा हे ठरवत होती ..बाहेर अंधारून आलेले ..फटाक्यांचे आवाज ..हर्षोल्हास..कोलाहल ..राजा आणि चिंगी आसुसलेल्या डोळ्यांनी ते पाहत होते ..मधून मधून रखमीकडे फटाक्यांचा लकडा लावत होते ..अगतिक रखमी शेवटी त्यांना समजावून थकली ...दोन धपाटे घातले दोघांना ..मग रडत्या पोरांना तिनेही रडतच उराशी कवटाळले .. झोपडीत तेवणाऱ्या चिमणीच्या प्रकाशात तिघेही स्तब्ध बसून राहिले .. हलणाऱ्या चिमणीच्या ज्योतीबरोबर त्याच्या सावल्या भयाण होऊन हलत होत्या ..
कोणाला तरी शिव्या घालत ..बडबडत अडखळत सदा घरात शिरला तेव्हा रखमी त्याच्या अंगावर ओरडली ..वाट्टोळ केलस मुडद्या तू माह्यावालं..पोराच्या फटाक्यांचे पैसे पण नेलेस त्या दारूच्या मढयावर घालायला ..किडे पडतील तुला ..सदा पण तिला शिव्या देवू लागला ..तिच्या अंगावर चालून गेला ..पोरांची रडारड सुरु झाली ..बाहेरच्या फटक्यांच्या आवाजात यांचा कोलाहल ..आज रखमीच्या अंगात दहा हत्तीचे बळ चढलेले ..त्यांच्या झटापटीत धक्का लागून चिमणी विझली ..अंधारात ओरडण्याचे..धडपडीचे..आवाज ..मग सदाची अस्फुट किंचाळी .. एकदम सगळा कोलाहल शांत झाला ..रखमीने चाचपडत चिमणी लावली ..रक्ताच्या थारोळ्यात सदा निपचित पडला होता ..बाजूलाच झटापटीत रखमीच्या हाती आलेला वरवंटा..रखमी भानावर येवून पोरांना ओढत बाहेर पडली..वाट फुटेल तशी चालत राहिली ..स्टेशनवर समोर असलेल्या गाडीत बसली ..भेदरून पोरे तिला चिटकून बसली होती ..दुसऱ्या दिवशी पंचनाम्याला आलेल्या पोलिसांना सदाच्या दारुड्या मित्राने माहिती पुरवली .. वर्तमान पत्रात बातमी आली .. अनैतिक संबंधातून नवऱ्याच्या खून...नवऱ्याने अनैतिक संबंधांचा राग येवून जाब विचारल्याने रागावून पत्नीने त्याच्या डोक्यात वरवंटा मारून त्याचा खून केला ..आरोपी दोन मुलांसह फरार ..पुढील तपास सुरु आहे .
( समाप्त )

No comments:

Post a Comment