Friday, January 16, 2015

विरक्त ? ? ( भाग तिसरा )


नारायणचे सुमारे पंचवीस हजार रुपये कुठे गेले असावेत हे एक कोडेच होते ..त्याचे खिसे आम्ही वारंवार तपासले..त्यालाही अनेक प्रश्न विचारले तरी याचे उत्तर एकच..मालूम नही..याद नही .बहुतेक याला दारू खेरीज झटपट लॉटरीचे अथवा जुगाराचे व्यसन असावे आणि हा त्यात पैसे हरला असावा ..किवा बाहेर एखाद्या स्त्री सोबत अनैतिक संबंध असतील तिला हे पैसे दिले असावेत असे आम्हाला वाटले ..तशी शंका आम्ही त्याच्या पत्नीजवळ बोलून दाखवली ..यावर तिने त्याला जुगार अथवा लॉटरीचे अजिबात व्यसन नाही हे तिने ठामपणे सांगितले ..अनैतिक संबंधांची शंका तर तिने हसून उडवून लावली ..म्हणाली त्याच्यात असे काही करण्याचे गट्स नाहीत..तसे धाडस देखील नाही ..मी माझ्या नवऱ्याची मजल कुठपर्यंत जाईल हे चांगले ओळखून आहे ..अर्थात प्रत्येक स्त्री ला आपल्या नवऱ्याची मजल कुठवर जाऊ शकते हे चांगलेच माहिती असते ..तिचे एकच म्हणणे होते की तुम्ही त्याची झडती नीट घ्या ..त्याने नक्की हे पैसे लपवून ठेवले आहेत कुठेतरी ..तो पगारातले पैसे नेहमी असे लपवून ठेवून नंतर व्यसनासाठी वापरतो ..शेवटी आम्ही त्याची पूर्ण कपडे काढून झडती घेतली ..तेव्हा त्याच्या अंडर वेअर मध्ये लपवून ठेवलेले एकोणीस हजार रुपये सापडले ..आम्ही थक्कच झालो ..आम्ही समजतो तितका हा बावळट नव्हता तर ..दारूच्या व्यसनामुळे येणारा विशिष्ट धूर्तपणा त्याच्याही अंगी उतरला होता ..एकदाचे पैसे सापडल्यावर पत्नीने निश्वास सोडला ...या उपचारांच्या वेळी पत्नीने नारायणच्या वरिष्ठांना भेटून तीन महिन्यांची बिनपगारी राजा मंजूर करून घेतली होती ...पहिल्या महिन्यात याने उपचार घेताना जरा टंगळमंगल केली ..मात्र दुसऱ्या महिन्या पासून गंभीरपणे उपचारात सहभागी होऊ लागला ..मानसोपचार तज्ञांची देखील औषधे सुरु झाली नियमित ..मात्र त्याचे रिफ्लेक्सेस अजूनही नीट नव्हते ..साधे हो किवा नाही असे उत्तर द्यायचे असेल तरी तो इतके अंगविक्षेप करी की समोरच्या व्यक्तीला वाटे हा खूप काहीतरी बोलणार आहे ..पाहता पाहता त्याच्या उपचारांचे तीन महिने पूर्ण झाले ..त्याला डिस्चार्ज न देता येथून मैत्रीतुनच कामावर जावू द्यावे..कामावरून सुटल्यावर त्याने परत घरी न जाता मैत्रीतच यावे अजून काही दिवस अशी योजना आम्ही त्याच्या बाबतीत बनवली त्याच्या पत्नीची संमती होतीच ..त्या नुसार त्याला चांगला दम देवून कामावर जाण्यास परवानगी दिली ..कामावरून सुटल्यावर इकडे तिकडे न भटकता ..सरळ मैत्रीत यायचे असे नीट डोक्यात घातले त्याच्या ..त्याच्या पत्नीने त्याची स्कूटर आणून दिली कामावर जाण्यासाठी तसेच रेल्वेच्या कॅन्टीन मध्ये त्याचे नाश्त्याचे आणि दुपारच्या जेवणाचे पैसेही भरले ..अजून काळजी म्हणून त्याचे आणि त्याच्या पत्नीचे बँकेत जाॅइन्ट अकाऊन्ट उघडून त्याचा पगार त्या खात्यावर जमा होईल अशी सोय केली ..त्याने या साठी थोडी कुरकुर केली ..नंतर मान्यता दिली ..आम्ही रोज त्याला हात खर्चासाठी पाच रुपये देत असू ..परंतु हा इतका कंजूष कि ते पैसे तसेच परत आणत असे ..दारू सोडल्या पासून जणू त्याच्या साऱ्या इच्छा आकांक्षाच मरून गेल्या होत्या
नियमित सकाळी साडेसात वाजता तो सेंटरहून बाहेर पडे कामावर जाण्यासाठी ..सायंकाळी पाचला ऑफिस सुटले की सहा वाजेपर्यंत सुरक्षित सेंटरला परत येवू लागला ..त्याचे ऑफिस सेंटर पासून बारा किलोमीटर दूर होते ..अशी नोकरी दोन महिने सुरळीत झाली ..याच्या वेंधळेपणात आणि विसरभोळेपणात मात्र फारसा बदल होत नव्हता ..तसेच तो स्वतच्या राहणीमाना बाबत देखील फारसा जागरूक नसे ..शर्टाचे बटन तुटले आहे हे कोणीतरी सांगितल्याशिवाय त्याच्या ध्यानी येत नसे.. किवा त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही असे त्याला वाटे ..कामावर देखील याचा वेंधळेपणा माहित असल्याने त्याला जास्त जवाबदारीचे काम न देता शिक्के मारणे ..पत्रे डिस्पॅच करणे अशा प्रकारची सोपी कामे दिली जात ..आम्ही त्याला अनेकवेळा तू एखादा सेलफोन घे असा आग्रह केला ..परंतु त्याबाबत देखील तो उदासीन होता ..भर थंडीत त्याला एखादे जॅकेट अथवा स्वेटर घातले पाहिजे याचे भान नसे ..चपलेचा अंगठा तुटलाय ..नवीन चप्पल घ्यायला हवी याची दुसऱ्याने आठवण करून द्यावी लागे ..एकदा गम्मत झाली ..रात्रीचे आठ वाजले तरी हा कामावरुन सेंटरला परत आला नाही ..आम्हाला वाटले झाले...केली याने गडबड ..बहुतेक दारू प्यायला असावा परत ..आम्ही त्याच्या घरी फोन करून तो तेथे आलाय का अशी विचारणा केली तेव्हा पत्नीने नकार दिला ..मग आम्ही त्याला शोधायला बाहेर पडलो ..त्याच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर ..सुमारे आठ किलोमीटर दूर गेल्यावर हा गडी त्याची स्कूटर ढकलत घेवून येताना वाटेत भेटला ..किरकोळ प्रकृतीचा नारायण स्कूटर ढकलून घामाघूम झाला होता ..त्याला खूप दम लागला होता ..तरी हळू हळू मुंगीच्या वेगाने सेंटरकडे कूच चालली होती ..त्याला काय झाले विचारल्यावर स्कूटर बंद पडलीय असे उत्तर दिले त्याने ..अरे मुर्खा इतक्या दूर स्कूटर ढकलत आणण्या पेक्षा वाटेत स्कूटर एखाद्या मॅकेनिक कडे देवून सरळ ऑटो करून सेंटरला यायचे होतेस की असे आम्ही म्हंटल्यावर तो गोंधळाला ..अरे ..हे आपल्या लक्षातच आले नाही असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते ..तो स्कूटर तशीच ऑफिसला ठेवून देखील ऑटो करून सेंटरला येवू शकला असता .मात्र योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमताच नष्ट झालेली ..हे महाशय सुमारे बारा किलोमीटर स्कूटर ढकलत आणणार होते ..शिवाय एखादा फोन करून सेंटरला किवा घरी आपण अडचणीत आहोत हे कळवणे देखील त्याला सुचले नव्हते ..कठीणच होते एकंदरीत ..
नारायण असा एक वर्षभर सेंटरहून कामावर गेला ..नंतर दर शनिवारी रविवारी आम्ही त्याला घरी जाण्यास परवानगी दिली ..ते देखील त्याने नीट पाळले ..पुढे आठवडा भर घरी राहून शनिवार रविवारी सेंटरला यायचे असे सांगितले ते देखील विनातक्रार केले त्याने..आता सध्या त्याच्या व्यसनमुक्तीची सहा वर्षे पूर्ण होत आहेत ..तो घरीच राहतो ..परंतु वागण्यात फारसा बदल झालेला नाही असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे ..घरी हा एखाद्या पाहुण्या सारखा राहतो ..फारसा कोणाशी बोलत नाही ..पत्नी देखील रेल्वेत दुसऱ्या विभागात नोकरी करते ..याने घरातील किरकोळ कामे केली पाहिजेत अशी तिची अपेक्षा असते ..परंतु याला ते सुचत नाही ..पत्नीला वारंवार त्याच त्याच गोष्टी सांगण्याचा कंटाळा येतो ..कामावरून घरी गेला कि याचा आवडता उद्योग म्हणजे किशोर कुमारची गाणी लावून ऐकत बसतो ..सेटरला असताना देखील तो म्युझिक थेरेपी मध्ये आवर्जून सहभाग घेत असे ..त्याचे पेटंट गाणे म्हणजे " आनेवाला पल ..जानेवाला है " थोडा बारीक आणि चिरका आवाज असूनहि तो अगदी तन्मयतेने हे गाणे म्हणत असे ..मुलाचा आभ्यास..स्वता:चे रहाणीमान..नीटनेटकेपणा.कुटुंबांसोबत सिनेमा ..हॉटेलिंग..फिरायला जाणे वगैरे गोष्टीत त्याला अजिबार रस उरलेला नाही ..हल्ली त्याचा स्कूटर चालवण्याचा आत्मविश्वास पण संपलाय ..तो ऑटोने जातो कामावर .. अशा वागण्याची आता पत्नीला देखील सवय झालीय ..तरीही ती वैतागली की एखादेवेळी आम्हाला फोन करते ..त्याला पंधरा दिवस सेंटरला पाठवते ..तेथे त्याला तुम्ही पुन्हा समजावा असे आम्हाला सांगते ..आम्ही त्याला समजावतो ..तो सगळे समजले ..आता वागण्यात बदल करीन असे अंगविक्षेप करून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ..घरी गेला की पुन्हा तसाच बावळट ..वेंधळा ..त्याचा मुलगा हुशार आहे खूप ..बारावीला ९३ टक्के मार्क मिळवून आता इंजिनियरिंग करतोय ..दारू सोडली तरी त्याच्या मेंदूवर दारूमुळे झालेले दुष्परिणाम तसेच आहेत ..कधी कधी वाटते हा विरक्त झालाय संसारातून ..केवळ कर्तव्य भावनेने नोकरी अन संसार करतोय ..' इदं न मम ' ...हे सगळे केव्हातरी सोडून जायचेय .मग याचा मोह नको हे तत्व यालाच जास्त समजलेय आपल्यापेक्षा ..म्हणजे हा अध्यात्मिकतेत आपल्याही पुढे पोचलाय बहुतेक ..मात्र त्याच्या सहवासात दोन तास राहिले की कळते...याची जगण्याची ..आनंद घेण्याची ..मूळ प्रेरणाच हरवलीय व्यसनामुळे !
( समाप्त )

No comments:

Post a Comment