दुसऱ्यांदा उपचार घेण्याच्या वेळी त्याचा पवित्रा तोच राहिला ..तो नाईलाजाने सेंटरला राहतोय असेच त्याच्या शरीरभाषेतून दर्शवत राहिला ..सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या थेरेपीज साठी त्याच्या मागे लागावे लागे ..प्रत्येक वेळी तो माॅनीटरशी वाद घाले ..या वेळी आम्ही त्याच्या आईला त्याला अजिबात भेटू नये अशा सूचना दिल्या होत्या ..मात्र तीने आमचे ऐकले नाही ..ती आलीच भेटायला ..अनेकदा आमच्या उपचारात पालकांचा हवा तसा सहभाग मिळत नाही ..आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन पालक करत नाहीत ..अर्थात त्या मुळे उपचार घेणाऱ्या व्यसनीला आम्ही जी मानसिक शक्ती मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यात आम्हाला यश येत नाही ..उपचारात पालक ..प्रत्यक्ष व्यसनी आणि समुपदेशक यांचा तिघांचा योग्य सहभाग गरजेचा असतो ..या पैकी व्यासानीचा सहभाग योग्य नसणार हे गृहीत असते ..मात्र पालक देखील तसेच असतील तर आमची अडचण होते ..तीस टक्के पालकांचा आम्हाला असा अनुभव आहे की ते अजिबात आमच्या सूचनांचे पालन करत नाहीत ..त्यांच्या वेड्या मायेपोटी म्हणा किवा काळजी पोटी म्हणा ते स्वताच्या मर्जीनेच वागतात ..या वेळी देखील तसेच झाले ..त्याला आता किमान तीन महिने उपचार द्यावे लागतील असे आम्ही सांगितले होते ..मात्र त्याची आई त्याला एका महिन्यातच घरी घेवून गेली ..या वेळी त्याचा मुंबईला राहणारा मोठा भावू देखील आला होता आई बरोबर ..त्या भावाने देखील तक्रार केली ..की आई त्याचे खूप लाड करते ..आम्हाला नकळत त्याला पैसे पुरवते ..कितीही सांगितले तरी ती कोणाचे ऐकत नाही ..भावू त्याला तीन महिने सेंटरला ठेवायला तयार होता ..परंतु आईच्या हट्टापुढे भावाचे काहीही चालले नाही ..सध्या हा नोकरी वगैरे करत नाहीय ..त्या मुळे दिवसभर रिकामाच असतो ..त्याला तुम्ही रोज सेंटरला फॉलोअप साठी व डेकेअर साठी पाठवा असे आम्ही आग्रहाने आईला सांगितले ..आईने हो ला हो केले ..परंतु एकदा सेंटरच्या बाहेर पडल्यावर तो अजिबात सेंटरला फिरकला नाही ..मानस शास्त्रात ' किंग बेबी सिंड्रोम ' नावाची एक अवस्था सांगितली जाते ..अशा व्यक्तीचे लहानपणापासून इतके लाड केले जाता कुटुंबियांकडून की नेहमी त्याला हवे ते मिळत जाते ..त्याला कशासाठीच संघर्ष करावा लागत नाही ..आपले मुल सतत आनंदी राहावे म्हणून आईबाप त्याची प्रत्येक मागणी योग्य आहे अथवा अयोग्य आहे याचा विचार न करता पूर्ण करतात ..नकळत त्याला आपण राजपुत्र आहोत असे वाटू लागते ..मग त्याला नेहमीच सगळे काही माझ्या अपेक्षेनुसारच घडावे असे वाटत राहते..तसे घडले नाही तर तो कुटुंबियांना मी आत्महत्या करीन ,,घर सोडून निघून जाईन ..जेवणार नाही..वगैरे प्रकारच्या धमक्या देवून इमोशनल ब्लॅकमेल करतो ..
पुढे पुढे केवळ कुटुंबियांकडूनच नव्हे तर सगळ्या जगाकडून त्याच्या अशाच अपेक्षा असतात...प्रत्येक वेळी मनासारखे घडावे म्हणून तो जिवाचा आटापिटा करतो .. स्वता:च्या शर्ती वर जिवन जगत जातो ..खरे तर जिवनात हार-जीत, यश -अपयश , सुख -दुख: , हे सगळेच प्रत्येकाच्या वाट्याला येत असते ..स्वताच्या अटी आणि शर्तींवर कोणालाच जगायला मिळत नसते ..या प्रकारच्या अनुभवातूनच जीवनाचे सार समजून घेवून...समजूतदार पणा किवा प्रगल्भता येते ..प्रत्येक वेळी मनासारखे घडत नाही तर काही वेळा मला जे घडतेय त्याच्याशी जुळवून घ्यावे लागते ही शिकवण मिळते ..त्यातूनच संपन्न व्यक्तिमत्व आकाराला येते ..परंतु याच्या बाबतीत तसे झालेच नव्हते .त्यामुळे जेव्हा याला जगाच्या वास्तवाचा सामना करावा लागला तेव्हा ..याच्याकडे जुळवून घेण्याची कला नव्हती ..हा लगेच चिडचिड करी ..निराश होई ..वैफल्यग्रस्त होऊन दारूचा आधार घेई ..पुन्हा दोन महिन्यातच आईचा फोन आला ..हा पुन्हा खूप प्यायला लागला आहे ..याला जबरदस्तीने घेवून जा उपचारांना ..आम्ही त्याच्या आईला सांगितले की तुम्ही आमच्या सूचनांचे पालन करत नाही ..त्यामुळे तो नीट उपचार घेत नाही ..मागच्या वेळी आम्ही त्याला तीन महिने ठेवा असे सांगून देखील तुम्ही त्याला एका महिन्यात घरी नेले ..या वेळी जर असे करणार असाल तर आम्ही त्याला दाखल करून घेत नाही ..यावर त्याच्या आईने या वेळी तुमचे ऐकीन ..त्याला नक्की तीन महिने ठेवीन .,माझ्यावर उपकार करा वगैरे विनंती केली ..शेवटी आम्ही त्याला उचलून उपचारांना घेवून आलो ..या वेळी देखील त्याने आईला अर्वाच्च शिव्या दिल्या ..जिने त्याचे सर्वात जास्त लाड केले होते त्या आईलाच तो अशा शिव्या घालत होता ..आता तरी आई याला योग्य उपचार घेवू देईल अशी आशा होती आम्हाला ..पण कसचे काय ..
पंधरा दिवसांनी त्याच्या आईचा फोन आला मुंबईहून ...मी मोठ्या मुलाकडे सुनेचे बाळंतपण आहे म्हणून आलेय ..त्याची खूप आठवण येतेय मला ..एकदा तरी फोनवर बोलू द्या मला त्याच्याशी..आम्ही नकार दिला मात्र ती हट्टाला पेटली ..आम्ही नाईलाजाने त्याला फोन दिला ..आई मुंबईला गेलीय हे समजल्यावर तो चिडला तिच्यावर ..तू मला न सांगता ..न विचारता कशी गेलीस म्हणून भांडू लागला ..मग लवकर इथे ये ..मला घरी घेवून जा हे नेहमीचे सुरू केले ...शेवटी आम्ही फोन काढून घेतला त्याच्या हातून ..आता तुम्ही निवांत तीन महिने रहा मोठ्या मुलाकडे मुंबईला तोवर याला इकडे उपचार घेवून द्या असे बजावले त्याच्या आईला ..ती हो म्हणाली ..मात्र तिचा होकार ठाम नव्हताच ..त्याचा उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर दोनच दिवसात ही मोठ्या मुलासह सेंटरला हजर..त्याची खूप आठवण येतेय ..भेटायचे आहे म्हणू लागली ..मोठा भावू समजूतदार होता ..त्याने तिला मनाई केली तरीही शेवटी आईच्या हट्टामुळे तो तिला मुंबईहून नागपूरला घेवून आला होता ..त्याला भेटल्यावर व्हायचे तेच झाले ..त्याने घरी घेवून चल असा आग्रह केला .. त्यावर मोठ्या भावाने त्याला सांगितले की सध्या अजून दोन महिने आई माझ्याकडे मुंबईला राहणार आहे ..तुला यायचे असेल तर आमच्यासोबत मुंबईला चल किवा अजून दोन महिने सेंटरला रहा..हा मुंबईला भावाच्या घरी जाणे शक्यच नव्हते ..कारण तेथे आपले लाड होणार नाहीत हे त्याला चांगले ठावूक होते..मी मुंबईला पण येत नाही आणि सेंटरला पण राहणार नाही ..त्या ऐवजी मी इथल्याच घरी एकटा राहीन ..आईला जावू दे मुंबईला तुझ्यासोबत असा तिसराच पर्याय याने सुचवला ..आम्ही सगळ्यांनी ठाम नकार दिला ..तू इथे एकटे रहायचे नाहीस अजिबात..असा पवित्रा घेतला ..तरीही त्याने त्याचा हट्ट सुरु ठेवला .. पुन्हा आईच्या हृदयाला पाझर फुटला ..शेवटी त्याला दोन वेळचा डबा लावून द्यायचा ..जवळ मोजके पैसे ठेवायचे ..त्याने नागपुरातच घरी एकटे राहायचे ..रोज सेंटरला भेटायला यायचे असे ठरले ..आई सुनेचे बाळंतपण होईपर्यंत मुंबईलाच रहाणार होती ..पुन्हा त्याच्या मनासारखेच झाले होते ..आई आणि भावू त्याला घेवून गेले ..तो फॉलोअपला येणार नाही अशी खात्रीच होती आमची ..तसेच झाले ..मध्ये जेमतेम पाच सहा दिवस गेले असतील ..एकदा सकाळी स्थानिक वर्तमानपत्रात बातमी आली .." तरुण अभियंत्याची आत्महत्या " याचेच नाव दिले होते त्या बातमीत ..राहत्या घरी गळ्यावर आणि सर्वांगावर ब्लेडचे वार करून घेवून त्याने आत्महत्या केली होती ..आम्ही सगळे खूप हळहळलो ..त्याचे सगळे सोपस्कर करून नंतर आई आली होती सेंटरला..भकास चेहऱ्याने ..आम्हाला काय बोलावे सुचेना ..दहा मिनिटे सगळे निशब्द होते ..शेवटीच तीच बोलली " सुटले सगळेच "..मग तोंडाला रुमाल लावत घाईने बाहेर पडली !
( समाप्त )